Advertisements

आठवड्याचा बाजार ….

ए भारीये… भारीये ..
ए दुबई दुबई दुबई …
ए भाय देख इस तरफ, तेरेको बुलारा युसुफका रंगीला बरफ…
इधर आईये भाभीजी, अंबानी का माल एकदम सस्तेमे…

आता मात्र मी चमकून त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं, कुणीतरी एक विक्रेता रेडिमेड ब्लाऊज विकत होता आणि तोंडाने जोर जोरात चालू होतं अंबानी का माल…

त्याचं असं झालं आज आम्हा दोघांना मेहुण्याकडे चक्क सवाष्ण ब्राह्मण म्हणून बोलावलं होतं खारघरला. तिथून परतताना सासूबाई म्हणाल्या की आज इथला मंगळवारचा बाजार आहे. बायकोबाई लगेच चल रे बघूया तरी म्हणत एका पायावर तयार. थोडी कुरकुर करत मी जायला तयार झालो (सांगतो कुणाला?) .

But believe me, तास दिड तास तिथे फिरल्यानंतर प्रचंड फ्रेश होऊन बाहेर पडलो. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या मैदानात भरलेला हा बाजार, पावसाने झालेला चिखल, वरून पाऊस पडतोच आहे, विक्रेते तसेच प्लास्टिक अंथरून, ताडपत्री टाकून ग्राहकाला साद घालतायत, आपला माल विकताहेत. बायकोने त्यातही गंमत गंमत म्हणत सहा-सातशे रुपयेची काही बाही खरेदीसुद्धा केली.

This slideshow requires JavaScript.

मी तिच्या बरोबर फिरत होतो खरा पण मन कुठेतरी भूतकाळात रेंगाळत होतं.

कुर्डुवाडी, दौंड, सोलापूर, वरकूटे, घोटी, करमाळा, परांडा अशा वेगवेगळ्या ठिकाणी लहानपणी पाहिलेले आठवड्याचे बाजार, त्या जत्रांमध्ये कुठेतरी मन रेंगाळत होतं. तेव्हा खिश्यात पाच रुपये वट्ट असले तरी आम्ही श्रीमंत असायचो. मग त्या पाच रुपयात बरीचशी खरेदी व्हायची. पण हा बाजार म्हणजे खरेदी कमी , माणसे बघणं जास्त असायचं. ३५-४० रुपयांचा सदरा तासभर घासाघीस करून २५-३० रुपायाला घेणाऱ्या गिर्हाईकाच्या चेहऱ्यावर जग जिंकणाऱ्या सिकंदराचे विजयी भाव असायचे आणि विक्रेता मात्र १५-२० ला पडलेला शर्ट ३० रुपयाला गेला म्हणून खुशीत असायचा. आम्ही आपले नुसतेच बघत हिंडायचो. कुठल्याही विक्रेत्यासमोर जोपर्यंत तो हाकलून लावत नाही तोपर्यंत त्याचा माल चिवडत उभे राहायचे. आणि तो वैतागला कि मग दुसऱ्या कडे वळायचे. खिशातले पैसे भेळ, भजी, गारेगार, बर्फ़ाचा गोळा यासाठी जपून ठेवलेले असायचे.

गारेगार हा प्रकार आजकालच्या पोरांना माहीत तरी आहे की नाही देव जाणे. पण सायकलच्या मागच्या बाजूला लावलेल्या पत्र्याच्या डब्यातले गारेगार (हा आजकालच्या कुल्फीसारखा एक प्रकार असायचा, फक्त कुल्फी दुधाची, मलाईची असते गारेगार पूर्ण बर्फ़ाचे बनवलेले असायचे, त्यात पुन्हा वेगवेगळे रंग घातलेले असायचे. लाल, पिवळ्या रंगाचे गारेगार २०-२५ पैशाला मिळायचे. म्हातारीचे केस (बुढी के बाल), गोडी शेव, शेव चुरमुऱ्याची सुकी भेळ, त्यात सिझननुसार टोमॅटो, काकडी किंवा कैरीचे काप घालून, वरून लिंबू पिळले कि जी अप्रतिम चव लागायची कि पुछो मत !

आणि अशा ठिकाणी एकटे जाणे कधीच नसायचे, कोणी ना कोणी मित्र बरोबर असणारच. तसं खुपदा आई किंवा वडिलांबरोबर पण झालं असेल पण त्यात तेवढी गंमत नसे कारण मग त्या वेळी त्यांची बारीक नजर आमच्यावर असे. पण अशा बाजारातून किंवा जत्रेतून मित्राबरोबर भटकताना येणारी मजा काही और असे. सोलापूरची गड्ड्याची जत्रा असो किंवा मंगळवारचा जुन्या वस्तूंचा बाजार असो , अशा ठिकाणी फिरणे हि एक सॉलिड आनंदाची बाब असे. मंगळवार बाजारातून जुन्या टेपचे जुनाट मेकनिजम विकत आणून त्याच्यावर नवनवे प्रयोग करून त्यातून टेपरेकॉर्ड तयार केला होता असाच आम्ही.

लहानपणी आमच्या गावी, घोटीला जायचो तेव्हा तिथला बाजारही असाच असायचा. आजूबाजूच्या गावातून आलेले छोटे छोटे विक्रेते, मग त्यात झबले टोपले विकणाऱ्यापासुन ते सुया-दोरे, भाजीपाला, जर्मनची भांडी विकणारे विक्रेते असतात. बऱ्याचदा बार्टर सिस्टीम वापरली गेलेली सुद्धा पाहिलंय मी तिथे. म्हणजे वस्तू विकत घ्यायची मात्र तिचं मोल पैश्याच्या स्वरूपात न देता धान्याच्या स्वरूपात द्यायचे. त्या बाजारात सुद्धा गोड काटीशेव, भेंड बत्तासे आणि भजी खायला प्रचंड आवडायचे. मग कधीतरी त्या बाजारात एखादा कंगवा, फणी किंवा त्याकाळी सगळीकडे मुलांमध्ये फेमस असलेले एक कागदी खेळणे मिळायचे. एकमेकाला पाठमोरे चिकटलेले दोन समान आकाराचे कागद, त्यावर वेगवेगळी चित्रे काढलेली, त्यात मध्ये एक काचेचा तुकडा चिकटलेला असायचा, त्याला मध्ये ठेवून एका बाजूच्या कागदाची घडी घातली कि कागदाच्या दुसऱ्या बाजूला काचेतून ते चित्र दिसायचे आणि आम्हाला ती जादू वाटायची. कधी काका बरोबर असले की झकास भोवरा विकत घेऊन द्यायचे. आता गाव अजूनही आहे, गावी जाणेही होते, आठवड्याचा बाजारही होतो पण काका नाहीत, त्यामुळे बाजाराची मजा नाही राहिली, इच्छाच होत नाही.

शाळेच्या दिवसात दौंडला असताना, आजुबाजुच्या खेडेगावातुन आलेली मित्रमंडळी शाळेच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्याला असत. गिरीम, शिरापुर, गोपाळवाडी, कुरकुंभ, पाटस अशा ठिकाणावरुन आलेली ही पोरं. मग प्रत्येक वेळी त्यांच्या गावच्या जत्रेला , कधी गावातल्या कुठल्या तरी उरुसाला जाणे व्हायचे. त्या जत्रेचा थाटही या आठवडी बाजारासारखाच असायचा. कुठल्यातरी मोकळ्या मैदानावर, नाहीतर गावाजवळच्या कुणाच्यातरी शेतात थाटली जाणारी तात्पुरती दुकाने. मग त्यात शेतीच्या सामानापासून ते जुने, नवीन कपडे, चपला, शेव-चिवड्याची दुकाने. कुणीतरी टाकलेली चहा-भज्यांची टपरी. बटाटेवडा वगैरे माहीतीच नव्हते तेव्हा. आमच्या दृष्टीने ऐश म्हणजे कुठल्यातरी वर्तमानपत्राच्या तुकड्यात बांधून घेतलेला शेव-चिवडा, कधीतरी खुशीत असलेल्या काकाने घेवून खाऊ घातलेली गरमागरम तेलकट भजी. तर कधी जवळपास कुणी ओळखीचे नाहीये हे बघून गुपचूप चार मित्रांच्या घोळक्यात लपून खाल्लेलं अंड्याचं ऑम्लेट नाहीतर भुर्जी पाव…

माझ्याकडे अश्या वेगवेगळ्या जत्रांमध्ये विकत घेतलेली शाईची पेनं होती. जवळजवळ वीसेक पेनं कितीतरी वर्षं जपून ठेवली होती मी. माढ्याचा बदामी पेढा आणि सिद्धटेकचा भरपूर साखर साखर असलेला आणि तरीही अजिबात गोड नाही असा बिनधोकपणे छाती ठोकुन दावा करणारा सफेद मलाई पेढा आजही आठवतो. जेऊरच्या, मंगळवारी आणि शुक्रवारी भरणार्‍या आठवडी बाजारात काका घेवून जायचे. तेव्हा मोठ्या कढईत सतत उकळत्या दुधाची ती रबडी, टॉक्क असा आवाज करत अंगठ्याने बाटलीच्या गळ्यात अडकलेली गोटी खाली पाडून घशात रिकामा केलेला गोटी सोडा कधीही विसरता न येणार्‍या आठवणी आहेत.

परवा खारघरच्या या मंगळवार बाजारात फिरताना सगळ्या जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या म्हणून आपलं उगाचच हे पारायण…..

विशाल कुलकर्णी

Advertisements

‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….

कविवर्य भा.रा. तांबे यांच्या याच संग्रहातील ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे  अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक. मास्टर विनायकांबद्दल दीदी खुप आदराने बोलतात…

त्या सांगतात….

“वाचनाचा नाद मला कोल्हापूरला अक्कामुळे म्हणजेच इंदिरा या मावसबहिणेमुळे लागला. ती लेखिका होती. ती शरदचंद्र चटर्जी वाचायची. तिने मला पुस्तके आणून दिली. मी मुंबईला आले त्या वेळी विनायकरावांनी हिदी काव्याची पुस्तके दिली. भा. रा. तांबेंचं पुस्तक त्यांनीच मला दिलं. त्यांचं आवडतं गाणं होतं, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ तरी…’ ते गाणं त्यांनी मला शिकवलं. ‘उठा उठा हो सकळीक’ ही चाल त्यांचीच. त्यांनी माझ्यासाठी लेखराज शर्मा म्हणून कवी असलेल्या शिक्षकांची शिकवणी लावली. ते मला हिदी शिकवायला यायचे. त्यांच्यामुळे मी हिदीतील अनेक पुस्तके वाचली. प्रेमचंदांची सर्व पुस्तकं वाचली. त्यांनी मला दिनकर, मैथिली शरण, बच्चन, नरेंद्र शर्मा आदी कवींची पुस्तकं आणून दिली. मास्टर विनायकांमुळे मला काव्याची आवड लागली.”

या गाण्यातील ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या ओळीतल्या ’राज्य’ या शब्दाची जागा घेताना लतादीदी जी कमाल करतात त्यावरून लक्षात येते की एकहाती एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कमाल कशी जमली असेल त्यांना! हे गाणं संगीतबद्ध करताना बाळासाहेब नक्की कुठल्या दैवी मनोवस्थेत होते ते त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या चालीने, त्यांच्या संगीताने या गाण्याला अगदी उच्चपदावर, धृवपदावर नेवून बसवलेले आहे.

असो, मी बहुदा आठवी-नववीत असताना माझ्या आईमुळे गाण्याचं वेड लागलं. अतिशय गोड गळा लाभलेली माझी आई, सतत काही ना काही गुणगुणत असते. पण तिचा देव-देव किंवा धर्म याकडे फारसा ओढा नाही. त्यामुळे लहानपणी भजने, भक्तीगीते वगैरे फारशी कानावर पडली नाहीत. तिच्या तोंडून आमच्या कानावर पडायची ती लताबाई, आशाबाई यांनी गायलेली हिंदी चित्रपटगीते. त्यातही आशाबाई तिच्या फ़ेव्हरीट. कदाचित माझ्या ’आशा प्रेमाचा’ वारसा तिच्याकडूनच आलेला असावा. पण लताबाईंची गाणी सुद्धा त्यावेळी तिच्या ओठावर असतच. त्यातच हे गाणे नेहमी असायचे.

घन तमी शुक्र बघ राज्य करी….”

आई गाणं शिकलेली नाही, पण यातला ’राज्य’चा उच्चार करताना ती नकळत अशी काही हरकत घ्यायची की आपोआप लक्ष वेधलं जायचं. एके दिवशी मी तिला विचारलंच ’घनतमी’ म्हणजे काय? त्यावर ती म्हणाली…

“घनतमी नाही, ते घन तमी असे आहे. घन म्हणजे दाट, घनदाट, निबिड (अरण्य) या अर्थाने आणि तम म्हणजे ’काळोख’ !  घनदाट,, निबिड अगदी डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा अंधार ! ”

त्यानंतर मी या गाण्यातील शब्दार्थाच्या वाटेला फ़ारसा गेलो नाही. जे सांगितलं तेच डोक्यावरून गेलं होतं. पण हे गाणं मात्र आवडायला लागलं होतं. खरं सांगायचं तर अगदी परवा-परवा पर्यंत , म्हणजे काही दिवसांपूर्वी दक्षिणाने ’ घन तमीचं रसग्रहण करशील का?’ असे विचारेपर्यंत मी या गाण्याचा कधी खोलवर जावून विचारच केला नव्हता. त्या दिवशी दक्षीशी बोलणे झाल्यानंतर एकदा निवांतपणे हे गाणं पूर्ण ऐकलं, लक्ष देवून ऐकलं आणि …….

तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की अरे हे गाणं आपल्याला बर्‍याचदा भेटत असतं रोजच्या आयुष्यात..

आरतीप्रभू एका कवितेत म्हणतात..

तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.

त्या ओळी वाचताना मी थबकतो आणि मग हेच जरा वेगळ्या शब्दात सांगणारे माझे सन्मित्र श्री. चारुदत्त कुलकर्णी यांची आठवण मला होते. अज्ञात या नावाने काव्यलेखन करणारे चारुदत्त उर्फ सी.एल. आपल्या एका कवितेत अगदी सहजपणे मनाची घालमेल, आर्तता व्यक्त करुन जातात…

आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी
भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी
सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी
समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी

आता जसजशी कविता समजायला लागलीय (आता कुठे सागरातला एखादा दुसरा थेंब हाती लागायला सुरुवात झालीये) तेव्हा भा.रा. तांब्यांच्या ‘घन तमी’ ची जादू तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे. मी आशाबाईंच्या गाण्याचा वेड्यासारखा चाहता असलो तरी लतादीदींच्या आवाजाचा भक्त सुद्धा आहे. खरंतर गाणं असो किंवा साधं बोलणं, लतादीदींचा स्वर आर्त, म्हणजे हृदयाच्या गाभ्यालाच हात घालणारा असतो. त्यांच्या स्वरात ही जादू असल्यामुळेच आजवर लतादीदींचा आवाज आणि त्या आवाजातील गाण्यांना चिरंतनाचा स्पर्श झालेला आहे. लतादीदींच्या आवाजातला शांत-सात्त्विक भाव म्हणजे थेट ज्ञानेश्वरीतल्या शांतरसाशी नातं सांगणारा आणि ज्ञानेश्वरी म्हणजे शांतरसाचं आगर. त्यामुळेच एके ठिकाणी अदभुत रसाची चुणूक दिसताच ज्ञानेश्वर म्हणतात- ‘शांताचेया घरा, अद्भुत आला आहे पाहुणोरा’ म्हणजे शांत रसाच्या घरी अद्भुतरस पाहुणा आला आहे. लतादीदींचा आवाज क्षणोक्षणी याची चुणूक देत राहतो जेव्हा त्या गातात…

“घन तमी …..”

असो… थोडंसं भा.रा. तांब्यांच्या या कवितेकडे वळुयात ?

इथे “घन तमी” हा शब्द एक प्रतिक म्हणून आलेला आहे. नैराष्याचे, खिन्नतेचे, हतबलतेचे काळेभोर ढग आयुष्यात बर्‍याचदा जगण्याची वाट अडवून उभे होतात. कधी-कधी एखाद्या आप्त स्वकियाचा मृत्युदेखील या उदासिनतेला कारणीभूत ठरु शकतो. तर कधी स्वतःच्याच मृत्युची चाहूल लागल्याने ‘जन पळभर म्हणतील….” अशी मनाची अवस्था झालेली असते. माझ्यामागे जग मला विसरणार तर नाही ना? ही भीती त्यात असते. अशा निराश, विरक्त होत चाललेल्या मनाला कविराज साद घालतात…

घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

इथे तांब्यांच्या रसिकतेला मनापासून दाद द्यावीशी वाटते. ते आपल्या कवितेतील उपमा, रुपके नेहमीच खुप सुचकतेने, रसिकतेने निवडतात, वापरतात. इथेच पाहा ना, “घन तमी ‘शुक्र’ बघ ‘राज्य’ करी ” ! शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. शुक्राच्या चांदणीचे वैशिष्ठ्य हे आहे की शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

‘काळोखातसुद्धा तो ‘शुक्र’ कसा ‘राज्य’ करतोय’ या ओळीतील ‘राज्य’ हा शब्द खूप काही सांगून जातो. केवळ एका समर्पक शब्दात प्रतिकूलतेतही चमकत राहण्याचा डौल आहे, तोरा आहे. हे भा.रा. तांब्यांचं वैशिष्ठ्य आहे. एकाच शब्दात अनेक गोष्टी साधायचं.

ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

ये बाहेरी ‘अंडे’ फोडूनी ..! यातील ‘अंडे’ या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक असा की, तुझ्या मनाने  आलेल्या नैराष्यातून नकारात्मक विचारांचा जो एक गंडकोष निर्माण केलाय, तो फोडून तू बाहेर ये. दुसरा अर्थ जरा  तत्वज्ञानाच्या मार्गाने जाणारा आहे.  ‘अंडे’ म्हणजे देह, तनू, काया , ज्यात ते ‘आत्मा’रुपी सत्य, सत्त्व  वसलेले आहे. ‘मी’ म्हणजेच माझे शरीर ही ओळख पक्की झालेली असली की मृत्यूचे भय निर्माण होते.

माझे ‘अस्तित्व’ माझ्या शरीरावर अवलंबून नाही या मुलभूत सत्याचा एकदा बोध झाला की मृत्युची भीती आपोआपच नाहीशी होते.

या संदर्भात ओशोंच्या कुठल्यातरी पुस्तकात एक छान गोष्ट वाचली होती. समुद्रात एक लाट, वाहताना तिच्या लक्षात येते की प्रत्येक लाट किनाऱ्यावर जाऊन फुटतेय. पुढे येऊन ठेपलेला आपला ‘अंत’ पाहून ती लाट घाबरते. घाबरून तिने तिचा वेग मंद केला. शेजारून दुसरी लाट जात होती. तिने या लाटेला तिच्या उदास होण्याचं कारण विचारलं. या लाटेने खरं कारण सांगितलं. दुसरी लाट फेसाळत हसली. म्हणाली, ‘तू जोवर स्वतःला ‘लाट’ समजत आहेस, तोवर तुला फुटून नाश पावण्याचं भय वाटत राहील. स्वतःला लाट समजू नकोस, स्वतःला ‘सागर’ समज. तू आत्ता फुटून जाशील. पुन्हा तुझी एक लाट तयार होईल. ती देखील कधीतरी फुटेल. पण तरीही तू या समुद्राचाच एक भाग बनून राहशील.’

एका निराळ्या संदर्भात  आचार्य रजनीश म्हणाले होते, ‘जे स्वतःला ‘सागराची लाट’ समजतात ते पृथ्वीवर जन्म घेत राहतात. ज्यांनी स्वतःला ‘सागर’ मानलं ते इथे परत आले नाहीत. ते मुक्त झाले !’

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल गळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

प्रत्येक ओळ कशी सहजपणे आयुष्याच्या सार्थकतेवर भाष्य करतेय पाहा. पण मुळात आयुष्याची सार्थकता कशात असते हो? की खरोखर असं काही असतं तरी का? ‘जो आला तो जाणारच’ हे एकमेव त्रिकालाबाधित सत्य आहे. मृत्यू हेच अंतीम सत्य, तीच जीवनाची सार्थकता ! साधी-साधी उदाहरणे दिली आहेत तांब्यांनी. पहिल्या ओळीतल्या “रे खिन्न मना” ची ती उदासी कशातून आली असेल हे इथे स्पष्ट होते. हे कडवं नीट वाचलं तर इथे नाशाचा, मृत्यूचा उल्लेख प्रथम येतोय. फुलाच्या नष्ट होण्यात फळाचा जन्म दडलेला असतो हा निसर्गनियम आहे. एखादा वटवृक्ष डौलाने झूलत येणार्‍या-जाणार्‍या पांथस्थाला शीतल छाया देत असतो. पण केव्हा जेव्हा त्याचं ‘बीज’ रुजतं, जमीनीत मिसळून जावून नष्ट होतं , तेव्हा त्यातून नवा अंकुर जन्माला येतो, ज्याचं कालौघात एखाद्या डेरेदार वृक्षात रुपांतर होतं. ज्योतीच्या उजळून निघण्यासाठी तेलाचे जळणे अत्यावश्यक असते. किती साध्या, आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या साह्याने कविराज मृत्यूची गुढ संकल्पना विषद करताहेत पाहा. मुळात आपण मृत्यूची उगाचच भीती बाळगतो. मृत्यू हा विनाश नाहीये मित्रांनो. आत्मारुपी उर्जेचे एका स्वरुपातून दुसर्‍या स्वरूपात स्थित्यंतर म्हणजे मृत्यू. उर्जेचे अमरत्व टिकवण्यासाठी निसर्ग घडवून आणत असलेली एक सर्वसामान्य प्रक्रिया म्हणजे मृत्यू. निसर्गात अशा घटना सर्रास घडत असतात. नवी पालवी फुटण्यापुर्वी झाडावरचं जुनं जीर्ण पान गळून पडतं. त्याच्यासाठी कधी कुणी दहा दिवसाचं सुतक ठेवतं का? प्रियेच्या आवेगाने वाहत आलेली नदी समुद्रात विसर्जीत होणे हे तीचे मरणच असते पण म्हणून त्यासाठी निसर्ग दोन मिनीटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहतो का?

तसंच मानवी जीवनाचे सुद्धा आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय’ हेच सत्य. मग त्या नश्वर आयुष्याबद्दल अकारण आसक्ती आणि जगण्याला नवा आयाम प्राप्त करून देणार्‍या मृत्यूबद्दल अनासक्ती, किंबहुना भीती कशासाठी? मृत्यू हीच खरी चिरंतनता नव्हे का?

आता शेवटचे कडवे. या कवितेतील शेवटचे कडवे म्हणजे मृत्युविषयक तत्त्वज्ञानाचा कळस आहे. कविवर्य तांबे या ओळींमध्ये मृत्युला एका विलक्षण उंचीवर नेवून ठेवतात.

मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे हे हरीकरुणा !
आई पाहे वाट रे मना | पसरुनी बाहू, कवळण्या उरी

शब्द न शब्द जणु काही हिर्‍या-मोत्यांचे जडजवाहिर आहे. कविवर्य स्वतःलाच समजावतात – ‘ का घाबरतोस इतका मृत्यूला ? मृत्यू हे अमृताचे दार आहे. आत ‘आई’ तुझी वाट पाहत उभी आहे; तुला कुशीत घ्यायला !’ केवढी सुंदर कल्पना आहे. ‘हरिकरुणा’ , मृत्यूला ‘हरिकरुणेची उपमा देणारे कविराज इथे कविच्या भुमिकेतून बाहेर पडतात कधी आणि तत्त्वचिंतकाच्या भुमिकेत शिरतात कधी हे आपल्याही लक्षात येत नाही. साक्षात मृत्यूला ‘सुखाच्या दरवाजाची’ उपमा. खरंच आहे ना. भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांपासून मुक्त करत, निराकार, निर्विकार समाधानाचे, आनंदाचे सोपानच तर असते  मृत्यू. त्याला काय भ्यायचे, खरेतर दोन्ही बाहू पसरून त्या दारापलीकडे उभ्या असलेल्या ‘मुक्तीरुपी’ मातेकडे आनंदाने जायला हवे.

घन तमी शुक्र बघ राज्य करी

मला अशा वेळी ‘ये दुनीया मेरे बाबूलका घर….” म्हणणारा साहिर आठवल्याशिवाय राहवत नाही. अशा वेळी मला काकाचा ’आनंद’ आठवायला लागतो.., मृत्यूपंथाला लागलेल्या पण मनापासून मृत्यूच्या स्वागताला तयार असलेल्या ’आनंद’च्या मुखातून ’गुलजार’ सांगून जातात…

“मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
         दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
         ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको !”

ग्वाल्हेरचे राजकवि म्हणून ओळखले गेलेल्या कविवर्य भा. रा. तांबेंच्या कवितांमधून मृत्यू सदैव अशी देखणी रुपे, जगावेगळी रुपके घेवून भेटत राहतो. “नववधू प्रिया मी बावरते..” सारखी नितांतसुंदर कविता  वाचताना आपल्याला कुठे माहीत असतं की ही कविता ’मृत्यूवर भाष्य करते म्हणून ? याच कवितेच्या शेवटच्या ओळी उधृत करून कविवर्यांना मानाचा मुजरा करतो. आज भा.रा. तांब्याचे नावही नव्या पिढीतील किती जणांना माहीती नसेल. पण त्यांची कविता अमर आहे. त्यांचे शब्द चिरंतन आहेत.

शेवटी मृत्यू हेच एकमेव सत्य हे स्पष्ट करताना आपल्या ’नववधू…’ या कवितेतून कविवर्य भा. रा. तांबे सांगतात.

अता तुच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळे पळभर मात्र ! खरे घर ते !

पुढचा टप्पा…

“नववधू प्रिया , मी बावरते ; लाजते , पुढे सरते , फिरते !”

विशाल कुलकर्णी

११/१२/२०१४

एका धर्मगुरूचा खून आणि न घडलेले पोर्तुगीज मराठा युद्ध

वरकरणी किरकोळ भासणाऱ्या घटना दूरगामी राजकीय परिणाम घडवून आणतात हे जगाच्या इतिहासात पुन्हा पुन्हा आढळून आलेले आहे. सन १७५२ मध्ये पोर्तुगीज आणि फ्रेंचांमध्ये एका प्रतिष्ठित पोर्तुगीज कुटुंबाने एक गुलछबू पोर्तुगीज पाद्री आणि दोन आफ्रिकन गुलामांचे एका प्रेमप्रकरणावरून खून केल्याने पोर्तुगीज वसाहत आणि फ्रेंच वसाहत यांच्यात कसा बेबनाव झाला आणि त्याचा परिणाम मुघल, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी आणि मराठी साम्राज्यातील एका गटाने एकत्र येऊन पेशव्यांचा समूळ उच्छेद करण्याचा जो घाट घातला होता तो फिस्कटण्यात कसा झाला याबाबतचा एक किस्सा पोर्तुगीज आणि फ्रेंच साधनांच्या आधारे लिहिलेल्या इतिहासात आहे. गोव्यातील प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या पोर्तुगीज भाषेतील ‘PORTUGUESS E MARATAS’ या ग्रंथात या घटनाक्रमाचा धावता आढावा घेतला आहे. पिसुर्लेकर यांच्या या ग्रंथाचे पी. आर. काकोडकर यांनी इंग्रजी भाषांतर केलेले असून ते ‘THE PORTUGUESE AND THE MARATHAS’ या नावाने प्रकाशित करण्यात आलेले आहे.

पेशवे थोरले बाजीराव यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस मराठ्यांनी पोर्तुगीजांवर स्वारी करून त्यांच्या राज्याच्या उत्तर भागातील दीव-दमण व रेवदंडा वगळता सर्व भाग जिंकून घेतला, त्याच वेळी पोर्तुगीज राज्याच्या दक्षिण भागातही बऱ्याच मोठ्या भूभागाचा ताबा मराठे आणि सावंतवाडीकर भोसल्यांनी घेतला होता. वसईच्या पाडावामुळे पोर्तुगीजांच्या राज्यावर मोठे आर्थिक संकट आले होते हे सर्वश्रुत आहेच.

याच काळात पेशवे प्रबळ झाल्याने त्यांचे अनेक अंतस्थ शत्रूही निर्माण झाले होते. या शत्रूंनी थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पा यांचे निधन झाल्यानंतर डोके वर काढले आणि पेशव्यांचा बंदोबस्त कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. यातूनच मुघल, काही पेशवेविरोधक मराठी सरदार, फ्रेंच, सिद्दी  आणि पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन पेशव्यांचा उच्छेद करण्याचे राजकारण शिजले.

१७५१-५२ मध्ये सलाबतजंग हा महत्वाकांक्षी सरदार मुघल साम्राज्याचा दक्षिणेतील प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेस नियुक्त केलेला होता. त्याने ही योजना आखण्यात पुढाकार घेतला होता असे फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींमधील तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते.

सलाबतजंगाच्या मूळ योजनेत बहुधा त्याने पोर्तुगीजांना गृहीत धरलेले नसावे. त्याने फ्रेंचांच्या भारतातील गव्हर्नर जनरल मोन्स्युअर ड्युप्लेक्स (Monsieur Dupleix) आणि मुघलांच्या औरंगाबाद येथील तळावरील फ्रेंच सरदार मोन्स्युअर एम. बस्सी (Monsieur M. Bussy) यांच्याशी मसलत केल्यावर योजना आकारास येऊ लागली. या योजनेबाबतची माहिती ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy – The Journal on the Army conducted by Monsieur Bussy)’ या नॅशनल लायब्ररी ऑफ पॅरिस येथे जतन केलेल्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. या माहितीनुसार तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रांसिस्को दे अस्सीस दे तवोर (Francisco de Assis de Tavora) याने मराठ्यांनी जिंकून घेतलेला पोर्तुगिजांचा प्रदेश पुन्हा काबीज करण्यात फ्रेंचांची मदत व्हावी या उद्देशाने सन १९५१ च्या शेवटी फ्रेंचांशी संबंध वाढवले आणि सन १७५२ च्या सुरुवातीस बस्सी यांच्या सैन्यात सामील होण्यास काही पोर्तुगीज सैनिक पाठवले देखील होते. याबाबत फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्यात जी मसलत झाली त्याबाबत आल्फ्रेड मार्तीनिको यांनी त्यांच्या ‘Bussy and French India’ या ग्रंथात काही माहिती दिलेली आहे.

या संदर्भातील अनेक बाबी अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. परंतु ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy’ आणि ‘Bussy and French India’ या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार मराठी साम्राज्याच्या तत्कालीन महाराणी ताराबाई आणि तुळाजी आंग्रे हे देखील या मसलतीत सामील झाले होते. मार्क्वी दे तवोर याने ३० नोव्हेंबर १७५१ रोजी बस्सी आणि सलाबतजंग यांना या संदर्भात लिहिलेली पत्रेही उपलब्ध आहेत.

एवढी तयारी झाल्यावर सन १७५२ च्या सुरुवातीस सुरत भागात युद्धाला तोंड फुटले. मुघल सैन्य सुरतेच्या किल्ल्यात होते तर पेशव्यांचे सैन्य सुरत शहरात तळ ठोकून होते. युद्ध सुरु झाल्यावर ब्रिटीशांनी पेशव्यांशी हातमिळवणी केली तर सिद्दी आणि डच मुघलांना जाऊन मिळाले. त्यावेळी होळकरांची पथके बंगालात मोहिमेवर असल्याने पेशव्यांचे सैन्यबळ कमी होते. दोन चकमकींमध्ये पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर नानासाहेब पेशवे राखीव पथके घेऊन पुण्याबाहेर पडले. सैन्याची तोंडमिळवणी करण्यासाठी त्यांनी उत्तर कोकणात ठेवलेले सैन्यही बोलावून घेतले. त्याच दरम्यान दमाजी गायकवाडांनी साताऱ्यात ससैन्य तळ ठोकला.

मुघल, फ्रेंच आणि पोर्तुगीजांना पेशव्यांना नामोहरम करण्यासाठी चांगली संधी होती. परंतु त्याच वेळेस फ्रेंच आणि पोर्तुगीजांमध्ये वेगळेच नाट्य घडत होते. या नाट्याच्या केंद्रस्थानी होता १७५१ सालात झालेला एका पोर्तुगीज धर्मगुरूचा खून.

१३ मे १७५१ रोजी बारदेशात एका नदीत एका काळ्या माणसाचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक जखमा होत्या आणि पायास धोंडा बांधलेला होता. तपासात मृत व्यक्ती फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो या मोझांबिकमध्ये मुक्कामी असलेल्या पोर्तुगीज जहाजाच्या कप्तानाची गुलाम असल्याचे निष्पन्न झाले. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो हा दोम हेन्रिक दे नरोन्हा या प्रतिष्ठित पोर्तुगीज व्यक्तीचा जावई होता आणि त्याची बायको (दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुलगी) तिचा नवरा सफरीवर असताना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरातच राहत होती.

त्यानंतर काही दिवसांनी बारदेशातच एका घळीत शिरच्छेद केलेल्या दोन व्यक्तींची प्रेते सापडली. त्यापैकी एक जण गोरा होता तर दुसरा काळा होता. त्यांची ओळख दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा भाचा असलेला फादर अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो आणि त्या धर्मगुरूचा आफ्रिकी गुलाम अशी पटली. त्या दोघांना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी जाताना शेवटचे पाहिलेले होते.

दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याचा पुतण्या दोम जो दे नरोन्हा आणि अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो यांचा बालपणापासून स्वत:च्या मुलांप्रमाणे प्रतिपाळ केलेला होता. नंतर दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या मुलीचे लग्न फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्याशी झाले पण फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो वारंवार सफरीवर जात असल्याने ती अनेकदा दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरीच राहत असे. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याने तिच्या दिमतीसाठी एक आफ्रिकन गुलाम ठेवलेला होता.

अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याने दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्याशी असलेल्या घरगुती संबंधांचा वापर करून फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्या बायकोस भूल पाडली आणि तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्या उभयतांचे आपापसातील प्रेमसंदेश फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याचा पेद्रो हा आफ्रिकन गुलाम पोहोचवत असे.

या प्रेमप्रकरणाबाबत दोम हेन्रिक दे नरोन्हा याला त्याचा मुलगा दोम गिल याने सांगितले तेव्हा रागावून दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याच्या तीन मुलांबरोबर या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांचा काटा काढण्याचा कट केला. त्यांनी १२ मे १७५१ पेद्रोचा खून केला. नंतर १५ मे १७५१ रोजी अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याला दोम हेन्रिक दे नरोन्हाने त्याच्या घरी बोलावले. अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो त्याच्या गुलामासह दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी गेला तेव्हा दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा मुलगा दोम लुईस आणि अन्य दोघांनी त्यांचा खून केला.

खुनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही दोम हेन्रिक दे नरोन्हा आणि त्याची मुले दोम फ्रांसिस्को आणि दोम गिल यांना अटक केली. दोम लुईस मात्र चीनला पळून गेला. तपासात आरोपींचे कबुलीजबाब घेतले परंतु त्यांनी नंतर न्यायालयात जबान्या फिरवल्या.

मोन्स्युअर ड्युप्लेक्स याची बायको दोम हेन्रिक दे नरोन्हा याची नातेवाईक होती. तिने मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला त्याच्या प्रभावाचा वापर करून दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुक्तता करून घेण्याची गळ घातली. त्यानुसार मोन्स्युअर ड्युप्लेक्स याने मार्क्वी दे तवोर याच्याशी पत्रव्यवहार केला परंतु मार्क्वी दे तवोर याने त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर ३० जानेवारी १७५२ रोजी त्याने पोर्तुगालच्या राजाला या संदर्भात जो वृत्तांत पाठवला त्यात मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला बायकोच्या ताटाखालचे मांजर असेही म्हणले.

या घटनेमुळे फ्रेंच वसाहत आणि पोर्तुगीज वसाहत यांच्यात दुरावा निर्माण झाला. परिणामी बस्सीने जेव्हा पेशव्यांच्या विरोधातील मोहिमेसाठी मार्क्वी दे तवोरकडे १,००० बंदुकांची मागणी केली तेव्हा मार्क्वी दे तवोरने निम्म्याच बंदुका पाठवल्या. वस्तुतः योजनेनुसार मुघल, फ्रेंच आणि मराठा सरदारांनी पेशव्यांच्या विरोधात उठाव करताच पोर्तुगीज आणि सिद्दीनेही उठाव करायचा होता परंतु मार्क्वी दे तवोरने सलाबतजंगास लिहिलेली पत्रे बस्सीने सलाबतजंगापर्यंत पोहोचवली नाहीत. नंतर मार्क्वी दे तवोरने सिद्दीच्या मार्फत सलाबतजंगाशी पत्रव्यवहार सुरु केला पण तोवर पाउस सुरु झाल्याने कोकणात जमिनीवर किंवा समुद्रात युद्ध करणे अशक्य झाले.

दरम्यान पेशव्यांनी मुघल सैन्याबरोबर सुरु असलेल्या लढाईतून माघार घेतली आणि साताऱ्याकडे मोहरा वळवून दमाजी गायकवाडना जेरबंद केले आणि अंतर्गत विरोधकांचा बंदोबस्त केला. त्यानंतर पेशव्यांनी सलाबतजंगाचा मोठा भाऊ गझेडी खान याला फितवले आणि गझेडी खान दिल्लीहून सैन्य घेऊन सलाबतखानावर स्वारी करून आला. या अनपेक्षित घटनांमुळे बाजी सलाबतजंगावरच उलटली आणि पेशव्यांचा आपोआप बचाव झाला.

 

अव्यक्त

प्रत्येक नात्याला नाव असलंच पाहिजे अशी एक साधारण धारणा असते. कुणाची असते तर माझी असते, आणि माझी का असते, तर माझी जडण घडण तशी झाली. प्रत्येक नात्याला नाव दिल म्हणजे मग, जाणीवपूर्वक म्हणा नाहीतर नकळत म्हणा पण त्या नात्याच्या नावाशी आपण इमान राखण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडून तसा प्रयत्न होतो. हा निसरडा रस्ता असतो. हे नाव आणि त्याच्याशी इमान राखण्याचा प्रयत्न, बरेचदा स्वतःशीच होणाऱ्या द्वंद्वाला  कारणीभूत ठरतात. दिलेल्या नात्याशी इमान राखायच की भावनेशी आणि हा मग सगळाच गुंता होऊन बसतो.

तीच आणि माझं नात नक्की काय आहे हे मी आजपर्यंत ठरवू शकलो नाही. इथ ती “ती” असल्यामूळ आणि मी “तो” असल्यामूळ त्याला नाव दिल नाही तर एकंदरीतच गुन्हा ठरतो. त्यामुळ आमच्या या नात्याला देता येईल अस आणि प्रचलित व्यवस्थेत कशालाही धक्का लागणार नाही अस नाव द्यायचा प्रयत्न देखील काहींनी करून झाला पण काही जमल नाही.

आमची ओळख झाली त्याला बरेच वर्ष झाली, नक्की किती तेही आठवत नाही. ती लक्षात राहिली त्याच कारण तीच सौंदर्य. ती देखणी होतीच. पण तेवढंच एक कारण नव्हत हे कळायला अजून बराच काळ जावा लागला. इतर चार चौघींसारखीच आज्ञाधारक पतिव्रता, माता आणिक काय काय असतील नसतील ती सगळी विशेषण तिला लावता आली असती, येतील. पण त्याच्यापलीकड तीच काही अस्तित्व असेल आणि मला ते कळायचा काही संबंध येईल अस कारणही नव्हत. पण तस झाल खरं. ओळख झाल्यानंतर काही काळानी मी योगायोगान तिच्या शहरात आलो.

ती एवढी देखणी असून त्या माणसाची तिन नवरा म्हणून कशी निवड केली हा मला पडलेला पहिला प्रश्न होता तिच्या बाबतीत.

पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यान बावचळून गेलो होतो. फोनवरून कधीतरी बोलत असू. तेव्हा एखाद्या अनुभवी शिक्षकान प्रेमान विद्यार्थ्याला सल्ला द्यावा तशी ती तेव्हा वागत असे अस आज वाटत. पुढ कधीतरी गप्पांच्या ओघात तिला वाचनाची आवड आहे कळल.

हळू हळू तिच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पदर उलगडत गेले.

सुसंस्कृत आणि सुशिक्षित आई वडील. ती स्वतः इतक शिकलेली.

पण बहीणीन प्रेम विवाह केल्यामुळ आई वडिलांच नाक कापल गेल. वडील वरिष्ठ जागेवर असल्यान समाजात (जातीत) नाव पत होती, त्याला धक्का लागलेला. त्यातच जर हीन देखील बहिणीच्या पावलावर पाउल टाकल तर कुठ तोंड दाखवायची सोय उरणार नाही. म्हणून आलेल्या पहिल्याच स्थळाला वडिलांनी होकार दिला. त्याला चांगली स्थिर नोकरी होती, भविष्याची चिंता नव्हती, पदर देखील जुळला होता. शेती, घर अश्या लग्न करताना आधी विचारात घेतल्या जाणाऱ्या सगळ्याच बाजू जमेच्या होत्या, त्यामुळ चिंता नव्हती.

लग्न केल्यावर किंवा खरतर झाल्यावर, लगेचच तिला भल्या थोरल्या आणि माणसांनी भरलेल्या घरात एकटीला टाकून तो निघून गेला. चौकोनी सुखवस्तू कुटुंबात आणि वडलांच्या लाडात सगळ आयुष्य गेलेल्या तिला हे जग नवीनच होत. बावरलेली ती आणि आजू बाजूला सगळ जगच अनोळखी. ती आणि ते घर हे एकमेकांच्यावर झालेल्या संस्काराविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. नवी सून अशी कशी असू शकते असा घराला प्रश्न पडलेला तर घर अस कस असू शकत हा प्रश्न तिला पडलेला.

कुणाशी बोलायची सोय नाही. कधी एकदा यातून बाहेर पडते अस तिला होऊन गेल, पण तेही शक्य आहे की नाही माहित नाही. कधी मधी नवरा येऊन जात असे. ते चार क्षण तरी सुखाचे असतील अस तिला वाटलं, पण लवकरच तीही आशा मावळली. तो आला तरी सासरच्या लोकांपुढ आणि नवऱ्यापुढ बायकोनी फार बोलायचं नाही असे संस्कार त्याच्यावर झालेले. त्यामुळ त्याच्यापुढ आणि त्याच्याशी बोलायची उरली सुरली शक्यता संपली. मग जेव्हा कधी माहेरी जाईल तेव्हाच तोंड उघडायची संधी.

बहीणीन जाती बाहेर लग्न केल असल तरी तिच्याशी बोलता येत असे. पण लग्न झाल्यावर, तिन जातीला बट्टा लावलाय अस मत असलेल्या त्यान त्या बोलण्यावर आणि त्यां बहिणीच अस्तित्व मान्य करण्यावरच बंदी घातली. पुढ मग त्याच्या नोकरीमुळ शहरात येऊन राहायाची सोय झाली आणि निदान गर्दीतल्या एकटेपणापासून सुटका झाली. आता हा एकटेपणा एकटीचा एकटेपणा होता.

पण त्याचा स्वभाव फारच संशयी होता. आता तो तसा होता की तीच शिक्षण, विचार करण्याची क्षमता, रूप यांनी निर्माण केला होता हे कळण अवघड आहे. पण ते कळलं म्हणून फार फरक पडणार आहे असही नाही म्हणा. पण त्यामुळ तिला कधी विश्वासात घेतलच नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीत देखील. घरी कधी येणार हे देखील कधीच सांगत नसे. नेहमीच अचानक. ह्या अविश्वासामूळ तिला कुणाशी बोलायची देखील चोरी. जीव टाकणे वगैरे लांबच्या गोष्टी. माहेरचा काय असेल तेवढाच आधार. पण त्यांना देखील इकड यायला मोकळीक नाही.

हळू हळू एकटीच्या एकटेपणाची आणि अविश्वासापायी आलेल्या भीतीची देखील सवय झाली. पुढ थोडी मोकळीक मिळाल्यावर मग पुन्हा एकदां पुस्तकांशी ओळख झाली. आमच्या सगळ्या चर्चा अगदी सहज साध्या विषयांपासून ते गंभीर विषयांपर्यंत होत. मग वाढत्या वयातली मुलं असो की विश्वास पाटलांच महानायक असो. अगदी मनमोकळ बोलत असे ती. मीच त्या गप्पातल्या ह्या आमच्या अनामिक नात्याला न्याय देऊ शकलो का असा मला प्रश्न पडतो.

मला एका स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि तरीही नवऱ्याच्या माग गेलेल्या एका बायकोन लिहिलेलं पुस्तक तिन भेट दिल होत. मी ते बराच काळ वाचलंच नाही. वाचल्यावर पुन्हा विचार करू लागलो की हे तिन हेतुपुरस्सर तर दिल नसेल. अगदी तशीच नसली तरी बरीचशी थोडाफार तो प्रकार होताच. यशस्वी नवरा, चार चौघात नाव, मान मरातब आणि पैसे असल्यावर मिळणारे इतर फायदे. पण या सगळ्यात ती कुठंच नव्हती.

हेच पुस्तक तिला का आवडाव आणि मी इतक्या वर्षांनी तिला सांगितल्यावर तिला वाटणार आश्चर्य हेच सांगत होत का? माहित नाही. बहुतेक ते कधीच कळणार नाही आणी मी विचारायला जाणार नाही. कधी कधी काही गोष्टी न कळलेल्याच चांगल्या असतील. जोपर्यंत हे अव्यक्त आहे तोवर त्यात असंख्य शक्यता आहेत.

पण तिच्या अव्यक्त असण्यात मात्र शक्यतांपेक्षा अपरिहार्यता जास्त असावी, खूप जास्त असावी. आणि मी मात्र कायम विचार करत राहीन की तिच्या व्यक्त होण्यात किती प्रचंड शक्यता दडलेल्या आसतील. नसेलही कदाचित, काय माहित.

डाकिया डाक लाया डाक लाया, पोस्टमन शौर्यकथा…..

मे  09, 1999, 0930 वाजता

जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो. हा खास कलेक्टर साहेबांची डाक हाताळणारा विभाग होता, आत गेलो ते एकटे बशीर मियाँ बसले होते त्यांनी मला पाहताच उठून एक खुर्ची आणली अन म्हणाले,

“आइये आइये साब बैठिये कैसे आना हुआ”.

“कुछ नहीं ये साहब का रजिस्टर्ड था”.

“ओके ओके” म्हणतच बशीर मियाँनी डीस्पॅच रजिस्टर काढले, अन झटकन अक्नोलेजमेंट मला काढून दिली मी ती माझ्या बॅग मधे टाकली अन बशीर मियाँना म्हणालो,

“अच्छा मियाँ येतो मी”.

“बसा हो ज़रा कावाह मागवतो”.

“नाही नको तिकडे पोस्ट ऑफिसला काम आहे भरपुर”.
“ठीक आहे पोस्टमन बाबु भेटु परत पुढल्यावेळी वेळ काढून या”.

तिथून बाहेर आलो अन माझ्या मोटरसायकलवर मी परत माझ्या पोस्ट ऑफिसकड़े निघालो ऑफिसला पोचताच मी गाडी लावली अन हेलमेट काढून बेरे कॅप लावणारच होतो तितक्यात समोरून लांस नाईक विश्वंभर दास आला अन एक कड़क सल्यूट केला त्याला तोच परत देताच लगेच बोलला,

“सर इमरजेंसी ड्यूटी लगी है आपको मेजर साब ने अभी बुलाया है”

काय झाले असेल ह्या नवलात मी तड़क मेजर साहेबांच्या ऑफिसला पोचलो,रितसर दरवाजा टकटक करुन परवानगी घेतली अन आत जाऊन मेजरसाहेबांना सल्यूट केला तसे त्यांनी at ease केले अन बसायला सांगितले, बसलो तेव्हा ते म्हणाले,

“कैसे हो सुबेदार साब?”

“बस सर ठीक है , आपने बुलाया था सर??”

“येस येसsssss सुबेदार साब कुछ ऐसी ड्यूटी थी जो सिर्फ आप जैसा एक्सपीरियंस बंदा ही कर पायेगा”.

“मेरे लिए क्या ऑर्डर्स है सर??”

“आपको एक बॅग डिस्पैच रन करना है, श्रीनगर टु कारगिल,आज 09 तारीख है कल सुबह 0700 तक ये बॅग कर्नल.पुरी को डिस्पैच होगी कारगिल बेस कमांड में बॅग सिर्फ कर्नलसाब के हात में हैंडओवर होगी, कोई शक??”

“नो सर”

“सुबेदार साब लेटेस्ट रिपोर्ट कहती है की बकरवाल लोगोने कुछ बंदो को एलओसी रीजेस पर बैठा हुआ देखा है और उनकेपास सामान भी है, इसीलिए आपको थोड़ा ऐतियात से जाना होगा , और बचाव के लिए आप जिप्सी नहीं बाइक से जायेंगे ताकी आप स्पॉट न हो, मेल सेंसिटिव है आप बस इतना जानिये”

“हो जायेगा सर, मैं तुरंत निकल रहा हूँ”

“गुडलक सुबेदार साब”

“थैंक यू सर”

मे 09, 1999 , 1025 वाजता

मी प्रथम माझ्या क्वार्टरला गेलो सेंसिटिव पोस्टिंगमुळे मी एकटाच राहत होतो. जायच्या अगोदर मी ऑफिस मधुनच घरी फोन केला अन थोड़ा कमनिमित्त बाहेर जातोय आता थेट पुढल्या आठवड्यात बोलु हे घरी कळवले. क्वार्टर मधे जाऊन मी माझे बॅगपॅक भरले त्यात इमरजेंसी राशन म्हणजे चिक्की बिस्किट ग्लूकोज़ डबा अन एक एक्स्ट्रा बिसलरी भरली अन तड़क ऑफिसला आलो तोवर, लांस नाईक दास ने माझी यशवंती घोड़ी उर्फ़ रॉयल एनफील्ड 500 तयार करुन ठेवली होती , त्याला विचारले

“तयारी ओके है दास?

“सर 2 जेरीकॅन्स पेट्रोल साइड फ्रेम में दोनों तरफ चढ़ाये है, पंक्चर किट पीछे वाले राइड पाउच में है, पानी और ड्राय राशन भी भर दिया है एक्स्ट्रा ब्रेक क्लच और अस्क्लेटर केबल्स भी रखवा दिए है”

हे म्हणतानाच त्याने बाइक चार्ज चे पेपर दिले त्यावर सही करुन मी अधिकृत रीत्या ती नखशिखांत ओजी उर्फ़ ऑलिव ग्रीन रंगवलेली घोड़ी ताब्यात घेतली. त्याचे ब्रेक अन क्लच चे ताण अन प्ले चेक केले अन दास ला इंस्ट्रक्शन दिली

“2 2 एक्स्ट्रा हेडलाइट और टेल लैंप बल्ब भी ले लो स्टोर से और ठीक से पॅक कर के बॅक पाउच में रखवा दो”.

“ठीक साबS ” म्हणत तो सुसाट स्टोर कड़े सुटला.

तोवर मी आत जाऊन लॉकर रूम मधे माझा ऑफिशल यूनिफार्म काढला अन कामोफ्लाज कॉम्बैट ड्रेस चढ़वला, छातीवर वेल्क्रो ने नावाची पट्टी लावली “विश्वास”. पायात डीएम शूज चढ़वले माझी बेरे लावली अन बाहेर आलो, येता येता कोत मधे जाऊन मी रजिस्टर मधे सही करुन एक 9mm बरेटा पिस्टल अन 4 मैग्ज़ीन ताब्यात घेतले, पिस्टल कापड़ी पट्टयात अड़कवलेल्या होल्स्टर मधे खोचली अन बाहेर आलो ते हाती हेलमेट धरून दास उभाच होता, मी समोर जाताच त्याने सल्यूट केला अन हेलमेट ताब्यात दिले मी त्याला सल्यूट रिटर्न केला बेरे काढून माझ्या बॅकपॅक मधे टाकली अन हेलमेट चढ़वले, अन जासुद काम करायला तयार झालो.

बाइकच्या उजव्या हाताला वैष्णो देवीची लाल सोनेरी चुनरी बांधली होती तिला नमस्कार केला, डाव्या हैंडलला लेह मॉनेस्ट्री ने दिलेला थांगका बांधला होता त्याला स्पर्श करुन हात छातीला लावला, अन सणसणुन किक मारली ते आमची यशवंती जिवंत होऊन फुरफरु लागली.

09 मे, 1999, 1100 वाजता

“जय हिंद साब”.

“जय हिंद दास” म्हणून मी गियर टाकला पहिला अन सुसाट निघालो. श्रीनगर शहरातले वेगवेगळे भाग तिथे तिथे मिळेल तश्या ट्रॅफिक ने मी कमी जास्त गतीने कापत होतो दूर गावात कुठेतरी रोजच्याप्रमाणेच कुठलेतरी आंदोलन झालेले दिसत होते, ते समजायचा एकमेव मार्ग म्हणजे दंगा करणाऱ्या लोकांनी टायर जाळले की उठणारा काळाकुट्ट धुर त्या धुराकडे एकवार नजर वळवुन मी परत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले अन चांगली 60 ची स्पीड पकडली, पण हे सुख मला जास्तकाळ लाभणारे नव्हते कारण शहरी वस्ती संपली तसाच राखाडी करड़ा रंग असलेला रस्ता उर्फ़ लद्दाख रोड सुरु झाला, मे महिन्याची सुरुवात म्हणजे बहुतांश बर्फ वितळलेला तरीही थोड़े थोड़े पॅच शिल्लक असलेला असा तो असमंत होता, तापमान -3℃ ते 15℃च्या मधे फिरत असते दिवसाच्या वेळेनुसार सद्धया सोसल असे तापमान होते खड़बड़ीत म्हणण्यापेक्षा थोड़ी कच्ची अन मधेच डांबराचे पॅच उडलेली सड़क असल्यामुळे मी गती आता कमी करुन जवळपास 40च्या स्पीड ने पुढे चालू लागलो, साधारण श्रीनगरच्या बाहेर 30 किमी आल्यावर मला गार वारे बोचु लागले तसे मी लेफ्ट इंडिकेटर देऊन गाड़ी थांबवली थोड़े पाय मोकळे केले अन बॅगपॅक मधुन जाड ऑलिव ग्रीन जॅकेट काढून चढ़वले त्याची चेन गळ्यापर्यंत ओढून मी पुर्ण पॅक झालो मग परत पुढे सुटलो. थोड्याचवेळात मी वायुल पार केले अन आता थोड़ा लयीत आलो होतो. जवळपास दीड तास झाला होता निघुन, आता पुढे अजुन 3 तास वर सोनमर्ग तिथून 4 तास पुढे कारगिल मग मी मोकळा असा विचार येईपर्यंत पहिले विघ्न आले मागच्या चाकातुन एकदम फुसकन आवाज आला, झाला प्रकार समजायला मला वेळ लागला नाही परत एकदा गाड़ी थांबली अन मी यांत्रिकपणे पंक्चर काढत बसलो. टोटल 20 मिनट तिथे घालुन मी परत पुढे निघालो तेव्हा 1350 वाजले होते, अजुन सोनमर्ग 3 तास लागणारच होते मी जवळपास 30 35 च्या स्पीड न पुढे सरकू लागलो सोनमर्ग पासुन अंदाजे 38 ते 40 किमी असताना ऊंची जाणवू लागली सोनमर्ग 2650 मीटर ऊंचीवर होते अन श्रीनगर जवळपास 1580 मीटर तरी बरं सतत इकडे काम करुन माझे शरीर ह्या हवामान अन ऊंचीला अडॉप्ट झाले होते. हा महीना मेचा होता अन बर्फ वितळु लागले होते कुठे छोटे ओघळ तर कुठे ओढ्याच्या आकारात डीपफ्रीजर मधे ठेवलेले असते तितक्या तापमानाचे पाणी वाहत होते. खाली सिंधुमातेला भेटायला जाणारी उसळती अवखळ बाळेच होती ती जणू पण त्यांच्यामुळे एक लफ़ड़े झाले होते ह्या जलधारा फ़क्त निसर्गाचे नियम पाळतात त्यांना फ़क्त गुरुत्व वापरून वरतुन खाली जाणे होते. मग त्यांना मज़्ज़ाव करणाऱ्या सड़का दगड शिला ह्यांना त्या धारा चिरून ढकलुन पुढे पुढे सरकतात, त्यांना नीट मार्ग द्यायला बॉर्डर रोड्स आर्गेनाईजेशनची माणसे चर खोदतात धारांचा अभ्यासकरुन वाटा बनवतात पण नादिष्ट वांड पोरांचा अन त्यांच्या खेळांचा भरोसा देता येत नाही तसेच ह्यांचे ही असते जो रस्ता आवडेल त्यावर दौड़त सुटतात, सोनमर्ग पासुन अंदाजे 30 किमी वर एका वळणावर मी असाच फसलो तिथे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याने एक रोड पॅच अपल्यासोबत खाली नेला होता अन तश्या त्या वाहत्या ओढ्यात मी बुलेट घातली, वाहत्या पाण्यात पुढचे चाक ओढले जाऊ लागले इतपत त्याची गती होती त्याच दरम्यान समोरील चाकाच्या खाली एक वाटोळा दगड यायला अन मागच्या चाकाखालील चिखल सरकायला एकच गाठ पडली अन गाड़ी डाव्याबाजुला कलली! माझं नशीबच थोर म्हणायला हवे म्हणून गाड़ी डावीकड़े पडलो उजवीकडे पड़ता पाणी अन गाडी सोबत मी ही खाली नदीमातेच्या कुशीत गेलो असतो, डावीकड़े गाडी कलताच मी ओणवा फेकला गेलो अन आपण दंडवत घालतो तसे धपकन पाण्यात पडलो उणापूरा 5 बोटे खोल ओहोळ अन त्यात मी पालथा पडलेलो खाली असलेली दगड माती खचकन रुतली अन तोंडी गढुळ पाणी गेले, धडपड करत मी उठून उभा राहिलो पाणी थुंकले जरा सावरलो अन स्वतःकडे पाहिले तर तळहातात दगडाची एक कपची शिरून रक्त येत होते अन उजवा गुड़घा दुखत होता पण एकंदरित मी ठीक होतो, आता फ़क्त एक प्रॉब्लेम होता मी नखशिखांत भिजलेलो होतो तितक्यात मला मेलबॅगचा विचार आला म्हणून मी यांत्रिकपणे बॅकपॅकला हात लावला तर नाशिबाने ती शाबुत होती, गाड़ीकडे पाहता तिलाही काही खास अपाय झाला नव्हता मी परत गाडीजवळ आलो अन ती उभी केली उभी करताच ती सुरु करायला बघु लागलो 5 6 किक्स मधे गाड़ी सुरु झाली अन मी पुढे निघालो , भिजल्यामुळे मात्र आता भयानक हिव भरू लागलं होतं, वरती उन होतं थोडं थोडं पण हवा जोरात सुरु असल्यामुळे मला कापरं भरू लागलं होतं हाताची बोटे सुन्न पडू लागली होती. मी तड़क ओले हातमोजे काढून पिळले अन परत चढ़वले अन हात झटकुन बोटे गरम करायचा प्रयत्न करु लागलो, पण ते काही जमेना म्हणल्यावर मी शिस्तीत गाडी कडेला लावली अन पहिले उड्या मारल्या भरपुर आता नाकाचा शेंडा बधीर झाला होता ओला यूनिफार्म मी काढला पुर्ण ताकद लावुन पिळला अन परत चढ़वला आता होईल ते बघु म्हणून मी पुढे निघालो, सुन्न पडत असलेले हात पाय अन चेहऱ्यामुळे माझी गती आता 20 25 ची झाली होती. कपडे चिखलात रॅड झाले होते. मी सोनमर्गच्या शेड्यूल्ड टाइम पेक्षा जवळपास तासभर मागे होतो पण माझा निरुपाय होता. तरीही मी गती वाढवू लागलो कारण मी टाइम बाउंड डिलीवरी वर होतो. अंदाजे 1730 ला सोनमर्ग दिसू लागले तसे मला थोड़ा हुरूप आला समोर जाता मला एक बॉर्डर रोड्स आर्गेनाइजेशनची चौकी दिसली तिथे मी गाडी थांबवली तशी तिथे राहणारी मजूर मंडळी अन त्यांचा मुकादम असलेला एक जेसीओच असणारा माणुस माझ्याकडे आले, ओजी जामानिमा पाहून त्यांनी मला ओळखलेच होते नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी मला आत नेले चहा दिला अन मी तिथल्याच एका शेकोटी समोर बसकण मारली. गरम चहा अन थोड़ी ऊब पोटी जाताच मी परत एकदा त्या मित्रांचा निरोप घेऊन पुढे निघालो. निघताना त्यांना विचारले पुढे कारगिल पर्यंत रोड कसा आहे हो? त्यावर ते म्हणाले की आम्ही थोड़ाबहुत बंदोबस्त केला आहे पण पुढे पर्वतराजाची जी इच्छा असेल ती! तसे मी हसून पुढे निघालो, मी सोनमर्ग पार केले तेव्हा जवळपास अंधार झाला होता पहाड़ी भागात लवकर अंधारुन येते तरीही 1830 म्हणजे आता मात्र खासे अंधारुन आले होते म्हणून मी गाडीचा हेडलाइट लावला अन माफक गतीने तरीही काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो, सोनमर्ग ते बालाथल अंतर मी सहज पार केले नॉर्मल गतीने अगदी ज्याची भीती होती ते बालाथलचे झिगझेग घाट सुद्धा शिस्तीत पार पडले आता मी द्रासच्या वाटेला लागलो होतो, पुढचा सहा तासाचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक तरीही साहसी प्रवास ठरणार होता हे मला तेव्हा माहीती नव्हते. द्रास पासुन 5 किमी अगोदर मी अतिशय निवांत जात होतो गाड़ीची टिपिकल बुलेटची धगधग वगळता आवाज नव्हता नाही म्हणायला वरती आकाशात निव्वळ सड़ा पडू लागला होता ताऱ्यांचा. प्रदुषण नसलेल्या ह्या भागात तारे सवाष्णीच्या कुंकवासारखे दिसतात एकदम ठसठशीत. अश्या वातावरणात मी वाया गेलेला वेळ भरून काढायला एक्सीलरेटर पिळु लागणार इतक्यात, हलकासा “कुईंईईई” असा आवाज आला अन मला काही समजायच्या आत रस्त्याच्या डाव्या बाजुला 35 ते 40 फुटांवर भयानक स्फोट झाला .सहज क्रियेने मी बुलेट उजवीकडे घातली अन रस्त्याच्या उजव्या बाजुला एक खळगा होता पाणथळ असा तिथे घुसलो. डोके गरगरत होते कान बधीर होऊन गेले होते दचकल्यामुळे ह्रदय बरगड्या तोड़ते की काय इतक्या जोरात धड़धड़त होते. परत एकदा मी ओलागच्च झालो होतो गाड़ी त्या डबक्यात अन खळग्यात उजवीकडे कलंडली होती, पाठीवरले बॅगपॅक काढले अन आधी मेल बॅग चेक केली ती ओके होती. थोड़ा सावरत होतो तसे मी ज्या पाऊलवाटेने खाली उतरलो होतो तिकडे परत एकदा स्फोट झाला अन चिखल माती बारके दगड, चिपा ह्यांचा मला अभिषेक झाला. अन एकदम डोक्यात प्रकाश पडला!.

शेलिंग!! पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे , बकरवाल , रिजेस सामान, माणसे, एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! झुंजरके साधुन हरामी पाकडे डाव साधत होते, कारगिलचं युद्ध अक्षरशः सुरु होताना पाहणारा मी पहिला मनुष्य होतो, मी गुमान बिसलरीची बाटली काढली एक घोट पाणी प्यालो, तसा परत एकदा धुडुमधड़ाम आवाज आला फ़क्त या वेळी तो दिवाळीतल्या सुतळी बॉम्ब सारखा आला बहुदा शेल थोड़े दूर पडले होते मी क्रॉलिंग करत रस्त्याच्या पातळीला आलो इकडे तिकडे पाहता अंदाजे 100 मीटर दूर धूळ बसताना दिसली, नवी इंफॉर्मेशन, पाकिस्तानी भारताच्या गर्दनीची नस असणारा हाईवे तोडू इच्छित होते.होय!! नॅशनल हाईवे 1 डी ! अन त्यावर द्रासच्या वाटेला असलेला मी आर्मी पोस्टल सर्विस कोरचा सुबेदार विश्वास प्रभाकर बांदेकर.मी परत क्रॉलिंग करत खाली आलो आता ठराविक अंतराने आर्टिलरी शेल्सचा आवाज येऊ लागला, लगेच मनाने गणित बांधले,कुठल्या गन्स असतील बॅटरी कशी ऑपरेट होते आहे हे सुटत नव्हते गणित कारण मी आर्टिलरीचा माणुस नाही मी तर साधा डाक ड्यूटी रनर होतो. आता काय करावे ह्यात मी मिनिटभर विचार केला अन पहिले गाड़ी कड़े मोर्चा वळवला गाडी ठीक होती फ़क्त उजवीकडली दोन्ही इंडीकेटर्स चुराडा झाली होती गाड़ी अजुन जवळून पाहता उजव्या बाजूला असलेल्या जेरीकॅन मधे एक बारीक अणकुचीदार दगड रुतुन पेट्रोल लीक होऊ लागले होते. क्षणभर विचार करुन मी तो कॅन ओढला अन पेट्रोल रिकाम्या होऊ घातलेल्या गाड़ीच्या टाकीमधे ओतले अर्धे पेट्रोल त्यात बसले तरी कॅन मधे थोड़े होतेच मी माझ्या हातमोज्याचं मनगटाजवळ असलेलं कापड फाडलं अन लीक होत्या कॅन मधील बारीक़ छिद्रावर दाबून बसवलं, हा इलाज तर जमला होता आता अजुन एक प्रश्न होता माझ्या गाड़ीचा हेडलैंप अन टेललैम्प अगदी प्रखर जरी नाही म्हणला तरी अंधारात नक्कीच चमकला असता, आर्टिलरी कवर मधे जर एखादे शत्रूचे यूनिट पुढे सरकत असले तर मी त्याच्या तावडीत सापडू शकलो असतो , परत समोरची शॉकप अन साइड पेनल वर असलेली रिफ्लेक्टर स्टिकर्स सुद्धा चमकन्याचा धोका होता, काय करावे ह्या विचारात मला एक शक्कल सुचली मी सरळ ज्या पाण्याच्या थारोळ्यात बसलो होतो त्याच्या बुडाला हात घालुन खरवडले ते हाती थोड़ा मुलायम चिखल लागला मी तो चिखल सरळ रिफ्लेक्टर्स अन टेल लाइट वर फासला अन त्यांना conceal केले त्या नंतर तसाच चिखल हेडलाइटवर चोपड़ला फ़क्त मधे एक छोटेसे वर्तुळ सोडले जेणे करुन पसरणारा लाइट कंट्रोल होईल पण मला अंधुक रस्ता सुद्धा दिसत राहील, मी एक आर्मी पोस्टमॅन होतो मला घाबरुन चालणार नव्हते. माणसाचे मन विचित्र असते, ह्या क्षणी मला गोष्ट आठवत होती ती एका प्राचीन ग्रीक निरोप्याची, फिडिपेडिस त्याचं नाव, एथेंसचा राहणारा फेडिपेडिस धावत जाऊन सन्देशवाहन करत असे अथीनियान आर्मीचं एकदा असंच मैराथनच्या मैदानात असलेल्या युद्धभुमीपासुन त्याला एथेंस पर्यंत निरोप पोचवायचे काम त्याला मिळाले. निरोप बाका होता “मैराथन चे मैदान मारले आपण जिंकलो” हा निरोप एथेंस सिटी कौंसिलला न पोचला तर ते अज्ञानापाई शहर शरण करतील ते व्हायला नको म्हणून फिडिपेडिस धावत सुटला श्वास न मोजता कसलीच तमा न बाळगता धावत सुटला शेवटी एथेंस च्या दरवाज्यावर आला तेव्हा कोसळून पडला त्याला विलक्षण धाप लागली होती त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले “Rejoice we won” अन तिथेच तो फेडिपेडिस वारला होता. आजही लांब अंतरची धावण्याची शर्यत होते ती मैराथन म्हणावते ती फ़क्त फिडिपेडिसचा सन्मान अन त्याची आठवण म्हणून. आज मी ही फेडिपेडिस् झालो होतो, जीव गेला तरी बेहत्तर फ़क्त तो माझे एथेंस उर्फ़ कारगिल बेसलाच जायला हवा ह्या निश्चयाने मी तयार झालो चिखल माखुन गाडीचा कमांडो मी आधीच केला होता, अंगावर सुद्धा काहीच चमकदार नको म्हणून सर्वांगाला मी चिखल फासला बॅगपॅक परत एकदा पाठीवर आवळले अन सुसाट म्हणजे अक्षरशः सुसाट सुटलो. आता हल्ल्याची व्याप्ती लक्षात आली होती, येत होती गाड़ी चालवण्यात अनेक व्यवधाने येत होती हेडलाइट वरच्या चिखलामुळे रस्ता नीट दिसत नव्हता त्यामुळे मधेच कंबरतोड़ गचके लागत होते ते वेगळेच मधेच एखादे शेल सड़केजवळ आदळले की मी हेलपाटत गाडी परत उजवीकडे रस्त्याखाली घालत असे , एकदा तर हा वेग इतका होता की रस्त्यावर शेल आदळले अन त्याने जेसीबी काढतो तसा एक स्कूप काढला रस्त्याच्यामधुन डाव्या कोपर्यापर्यंत तेव्हा गाड़ी कंट्रोल करुन उजवीकड़े न वळवता आल्याने मी जिथुन रस्ता उखड़ला होता त्याच्या अगदी चिकटुन बोजड़ बुलेट काढली होती उड़नारी माती खड़े अंगावर असंख्य ओरखडे देत होते पण मला पर्वा नव्हती, कारगिल जवळ पोचलो तेव्हा ही धग अजुन जाणवली मला पण मला मागे वळायचे नव्हते, कारगिल बेस जवळ आलो तेव्हा मी अक्षरशः गलितगात्र झालो होतो, बेसच्या सेंट्री ने मला शीट्टी वाजवुन थांबवले तेव्हा मी भानावर आलो होतो, कदाचित युद्धज्वर ह्यालाच म्हणतात असे वाटते, सेंट्रीला चिखलात माखलेला मी ओळखु येइना तसे मी परिचय दिला अन कर्नल पूरी ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले तसे चार च्या चार सेंट्री बंदुकी खाली करुन धावत आले

“ओये अपना बंदा है ओये” म्हणत्या जवानाची ग्रेनेडियर्स लोगो लावलेली बेरे दिसली तेव्हा मी निश्चिन्त झालो होतो माझ्या अंगातून चार पाच ठिकाणहुन रक्त येत होते हाताची बोटे काळसर नीळसर पडली होती, पाय कान पाठ बधीर झाली होती पण बॅगपॅक घट्ट होती पाठीवर एका जवानाने माझे ओले हातमोजे काढून टाकले होते दुसऱ्याने बूट अन सॉक्स दोघे खसखसा चोळून माझे हातपाय गरम करत होते तोवर तिसऱ्या ने आत मॅसेज दिला रेडियोवर अन मला न्यायला जिप्सी आली रेडियो करणारा जवान माझी बुलेट घेऊन मागून आला अन थेट मी बेसच्या MI सेक्शनला आणलो गेलो होतो, तिथे एक खाट तयार होती आत रूम हीटर होता मला माझे कपडे बदलायला सांगुन तिथे निजवले गेले डॉक्टर ने अंगावर असलेले छोटे मोठे ओरखड़े जखमा नीट स्वच्छ करुन बांधल्या अन मी पडलो होतो तेव्हाच कर्नल पूरी आले ! रात्री साडे अकरा वाजता मी माझ्या इच्छित अधिकार्याला भेटलो ! जवळ पडलेल्या बॅगपॅक मधुन मी मेल बॅग काढून कर्नल साहेबांना दिली अन म्हणालो

“सर ये मुजाहिद नहीं है ये प्रॉपर आर्टिलरी कवर था सर द्रास से कारगिल के बीच में एनएच 1डी तोडा जा रहा है श्रीमान”

मे 09,1999 2330 वाजता मी जे करायला निघालो ते पुर्ण केले होते.

तेव्हा पूरी सर म्हणाले “बहुत बढ़ीया सुबेदार साब हम देख लेंगे अब आप सो जाएँ” औषधांच्या इफ़ेक्ट मुळे मला पण झोप आली सकाळी मला जाग आली ती आर्टिलरीच्या आवाजानेच पण जवळून आवाज येऊन सुद्धा कोणी गड़बड़ीत दिसत नव्हते अर्थ स्पष्ट होत्या भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या निरोप नीट पोचले होते.

एक पोस्टमन समाधानी होता.

समाप्त.

 

 
(कथा पूर्णपणे काल्पनिक, चित्रे जालावरून साभार)

सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉)
कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

तुझं काम होत असतं

चार्लीचाप्लीननं अनेकांना भुरळ घातली आहे आजवर. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रोजच्या जगण्यात तो क्षणभर का होईना समोर येतोच. म्हणजे तसा तो आपल्यातच असतो पण दिसत नाही, किंवा आपली नजर मेलेली असते म्हणूया, म्हणून आपल्याला तो दिसत नाही. कुणीतरी आपल्याला दाखवावा लागतो कान पकडून, तो बघ फेंगड्या पायाचा आभाळापर्यंत गेलेला चार्ली.

जिवलग मित्राचं प्रेम जुळावं असं त्यालाही वाटत असतं मनापासून, अगदी खरोखर. पण त्याबरोबर मनातलंही चुकून ओठावर येतं, मित्र हसण्याची भीती असते पण तरीही येतंच ते, आपसूक. धडक्या मित्रांच्या संगतीने लंगड्याने त्यांच्यात सामील व्हायचा खुळेपणाच तो.  “सपनी आसंल का रं फेसबुकवर” हे विचारल्यावर मित्रांच्या चेहेऱ्यावरचं उपेक्षेचं हसू पाहून तो पुन्हा मनाची समजूत घालतो. “हे आपलं नव्हेच गड्या, आपण कुणीच नाही, आपण प्रेमाचं स्वप्न पाहाणंदेखील पाप आहे” असं उर्मी पुन्हापुन्हा खोल पुरून टाकणारा, आणि तरीही चेहेऱ्यावर मात्र त्यातलं काही येऊ न देणारा..

एकदोनदा सपनीकडे चोरून बघतोही, पण नंतर स्वतःच शहाण्यासारखी मान वळवतो, तेवढ्यात सपनीनं कागद फेकल्यावर, पायात जनावर दिसावं तसा घाबरतो. साल्या कुठून आणलंस सुखाची नुसती चाहूल लागल्यावरदेखील हे अंगावर काटा आल्यासारखं घाबरणं.

मग आपलं हसं होऊ नये म्हणून असंख्य तऱ्हा करणारा आणि त्यामुळे जास्तच हास्यास्पद दिसणारा चार्ली. कित्तीवेळा स्वतःला समजावतो, हे खरं नाही, हे सुख माझं नाही, पण तरीही फरफट चालूच. एवढ्या ओरखडे मिळवण्याच्या आणि वागवण्याच्या सततच्या सवयीमुळेतरी अंदाज यायला हवा की नको तुला. तुझ्याकडे कागदामधे प्रेमाचे शब्द येत नसतात, फक्त नखं येत असतात, बोचकारणारी..

कोसळतो क्षणभर, वर्षानुवर्षे डोहाच्या तळाशी साठलेलं काही वर येऊ पाहातं, जीवाभावाचे मित्र क्षणात अनोळखी भासायाला लागतात, हुंदक्यांची उकळी एखादीच अनावधानाने, पुन्हा एकदा डोह शांत होतो. चार्ली स्वतःच्या फजितीवर स्वतःच खळखळून हसायला लागतो. “माझं तर लंगड्याचं कायबी असतं लगा, कुठं सपनी आन कुठं मी” हे तो स्वतःलाच पुन्हा एकदा बजावतो आणि हे सगळं इतक्या सराईतपणे करतो की नक्की डोहाच्या तळाशी काही आहे कि नाही याचा अंदाजही येऊ नये.

vlcsnap-2016-05-06-13h29m54s36

 

पुन्हा हुंदका येऊ नये म्हणून मित्रांकडे तोंड फिरवून फेंगडे पाय टाकत रस्त्याच्या मधून चालणारा चार्ली पाहिला का तुम्ही, वाटेत भेटलेल्या वठलेल्या उपेक्षितांना, हाका मारमारून “मी आहे” हे बजावून सांगणारा चार्ली. रस्त्यातल्या तीन वर्षाच्या मुलाकडूनही हूल खाणारा पण तरीही कसनुसं हसत पुढे जाणारा चार्ली.

पण चार्ली पूर्ण होतो तो एवढ्याने नाही, तो पूर्ण होतो तो त्याच्या दुर्दम्य आणि नितळ भलेपणामुळे. मघाचा हुंदका अजून विरला नसताना, मित्राला “ माझं सोड, पण तुझं यगळ हाय लेगा, तुझं काम होत असतं, आर्ची तुला नाय म्हनतच नसती, तू लिहून घे वाटलंच तर माह्याकडून” हे सांगणारा चार्ली दिसला का तुम्हाला…

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Join 19 other followers

Social