Home » मराठी

Category Archives: मराठी

Advertisements

पाकिस्तानच्या (भावी) इतिहासातील एक Turning Point

गेले काही आठवडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि इतर काही शहरात “तेहरिक लब्बैक या रसूल अल्लाह” (साधारण अर्थ – अल्ला च्या दुताला मानणार्यांची चळवळ) या संघटनेन धरण धरली होती. त्याची परवा – २७ नोव्हेंबर २०१७ ला सांगता झाली. ही धरण या संघटनेन थांबवावी म्हणून पाकिस्तानच्या केंद्र सरकारन या संघटनेबरोबर एक करार केला. हा करार पाकिस्तानच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

हा करार काय आहे ते पाहण्याआधी प्रकरण इथपर्यंत कस आल ते टप्प्याटप्प्यान पाहू.

पार्श्वभूमी

पाकिस्तान सरकार आणि लष्कर (खरतर फक्त भूदल. नौसेना आणि वायूसेनेला भूदल हिंग लावून विचारत नाही) यांच्यात देशाच नियंत्रण कोण करणार यावरून पाकिस्तानच्या निर्मितीपासून आजपर्यंत चढाओढ चालू आहे. गंमतीन असही म्हणतात कि जगात सगळ्या देशांकड आर्मी आहे पण पाकिस्तानात मात्र आर्मिकड एक देश आहे. तर नवाज शरीफ यांनी काही प्रमाणात लष्कराला पायबंद घालायचा प्रयत्न केला आणि त्यामुळ लष्करान पडद्यामागून सूत्र हलवून नवाज शरीफ यांची उचलबांगडी केली. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयान २८ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार नवाज शरीफ यांना कोणतही पद, संवैधानिक किंवा अगदी त्यांच्या पक्षाच अध्यक्षपददेखील, सांभाळायला अपात्र ठरवण्यात आलं. तद्नंतर शरीफ यांनी राजीनामा देऊन शाहीद खकन अब्बासी या त्यांच्या विश्वासार्ह सहकाऱ्याला पंतप्रधान केल. शरीफ यांच्यावर केस घालणाऱ्या इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (PTI) या पक्षाचादेखील हा विजय मानला गेला. गंमतीची गोष्ट म्हणजे नवाज शरीफ यांना पदच्युत केल ते भ्रष्टाचारात दोषी सापडल्याबद्दल नव्हे तर कुराणातील व्याख्येनुसार ते सादिक (सत्यवचनी) आणि आमीन (प्रामाणिक) नाहीत म्हणून. त्याबद्दल नंतर कधीतरी.

सुरवात

पंतप्रधान अब्बासी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल काम हातात घेतलं ते म्हणजे ज्या कायद्याच्या आधारे नवाज शरीफ यांना कोणतंही पद सांभाळता येणार नव्हत तो कायदाच बदलायचं. पण तो कायदा बदलायला बराच जोर लावावा लागणार होता जेवढा आता त्यांच्या पक्षाकड नाही. म्हणून त्या आधी अब्बासिनी निदान शरीफ यांना पक्षाध्यक्ष तरी बनता याव यासाठी एका कायद्यात सुधारणा हातात घेतली.

ज्या कलमा आधारे नवाज शरीफ यांना पक्षाध्यक्ष होता येणार नव्हत ते काढून टाकणारी सुधारणा मंजूर होऊन २ ऑक्टोबर रोजी राष्ट्राध्यक्ष मामनून हुसैन यांनी त्यावर सही केली आणि कायदा पारित झाला. हा कायदा पारित झाल्यान नवाज शरीफ यांचा स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष व्हायचा मार्ग मोकळा झाला.

थोडस धार्मिक

पाकिस्तानात अहमदी जमातीच्या लोकांना मुसलमान समजायचं नाही असा एक कायदा आहे. अहमदी जमातीमधे पैगंबरांना शेवटचा मसीहा (देवदूत) न मानता मिर्झा गुलाम अहमद याला शेवटचा मसीहा मानतात. मिर्झा गुलाम अहमद यानी १८८९ मधे (भारतीय) पंजाबमधील कादियान मधे या पंथाची स्थापना केली. त्यांच्या माशिदिना मशीद न म्हणता धार्मिक स्थळ किंवा प्रार्थना स्थळ असा उल्लेख अधिकृतरित्या केला जातो.

मुसलमान मतदारांसाठी वेगळी मतदार यादी आणि इतरांसाठी वेगळी मतदार यादी असते. निवडणूक अर्ज भरून देताना प्रत्येक मुसलमान उमेदवारान “मी अहमदी लोकांना मुसलमान मानत नाही” अस शपथेवर सांगतो अस लिहून द्याव लागत. असंच शपथपत्र पासपोर्टसाठी अर्ज करताना देखील लिहून द्याव लागतं.

वादाचा मुद्दा

नवीन पारित झालेल्या कायद्याच्या मसुद्यात “मी शपथेवर सांगतो (I solemnly swear)” च्या ऐवजी “माझा विश्वास आहे (I believe)” असा एक तांत्रिक बदल केला.

पाक

वादाचा मुद्दा – जुन्या अर्जातील शब्द

आणि या तांत्रिक बदलाबरोबरच थकीत कर्ज आणि इतर काही आर्थिक बाबी नमूद करण्यासाठी असलेली कलम काढून टाकली. याचा फायदा नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना होणार होता, किंबहुना हा सगळा घाटच त्यासाठी घातला होता. इथ जुन्या नव्या अर्जातील फरक बघता येईल.

यावर विरोधकांनी अशी आवई उठवली की सत्ताधाऱ्यानी पैगंबर शेवटचे मसीहा असण्याच्या कलमात बदल केला आहे आणि ते तस नाही अस मान्य केलंय. पाकिस्तानात हा फार जिव्हाळ्याचा विषय आहे.

ठिणगी आणि आग

हे कलम रद्द केल आहे अस म्हणून तेहरिक लबैक रसूल अल्लाह या संघटनेचा म्होरक्या खादीम हुसैन रिझवी यान आंदोलनाची हाक दिली आणि त्याच्या कट्टर समर्थकांनी आंदोलन सुरु केल. आधीच धर्मनिंदकांच्या विरोधात असणारे कायदे (blasphemy laws) कडक करा या आणि अश्या इतर अतिरेकी मागण्या असणाऱ्या आणि तसेच अतिरेकी समर्थक असणाऱ्या, या वयस्कर मुल्लाच्या हातात आयतंच कोलीत मिळाल.

त्यानी ५ नोव्हेंबरला लाहोर मधून पदयात्रा सुरु केली इस्लामाबादकड जाण्यासाठी. ती इस्लामाबादच्या जवळ पोचल्यावर पोलिसांनी थांबवली. तिथच त्यांनी धरण आंदोलन सुरु केल. त्याचबरोबर सार्वजनिक संपत्तीची नासधूस देखील चालू केली. सरकारन आधी केवळ धमक्या देऊन पाहिलं. तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापलीकड काही केल नाही. मग आंदोलकाबरोबर चर्चा करून पाहिली पण तेदेखील अयशस्वी ठरलं. शेवटी सैन्याला बोलवायचं ठरलं.

आंदोलक आणि लष्कर प्रेमसंबंध

पण पाकिस्तानी स्थळसेनाप्रमुखांनी (कमर जावेद बाजवा) सरकार आणि आंदोलक यानी चर्चा करून सहमतीन प्रश्न सोडवावा अस म्हणून सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवली. पण एकूण दबावामुळ शेवटी सैन्य तैनात करावच लागल. त्याही वेळेला आम्ही आपल्या लोकांवर शास्त्र उगारणार नाही अस जाहीर करून टाकलं. सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेच गुऱ्हाळ काही संपेना आणि आंदोलक हटेनात.

लष्कराच्या मध्यस्थीन करार

लष्कर आणि आंदोलक यापैकी कुणीच सरकारच ऐकत नव्हत आणि त्यामुळ हतबल झालेल सरकार कारवाईचे आदेशहि देऊ शकत नव्हत (कारण लष्कर जुमानतच नव्हत) आणि आंदोलकानाही तिथून उठवू शकत नव्हतं. शेवटी लष्करान मध्यस्थी केल्याच दाखवून सरकारला आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करायला लावल्या. यासाठी आंदोलक आणि सरकार यांच्यात एक करार करण्यात आला.

त्यातच लष्काराचा एक वरिष्ठ अधिकारी आंदोलकांना पैसे देत असतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

 

दूरगामी परिणाम करणारा करार

या करारावर सरकार आणि आंदोलकांच्या पुढार्याबरोबरच जामीनदार (guarantor) म्हणून पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आय एस आय च्या प्रतिनिधीन देखील स्वाक्षरी केली आहे तर लष्कराच्या प्रतिनिधीन मध्यस्थ म्हणून स्वाक्षरी केली आहे. याविरुद्ध पाकिस्तानातील अनेकांनी जरी निषेध नोंदवला असला तरी परिस्थिती तिळमात्र फरक पडण्याची अपेक्षा ठेवण चुकीच आहे.

निषेधाचे क्षीण आवाज

करारातील कलमं;

  1. केंद्रीय कायदा मंत्र्याचा राजीनामा (या बदल्यात हि संघटना त्याच्या विरोधात फतवा काढणार नाही अशी हमी)
  2. एक महिन्याच्या आत कायद्याच्या मसुद्यात बदल करणारी व्यक्ती शोधून काढून तिच्यावर कारवाई करण
  3. आंदोलकांविरुद्ध दाखल केलेल्या सर्व तक्रारी माग घेतल्या जातील.
  4. आंदोलकांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशी आणि कारवाई.
  5. आंदोलना दरम्यान झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसान भरपाई सरकारकडून केली जाईल.
  6. पंजाब सरकार बरोबर झालेल्या कराराची पूर्ण अंमलबजावणी

याबरोबरच इतरहि महत्वाच्या अटी सरकारन मंजूर केल्या आहेत ज्यात एका राज्याच्या कायदा मंत्र्याची चौकशी धर्मगुरूंची समिती करेल आणि तिचा निर्णय सरकारवर बंधनकारकअसेल, तसेच शाळेचा अभ्यासक्रम ठरवणाऱ्या समितीत धर्मगुरूंचा समावेश असेल अशा इतर अटींचा समावेश आहे.

फलनिष्पत्ती

ह्या सगळ्या प्रकारात लष्कराचा वरदहस्त असल्याखेरीज इतके दिवस आंदोलन करण आणि यशस्वी होण पाकिस्तानात एका सुमार संघटनेला शक्य नाही हे उघडच आहे. पण याचबरोबर आत्तापर्यंत निदान राजकीय पक्ष स्थापन करणे आणि निवडणुकी सारख्या प्रक्रियेतून जाण्याची पडणारी गरज आता नाहीशी होईल आणि फक्त पूर्णपणे उन्माद सुरु होईल. आधीच अतिरेकी विचारसरणी असलेल्या अनेक गटांना अधिक बळ मिळेल.

नवाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारायचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळेल याची त्यांच्या लष्करान पुरेपूर काळजी घेतली. त्याचबरोबर पुन्हा कुणी असा प्रयत्न केला तर त्याच काय होईल याचा संदेश देखील (परत एकदा) दिला. तिथल्या अल्पसंख्याकांना देश सोडणे किंवा धर्मपरिवर्तन करून त्यांच्यातील एक होणे किंवा मृत्यू पत्करणे असे तीन पर्याय उपलब्ध असतील.

पण भारतासाठी वाढीव डोकेदुखी ठरणारी गोष्ट म्हणजे अनेक गटाच्या मुल्लांना अत्यंत मुबलक आणि स्वस्त असा कच्चा माल म्हणजे माथेफिरू तरुण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील ज्याचा नजीकच्या आणि दूरच्या भविष्यकाळात केवळ त्रासच होईल. पाकिस्तानाच्या लोकशाहीत असलेली उरली सुरली धुगधुगी संपून जाईल आणि उरेल ते कलेवर भारतासाठी ब्रम्हसमंध (मुल्लासमंध) जन्माला घालेल.

Advertisements

गाणे – एक गुणगुणणे

दिल की तनहाईको आवाज बना लेते है…
दर्द जब हद से गुज़रता हैं… तो गा लेते है !
तो गाsss लेते है, हं…, गाsss लेते है ….

शाहरुख खान आणि पुजा भट्ट , बरोबर नासीरसाब आणि अनुपम खेर अशा दिग्गजांचा एक अतिशय पडेल आणि बकवास चित्रपट ‘चाहत’, त्यातले एवढे एक गाणेच काय ते लक्षात राहीले होते. गाणे सुद्धा फार काही छान होते अशातला भाग नाही. पण सानू आणि अन्नू या जोडगोळीने खरोखर मेहनत घेतली होती गाण्यावर. अर्थात या गाण्याचे खरे शक्तीस्थान होते ते म्हणजे निदा फाजलीसाहेबांचे अप्रतिम शब्द !

सर्वसामान्यांच्या जगण्यातले गाण्याचे, गुणगुणण्याचे, संगीताचे महत्त्व, स्थान स्पष्ट करणारे शब्द. उगीच नाही संगीताला पंचमवेद म्हटले जात. सगळी वेदना, विवंचना, दुःख , काही काळासाठी का होईना पण त्याचा विसर पाडण्याची ताकद, ते सामर्थ्य गाण्यात, गुणगुणण्यात असते. याचा अनुभव लहानपणापासून घेत आलेलो आहे मी. मन बेचैन, अस्वस्थ असलं की नकळत काहीतरी गुणगुणायला, स्वत:शीच गायला लागतो मी. मग ते गुणगुणणे काहीही असू शकते.

लताबाईचे एखादे गाणे असेल, आशाची एखादी तान असेल, तलतची गझल असेल, श्रेयाची एखादी धुन्द करून टाकणारी गाण्याची ओळ असेल किंवा मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चा जप असेल. पण ते गुणगुणणे सुरु झाले की काही क्षणातच मन शांत व्हायला लागते. अर्थात हे बेसिक मेडिसिन असते मन शांत करण्यासाठी. खरे उपचार नंतर होतच असतात. कारण मन शांत, समाधानी नसेल तर जगातली कुठलीच गोष्ट तुमच्या समस्येचे, आपत्तीचे समाधान किंवा निराकरण करु शकतं नाही. ती सुरुवात, मनाला शांत करण्याचे ते पाहिले साधे, सोपे साधन असते गाणे, गुणगुणणे.

जनरली होते काय की मूड खराब असेल किंवा मनावरचा ताण वाढला की नकळत हृदयाचे ठोके जलद पडायला लागतात. त्याचा परिणाम शरीराला आणि मनाला जाणवतोच. अशावेळी त्या ताणावर, त्या समस्येवर उपाय शोधण्याआधी हृदयाची वाढलेली धडधड़ कमी करणे आवश्यक असते. काही जण त्यासाठी एक ते शंभर आकड़े मोजतात. रैंचोसारखे लोक ऑल इज वेल म्हणून मनाला शांतवण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतांश लोक , अगदी ज्यांना गाता गळा नसतो ते सुद्धा काहीतरी गुणगुणण्याचा प्रयत्न करत ताण घालवण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही अतिशय सोपी व् आनंददायी पद्धत आहे. अगदी डॉक्टर लोक सुद्धा गरोदर स्त्रियांना सतत काहीतरी गुणगुणत राहण्याचा सल्ला देतात. गरोदर महिलांनी गाणे, गुणगुणणे गर्भातील मुलासाठी चांगले असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरातील चांगले, आनंदी हार्मोन्स स्रवतात त्याचबरोबर गर्भातील मुलाबरोबर मातेचे एक वेगळे नाते निर्माण होते. असेही कुठेतरी वाचले होते.

निदासाहेब लिहितात…

आपके शहर में हम ले के वफ़ा आये हैं
मुफ़लिसी में भी अमीरी की अदा लाये हैं
हो जो भी भाता है ओsss
जो भी भाता है उसे अपना बना लेते हैं
दर्द जब हद से गुज़रता है तो गा लेते हैं ….

आनंद देताना संगीत तुम्हाला तुमची जात, धर्म विचारत नाही. तुमचा आर्थिक , सामाजिक दर्जा विचारत नाही. तुम्ही गरीब असा वा श्रीमंत ते सगळ्यांना सारखाच आनंद देते.

मागे कधीतरी नौशादसाहेब एका मुलाखतीत म्हणाले होते की ‘मौसिकी फ़कीर को भी बादशाह बना देती है!‘ आणि यात काहीही चुकीचं नाहीये. त्या काही क्षणात तुम्ही तुमच्या मनाचे राजे असता. सगळ्या समस्या, विवंचना बाजूला ठेवून तो आनंद, ती बेफिकिरी जगण्याचे सामर्थ्य गाण्यात, गुणगुणण्यात सहज मिळून जाते.

मौसिकी दिल की आवाज़ है , दिल से सुनिए , है ग़ज़ल मीर की, ख्याम की सुनते रहिये , गाते रहिये !

गाणं, गुणगुणणं हां आपल्या जगण्याचा एक आधारभूत घटक असतो, रादर असावा. म्हणजे जगणे जरी सोपे होत नसले, तरी ते सोपे करण्यासाठी झगड़णे मात्र नक्कीच आपोआप सोपे व्हायला लागते. शेवटी ‘कट्यार’ मधले खाँसाहेब सदाशिवला देतात तो आशिर्वाद परमेश्वराकडून सर्वांसाठीच पसायदानासारखा मागून घ्यावासा वाटतोय.

“गाते रहो जीते रहो !”

© विशाल विजय कुलकर्णी

“मिठावरच्या कराची कहाणी आणि The Great Hedge of India”

काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपुर्वी म्हणु हवं तर, सकाळी सकाळी आशिषचा फोन आला. आशिष माझा शाळेत असल्यापासुनचा मित्र, सद्ध्या साहेब लंटनला असत्यात. प्रचंड उत्साही माणुस, वाचनाचं भयंकर वेड. सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास म्हणजे त्यावेळी तिथे बहुदा सकाळचे सहा वगैरे वाजलेले असणार. मी चाट पडलो, च्यायला हा माणुस एवढ्या लवकर कसा काय उठला? त्यापेक्षाही मोठा धक्का वाट बघत होता माझी….

“अबे विशल्या, झोपलोच नाही बे काल रात्री.”

“का बे आश्या, नवीन पुस्तक मिळ्ळं की काय तुला?” आश्या रात्रभर जागतोय म्हणजे दुसरे काही कारण असुच शकत नाही.

“येस राजे, भन्नाट पुस्तक हातात पडलं काल. रात्रभर बसुन वाचून काढलं. तिथे मिळालं तर बघ. नाव आहे ” The Great Hedge of India” लेखक आहे “Roy Moxham”. वाचुन काढ.

आता आली का पंचाईत. आमचं इंग्रजी वाचन फार फार चेतन भगत वाचण्याच्या लायकीचं आणि हा माणुस चक्क रॉय मॉक्…मॉक्स…मॉक्सहॅम की काय (कसलं अवघड नाव, उच्चारतानाच फेफे उडतेय) नावाच्या लेखकाचं पुस्तक वाचायला सांगतोय. पण आश्याला नाही म्हणायचं म्हणजे स्वतःचीच लायकी काढुन घ्यायची, त्यापेक्षा “बरं, बघतो मिळालं इथे कुठे तर! म्हणुन रिकामा झालो. साहेबांनी फोन ठेवला. मी विसरून गेलो. दोन आठवड्यापुर्वी परत आश्याचा फोन…

“वाचलंस का बे?”

आता मात्र ठरवलं, गंभीरपणे शोधायला हवं आणि शोधायला लागलो तर मॉक्सहॅम साहेब आमच्या बेलापूरच्या लायब्ररीतच सापडले. म्हणलं चला विकत घेण्याचा खर्च वाचला. ते पुस्तक आणि डिक्शनरी जवळजवळ ठेवून वाचायला बसलो,. माझ्याही नकळत कसा त्यात गुंतत गेलो कळालेच नाही. एका ब्रिटीश भटक्या संशोधनाने भारतात येवुन घेतलेला , आता अस्तित्वात नसलेल्या एका अचाट गोष्टीचा शोध हा या पुस्तकाचा विषय आणि पुस्तक वाचताना मिळत गेलेली गोर्‍या साहेबाच्या या अचाट आणि अफाट करणीची माहिती थक्क करुन टाकत गेली. तेव्हाच ठरवलं यावर लिहायलाच हवं. (पुस्तक विकत घेण्याचा विचारही तेव्हाच पक्का झाला मनात.)

यावर लिहायचं म्हणल्यावर दोन वेळा पुस्तक वाचून काढलं आणि लक्षात आलं की याचं भाषांतर करणं ’अपने बस का रोग नही’. साहजिकच मग आधी गुगल आणि तिथुन विकिपिडीया कडे मोहरा वळवला. अपेक्षेप्रमाणे तिथे भरपुर आणि सोप्या शब्दातली माहिती हातात आली. आता मला तिचं मराठीकरण करणं सोपं होतं.

The Great Hedge of India

मुळात ‘हेज’ या इंग्रजी शब्दाला मराठी पर्याय शोधण्यापासुन आमची सुरूवात होती. आपण घराभोवती बोगनवेल किंवा तत्सम वनस्पतींचे जे दाट कुंपण उभे करतो त्याला बहुदा इंग्रजीमध्ये हेज म्हणत असावेत. कारण गुगलमध्ये हेज म्हणुन सर्च दिल्यावर अशीच चित्रे गुगलने मला दिली. नेमका एक दिवस मंदारचा फोन आला (जोशांचा नव्हे) माझा जुना मित्र, तो नागपुरचा आहे. त्याला विचारले तर म्हणाला, “भाऊ, त्याला बागड म्हणतात ना बेSSS!”

या फ़ोटोवरुन काहीच अंदाज येत नाही ना, असं काय विशेष मग या बागडीमध्ये.
ठिक्कै, पुढचे फ़ोटो बघितल्यावर येइल कल्पना ….

“बागड” भन्नाटच शब्द आहे नाही. अर्थात जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती यापेक्षाही भन्नाट आहे, अचाट आहे , अफाट आहे. जर मी तुम्हाला सांगितले की अशी जवळजवळ १४२९ मैल (म्हणजे साधारण २३०० किमी) लांबीची बागड भारतात उभी केली होती, ती सुद्धा जवळपास १२ फुट उंचीची (३.७ मिटर) आणि जवळपास तेवढ्याच रुंदीची….., तर तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण हे सत्य आहे, अशी २३०० किमी लांब आणि १२ फुट उंचीची बागड एकेकाळी भारतात अस्तित्वात होती.

बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.

आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल. ही बागड त्यावेळच्या इनलँड कस्टम्स लाईन (Inland Customs Line) चा एक हिस्सा होती. त्याकाळी १८०३ साली ब्रिटीशांनी भारतातील मिठाचे स्मगलींग रोखण्यासाठी आणि मिठाच्या वाहतुकीवर टॅक्स आकारण्यासाठी म्हणुन तत्कालिन पंजाबपासुन (मुलतान :आताचे पाकिस्तान) ते थेट ओरीसा प्रांतातील सोनापूर या गावापर्यंत ही इनलॅंड कस्टम्स लाईन उभी केली होती. एकुण २५०० मैल (४००० किमी) लांबीची ही कस्टम्स लाईन म्हणजे भारतीयांच्या हक्कांवर आणि मुक्त व्यापार नीतीवर लागलेल्या बंधनाचे अवाढव्य असे मुर्त स्वरुप होते. त्या काळी या कस्टम्स लाईनची चीनच्या भिंतीशी देखील तुलना केली गेली. मिठाची चोरी करणार्‍या तस्करांना रोखण्यासाठी म्हणुन ब्रिटीशांनी ही कस्टम्स लाईन डेव्हलप केली. १८७२ पर्यंत इनलँड कस्टम्स डिपार्टमेंटने कस्टम ऑफिसर्स, जमादार आणि गस्त घालणारे सामान्य रक्षक असे जवळपास १४००० च्या आसपास लोक या कस्टम्स लाईन्सच्या संरक्षणासाठी म्हणुन तैनात केले होते. सन १८७९ मध्ये मिठाच्या आंतरदेशीय आयात्-निर्यातीवर टॅक्स लावला गेला जो सन १९४६ पर्यंत लागु होता. हाच मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा काढली होती जिचा उल्लेख पुढे येइलच.

सन १७८० मध्ये तत्कालिन इस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल सर वॉरन हेस्टिंग्ज याने भारतातील मुख्य मिठ उत्पादकांना बंगालमध्ये कंपनीच्या नियंत्रणाखाली एकत्रित आणले. त्यामुळे तोपर्यंत मीठाच्या आयात्-निर्यातीवर असलेला ०.३ रुपये प्रति ३७ किलोचा कर थेट ३.२५ रुपये प्रती ३७ किलो (३७ किलो= एक मौंड/माउंड) इतका वाढला आणि त्यातून कंपनीला अगदी सन १७८४-८५ साली जवळपास ६२ लाख ५७ हजार चारशे सत्तर रुपयाची (त्या काळचे) निव्वळ करप्राप्ती झाली. त्यावेळच्या चलन दरानुसार हा कर म्हणजे दरडोइ साधारण २ रुपये प्रतीवर्ष (त्यावेळच्या मजुरांचा दोन महिन्याचा पगार) एवढा होता. मिठावर टॅक्स इतर प्रांतातही होते, पण बंगालमध्ये तो उच्चतम होता. साहजिकच हा टॅक्स वाचवण्यासाठी त्याची तस्करी, चोरी असे प्रकार सुरू झाले. बंगालच्या आसपासच्या राज्यातुन मिठ तस्करीच्या मार्गाने बंगालमध्ये आयात केले जावु लागले. त्यामुळे ब्रिटीशांच्या सरकारी मिठाच्या धंद्यावर, त्याच्या उत्पन्नावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला. हा परिणाम रोखण्यासाठी, या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी, त्याकाळी मग मिठाच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी व मिठ तस्करांना रोखण्यासाठी हि ४००० किमी लांबीच्या आंतरदेशीय सीमा रेषेची कल्पना अस्तित्वात आली. त्याकाळी ही कस्टम्स लाईन ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीच्या अखत्यारीत होती. नंतर १८५७ च्या बंडानंतर जेव्हा इंग्लंडच्या राणीच्या हातात सत्ता गेली तेव्हा ब्रिटीश सरकारने या कस्टम्स लाईन ची जबाबदारी आपल्या ताब्यात घेतली. या लाइनची एकुण लांबी तत्कालीन लंडन ते इस्तंबुल एवढ्या अंतराची होती.

वरील फ़ोटोत दाखवलेला हिरवा पट्टा म्हणजे ती विलक्षण बागड आहे. या फ़ोटोत तिच्या आकाराची, लांबीची प्रत्यक्ष कल्पना येते.
१८०३ मध्ये पंजाबपासुन ते थेट ओरिसापर्यंत ही कस्टम्स लाईन उभी करण्यात आली. दर २५ किमीवर कस्टम ऑफीसेस उभारण्यात आली. गस्ती सैनिक, कस्टम अधिकारी व हजारो मजुर या कामासाठी नेमण्यात आले. तत्कालीन पंजाबमधील तारबेला (मुलतान)पासुन ते ओरीसामधील सोनापूरपर्यंत पसरलेली कस्टम्स लाईन म्हणजे ब्रिटीशांच्या दुरदृष्टीचे आणि व्यवहारी, व्यापारी वृत्तीचे एक विलक्षण उदाहरण होते.

असो आपल्या लेखाचा विषय हा नाहीये, आपल्या लेखाचा विषय आहे तो या कस्टम लाईनचा हिस्सा असलेली जवळपास २३०० किमी लांबीची दाट वनस्पतींपासुन बनवलेली आणि १२ फुट उंचीची घनदाट, लांबच्या लांब बागड. नक्की साल नाही सांगता येणार आता पण साधारण १८४० च्या सुरुवातीला ही बागड उभारण्यास सुरूवात झाली असावी. १८६८ पर्यंत जवळ जवळ २९० किमी लांबीच्या बागडीची निर्मीती पुर्ण झाली होती. या बागडीत त्यावेळी सुक्या वनस्पतींचा म्हणजे काटेरी झाडे, वेली यांचा समावेश असे आणि त्यामुळे या बागडीला तेव्हा पांढर्‍या मुंग्या, (वाळवी), उंदीर, आग, वादळ, नैसर्गिक क्षय ई. कारणांमुळे विनाशाची भीती होतीच.

तत्कालिन आंतर्देशीय कस्टम्स कमिशनर अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम यांनी मांडलेल्या अंदाजानुसार साधारण एक मैल लांबीची सुक्या वनस्पतीपासुन उभारण्यात आलेली बागड तयार करण्यासाठी २५० टन सुकलेल्या वनस्पती, काटेरी झाडे, वेली असे सामान लागत असे. आणि ते किमान ५-१० किमी अंतरावरून वाहून आणावे लागत असे. आणि दरवर्षी किमान अर्ध्याहुन अधीक वनस्पती, काटे-कुटे बदलावे लागत. या सगळ्या गोष्टी आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणारा खर्च अफाटच होता. त्यामुळे जिवंत बागडीच्या कल्पनेला साकार रुप आले. म्हणजे केवळ काटे-कुटे, सुकलेल्या वनस्पती यांचे कुंपण उभे करण्यापेक्षा तिथे हिरव्या वनस्पतींची लागवड करण्याचा (रोपणी) विचार केला गेला.

अ‍ॅलन ऑक्टेव्हिअन ह्युम
१८६९ च्या सुरुवातीस जिवंत बागडीच्या लागवडीसाठी सर ह्युम यांनी वेगवेगळ्या काटेरी वनस्पतींची प्रायोगिक तत्त्वावर (कस्टम्स लाईन्सवर) लागवड करण्यास सुरूवात केली. त्यात सुरूवातीला भारतीय जातीची बोर, बाभुळ, करवंद अशा अनेक काटेरी झाडांची लागवड करण्यात आली.

जिथे इतर काहीच उगवत नसे अशा ठिकाणी बांबुची रोपे लावण्यात आली. जिथे जमीन खराब होती किंवा लागवडीच्या दृष्टीने कमी दर्जाची होती, तेथली माती खणून काढून तिथे चांगली माती टाकण्यात आली. या बागडीला नियमीत पाणीपुरवठा करण्यासाठी पावसाचे पाणी साठवण्यासाठी विहीरी बांधण्यात आल्या, आजुबाजुच्या खाड्यांचे पाणीदेखील बागडीसाठी म्हणुन वळवण्यात आले आणि त्याचबरोबर बागडीच्या पुर्ण लांबीएवढी पक्की सडक बांधून काढण्यात आली. उत्तरेतील सिंधू नदीच्या तीरावरील लाय्याहपासुन ते बुर्‍हाणपुरापर्यंत हि जिवंत बागड उभी करण्यात आली होती.

सन १८७० मध्ये सर अ‍ॅलन ह्युम यांच्याकडुन सर्व सुत्रे पुढील सहा वर्षाकरता जी.एच्.एम. बॅटन यांचाकडे गेली. बॅटनने बागडीची लांबी वाढवण्याचे कार्य आपल्या हातात घेतले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षात बागड आणखी १११.२५ मैल लांबवण्यात आली. बॅटनने आणखी एक महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे जिथे जिवंत बागडीची लागवड करणे शक्य नव्हते तिथे त्याने पक्के दगडी बांधकाम (भिंती) उभारल्या किंवा खोल असे खंदक बांधुन घेतले. ज्यामुळे १८७३ च्या दरम्यान आग्रा आणि दिल्ली यांच्या मधला भाग जवळ जवळ अभेद्य बनला होता. त्यानंतर बागडीची रचना (जागा) थोडीशी हलवुन ती नव्याने निर्माण झालेल्या आग्रा कालव्याच्या किनार्‍याने पुढे वाढवण्यात आली. सन १८७८. बॅटनच्या नंतर डब्लु. एस. हल्से यांनी बागडीच्या शेवटच्या टप्प्याचे काम जवळपास पुर्णत्वास नेले. या काळापर्यंत बागड तिच्या पुर्ण आकारास पोहोचली होती. या वेळेपर्यंत या पुर्ण वाढ झालेल्या बागडीची लांबी जवळजवळ १८०० मैल इतकी वाढली होती. हे काम असेच पुढे चालु राहीले. कस्टम लाईन आणि बागडीच्या रक्षणासाठी (देखभालीसाठी म्हणु हवे तर) खुप मोठ्या संख्येने मनुष्यबळाची आवश्यकता होती. या कामावरील वरीष्ठ अधिकारी सोडले तर इतर बहुतांश कर्मचारी हे भारतीयच होते. १८६९ मध्ये सरकारने जवळपास १४,००० लोकांची नियुक्ती या कामासाठी केली होती. इथेही ब्रिटीश अधिकार्‍यांनी आपले डोके चालवले होते. बागडीच्या भारतीय कर्मचार्‍यापैकी ४२% एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी हे मुस्लीम होते. त्यांना जाणीवपुर्वक त्यांच्या राहत्या जागेपासुन दुर अंतरावरील ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते जेणेकरून आजुबाजुच्या लोकांत त्याची फारशी लोकप्रियता वाढून त्याचा गैरवापर होवु नये. आजुबाजुच्या खेड्यातील लोकांशी सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी खेडुतांना या सीमेवरुन दोन पौंड मिठ मोफत (कुठलाही कर न आकारता) घेवुन जाण्याची मुभा देण्यात आली होती.

हे काम करण्यासाठी लोक उत्सुक असत कारण या कामासाठी त्यावेळच्या निर्धारीत पगारापेक्षा खुप जास्त असा पगार दिला जात असे. रक्षकांना रुपये पाच (५.००) प्रति माह आणि माळी लोकांना रुपये तीन (३.००) प्रति माह. पण सुरूवातीला या कर्मचार्‍यांना आपली कुटूंबे बरोबर बाळगण्याची परवानगी नव्हती. त्यांना घरे ही पुरवली जात नसत, ती त्यांनी आपापल्या खर्चाने माती, लाकुड यांच्या साह्याने बांधुन घ्यावी लागत. १८६८ मध्ये कस्टम्स खात्याने त्यांना आपली कुटुंबे बरोबर आणण्याची परवानगी दिली. हे कर्मचारी १२-१२ तासांच्या दोन समान पाळ्यांमध्ये काम करत. बागडीची पर्यायाने कस्टम्स लाईनची देखभाल आणि गस्त ही मुख्य कामे होती.

अधिकारी वर्ग मात्र मुख्यत्वे करुन ब्रिटीशच असे. खरेतर ब्रिटीशांनी भारतीयांना या पोस्टसाठी आकर्षित करण्याचे खुप प्रयत्न केले. पण या उच्च नेमणुकीसाठी उच्च दर्जाचे इंग्रजी बोलता येणे ही महत्त्वाची अट असल्याकारणाने त्यात ते अयशस्वी ठरले. कारण चांगले इंग्रजी येणार्‍यांना त्या काळात इतर नोकर्‍यात इथल्यापेक्षाही जास्त पैसा मिळत होता. प्रत्येक अधिकार्‍याच्या हाताखाली किमान १०० माणसे आणि ११० ते ३० मैलाच्या कस्टम्स लाईनची जबाबदारी असे, त्यामुळे काम अतिषय कष्टाचे आणि कठीण होते. विशेष म्हणजे अशा ठिकाणी तो अधिकारी हा एकटाच ब्रिटीश असे, दुसर्‍या एखाद्या ब्रिटीश व्यक्तीला भेटण्यासाठी त्याला त्याच्या अखत्यारीतील भाग ओलांडून जावा लागत असे. अशा कठीण परिस्थितीत ब्रिटीश अधिकारी त्यावेळी काम करत, खरे खोटे तेच जाणोत पण ते जर खरे असेल तर मग मनापासुन दाद द्याविशी वाटते आणि म्हणावसं वाटतं “उगीच नाही ब्रिटीशांनी अर्ध्या जगावर राज्य केलं!”

खरेतर बरेचसे ब्रिटीश अधिकारी ही कस्टम लाईन आणि अर्थातच बागडही नष्ट करायच्या विचाराचे होते. कारण तिच्यामुळे भारतीय उपखंडातील मुक्त व्यापारव्यवस्थेला तसेच पर्यंटनाला मोठ्या प्रमाणावर बाधा येत होती. ही सीमा रेषा खासकरून मिठ आणि साखर यांच्या आयात निर्यातीवर कर आकारण्यासाठी उभी करण्यात आलेली होती. साखरेवर तर उत्पन्नाच्या १०% इतका प्रचंड कर लावण्यात येत असे. पण त्या दरम्यानही भ्रष्टाचार आणि मनमानीपणाचा रोग या बागडीलाही होताच. बागड आणि सीमा रेषेवर तैनात अधिकारी मनमानी कारभार करत. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला होता. १८५७ च्या बंडाच्या दरम्यान काही ठिकाणी बागड तसेच सीमा अधिकार्‍यांच्या छावण्या जाळण्यातही आल्या होत्या. पण या सीमारेषेवर (बागडीवर) मिळणारे कराचे प्रचंड उत्पन्न इतर कुठल्याही समस्येकडे डोळेझाक करायला लावण्यास समर्थ होते. हि बागड तसेच सीमारेषा पुर्णपणे नष्ट करण्यापुर्वी भारतातील मिठाच्या सर्व उत्पादनावर ताबा मिळवण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न होता.जेणेकरुन मिठाच्या उत्पादनावरच कर लावता आला असता.

लॉर्ड मायो आणि लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कारकिर्दीत ही सीमा रेषा आणि बागडीचे अस्तित्व संपवण्याच्या कामाला वेग आला. नंतर लॉर्ड लिटन यांनी लागु केलेल्या कायद्यानुसार मिठावरील टॅक्स बर्‍यापैकी कमी करण्यात आला. बंगालमध्ये २.९० रुपये आणि शेष भारतात २.५० रुपये इतका. तत्कालीन सरकारचे भारतातील अर्थमंत्री सर जॉन स्ट्रॅशे यांच्या प्रयत्नांना यश येवून सन १९८० मध्ये मिठाच्या आयातीवरचा कर रद्द करण्यात आला आणि मुक्त व्यापाराला चालना मिळाली, ज्याचा फायदा मिठाची तस्करी नष्ट होण्यात झाला. सन १८८२ मध्ये लॉर्ड रिपन यांनी संपुर्ण भारतासाठी एकच दर लागु केला तो म्हणजे रुपये दोन (२.००) प्रति मौंड (३७ किलो). ज्यामुळे सरकारला जवळजवळ १.२ दशलक्ष रुपये दरसाल एवढे नुकसान सहन करावे लागले.

यामुळे मिठाच्या तस्करीला मात्र पुर्णपणे आळा बसला. म्हणजे गंमत बघा ज्या कारणासाठी बागड आणि एवढी विस्तृत सीमा रेषा उभी करण्यात आली होती, त्याच कारणाने ती नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली. जे तस्कर सीमा विभागातर्फे पकडले गेले त्यांना आठ रुपये (८.००) एवढा प्रचंड दंड आकारण्यात आला आणि जे तेवढा दंड भरु शकत नव्हते त्यांना सहा आठवड्याची कैद भोगावी लागली. म्हणजे व्यापारी ब्रिटीशांनी त्यातूनही पैसा कमावला. ब्राव्हो….! १८६८ पासुन १८७८ पर्यंत दहा हजाराच्या आसपास लोक तस्करीच्या आरोपाखाली पकडले गेले. लाच देवुन किई जण निसटले असतील त्यांची संख्या अनुत्तरीतच आहे. तस्करीचे अनेक प्रकार त्या काळात हाताळले गेले. सुरुवातीच्या काळात उंटावर किंवा घोड्यांवर मीठ लादुन शस्त्रांच्या जोरावर सीमा रेषा जबरदस्तीने ओलांडली जात असे. नंतर सीमा अधिकार्‍यांच्या भ्रष्ट वृत्तीचा फायदा घेवून लाच वगैरे देवुन करमुक्त भागातून मिठाची तस्करी करण्यात येत असे.

१८८८ साली चांदीच्या घसरलेल्या भावामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी मिठावरचा टॅक्स परत २.५० रुपये प्रति मौंड इतका वाढवण्यात आला. मिठावरचा कर हे आता ब्रिटीश सरकारसाठी निव्वळ कमाईचे साधन बनले ज्याने १९३० सालच्या मिठ सत्याग्रह आंदोलनाला प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी या मिठाच्या करामुळे आपली असहकाराची चळवळ चालु केली. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी जवळ जवळ ८०,००० जनतेच्या साथीने अहमदाबादपासुन ३२० किमी अंतरावर असलेल्या दांडी या मिठाचे उत्पादन होणार्‍या समुद्रकिनार्‍यावरील खेड्यात ब्रिटीशांचा मिठाचा कायदा मोडत मिठ सत्याग्रहाची सुरूवात केली.

बापुंची हि यात्रा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत दांडीयात्रा म्हणुन लोकप्रिय झाली. या मिठ सत्याग्रहाने जरी मिठावरील टॅक्स कमी अथवा रद्द करण्यात अपयश आले असले तरी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिला. असहकाराचा नवा मंत्र दिला. शेवटी १९४६ च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पं. जवाहरलाल नेहरुंच्या नेतृत्वाखालील तत्कालिन हंगामी सरकारने मिठावरील कर पुर्णपणे रद्द केली. खर्‍या अर्थाने आंतरदेशीय सीमा रेषा त्याचवेळी नष्ट झाली असे मानता येइल.

रॉय मॉक्सहॅम :

इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारली गेलेली असुनही या सीमारेषेचे किंवा बागडीचे वर्णन तत्कालीन इतिहासात किंवा ब्रिटीश अहवालातही आढळत नाही. १९ व्या शतकात, एक ब्रिटीश लायब्ररीयन कम Conservator रॉय मॉक्सहॅम याच्या वाचनात एकदा भारतातील या अवाढव्य बागडीची माहिती आली आणि रॉयने स्वतःला भारतातील या बागडीच्या संशोधनात वाहुन घेतले. या साठी रॉयने भारताच्या एकुण तीन फेर्‍या केल्या. प्रत्येक वेळी तो जवळपास ३-४ महिने भारतात राहीला. भारताच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या अवस्थेत, पडेल त्या परिस्थितीते भटकला. पहिल्या दोन दौर्‍यात त्याला या बागडीच्या सद्ध्याच्या अवस्थेबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. मुळात अशी काही गोष्ट अस्तित्वात होती हेच इथे कुणाला माहीत नव्हते. त्याच्या तिसर्‍या आणि शेवटच्या फेरीत मात्र रॉयला एक वृद्ध व्यक्ती भेटली जिने तिच्या तरुणपणात एका व्यक्तीला कस्टम्स लाईनबद्दल बोलताना ऐकले होते. तेवढ्याशा सुतावरुन रॉयने अक्षरशः स्वर्ग गाठला आणि त्या व्यक्तीला शोधुन काढले आणि शेवटी आता अस्तित्वात नसलेल्या कस्टम लाईन उर्फ सीमारेषेची जागा शोधुन काढली. त्यावेळी तिथे फक्त एक लांबपर्यंत पसरलेला उंचवटाच उरला होता. अखेरीस रॉयने आपल्या या संशोधनाची जगावेगळी कहाणी लिहून काढली आणि त्यामुळे जगाला कळाले की अशी काही अद्वितीय गोष्ट ब्रिटीशांनी भारतात उभी केली होती. अर्थातच त्यामागची काळी बाजुही उजेडात आली.

रॉय, तुझे प्रयत्न आणि जिद्द यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांवर केलेल्या एवढ्या मोठ्या अन्याय, अत्याचाराची ही कहाणी उघडकीस आली. तुझे शतशः आभार. पण त्या बरोबरच ब्रिटीशांच्या कल्पकतेलाही मनापासुन सलाम.

संदर्भ : द ग्रेट इंडीयन हेज : विकीपिडिया

तळटिप : पुस्तकातील उतार्‍यांचे भाषांतर करणे मलातरी शक्य नसल्याने मी विकीपिडियाचा आधार घेतला. त्यातही बर्‍याच चुका झाल्या असण्याची शक्यता आहे. सुचनांचे आणि वाचकांना या संदर्भात असलेल्या अन्य माहितीचे मनापासुन स्वागत. बाकी विस्तृत माहिती वरील दुव्यावर उपलब्ध आहेच.

विशाल कुलकर्णी.

‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ….

कविवर्य भा.रा. तांबे यांच्या याच संग्रहातील ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ हे स्वरांचे प्रचंड चढउतार असलेलं गाणं लतादीदींचं फार प्रिय आहे. हे गाणे लतादीदींचे प्रिय असण्यामागे  अजून एक महत्वाचे कारण आहे. दीदी पं. दीनानाथांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना गुरू मानतात. एक भालजी पेंढारकर आणि दुसरे मास्टर विनायक. मास्टर विनायकांबद्दल दीदी खुप आदराने बोलतात…

त्या सांगतात….

“वाचनाचा नाद मला कोल्हापूरला अक्कामुळे म्हणजेच इंदिरा या मावसबहिणेमुळे लागला. ती लेखिका होती. ती शरदचंद्र चटर्जी वाचायची. तिने मला पुस्तके आणून दिली. मी मुंबईला आले त्या वेळी विनायकरावांनी हिदी काव्याची पुस्तके दिली. भा. रा. तांबेंचं पुस्तक त्यांनीच मला दिलं. त्यांचं आवडतं गाणं होतं, ‘घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ तरी…’ ते गाणं त्यांनी मला शिकवलं. ‘उठा उठा हो सकळीक’ ही चाल त्यांचीच. त्यांनी माझ्यासाठी लेखराज शर्मा म्हणून कवी असलेल्या शिक्षकांची शिकवणी लावली. ते मला हिदी शिकवायला यायचे. त्यांच्यामुळे मी हिदीतील अनेक पुस्तके वाचली. प्रेमचंदांची सर्व पुस्तकं वाचली. त्यांनी मला दिनकर, मैथिली शरण, बच्चन, नरेंद्र शर्मा आदी कवींची पुस्तकं आणून दिली. मास्टर विनायकांमुळे मला काव्याची आवड लागली.”

या गाण्यातील ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या ओळीतल्या ’राज्य’ या शब्दाची जागा घेताना लतादीदी जी कमाल करतात त्यावरून लक्षात येते की एकहाती एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची कमाल कशी जमली असेल त्यांना! हे गाणं संगीतबद्ध करताना बाळासाहेब नक्की कुठल्या दैवी मनोवस्थेत होते ते त्यांनाच ठाऊक. पण त्यांच्या चालीने, त्यांच्या संगीताने या गाण्याला अगदी उच्चपदावर, धृवपदावर नेवून बसवलेले आहे.

असो, मी बहुदा आठवी-नववीत असताना माझ्या आईमुळे गाण्याचं वेड लागलं. अतिशय गोड गळा लाभलेली माझी आई, सतत काही ना काही गुणगुणत असते. पण तिचा देव-देव किंवा धर्म याकडे फारसा ओढा नाही. त्यामुळे लहानपणी भजने, भक्तीगीते वगैरे फारशी कानावर पडली नाहीत. तिच्या तोंडून आमच्या कानावर पडायची ती लताबाई, आशाबाई यांनी गायलेली हिंदी चित्रपटगीते. त्यातही आशाबाई तिच्या फ़ेव्हरीट. कदाचित माझ्या ’आशा प्रेमाचा’ वारसा तिच्याकडूनच आलेला असावा. पण लताबाईंची गाणी सुद्धा त्यावेळी तिच्या ओठावर असतच. त्यातच हे गाणे नेहमी असायचे.

घन तमी शुक्र बघ राज्य करी….”

आई गाणं शिकलेली नाही, पण यातला ’राज्य’चा उच्चार करताना ती नकळत अशी काही हरकत घ्यायची की आपोआप लक्ष वेधलं जायचं. एके दिवशी मी तिला विचारलंच ’घनतमी’ म्हणजे काय? त्यावर ती म्हणाली…

“घनतमी नाही, ते घन तमी असे आहे. घन म्हणजे दाट, घनदाट, निबिड (अरण्य) या अर्थाने आणि तम म्हणजे ’काळोख’ !  घनदाट,, निबिड अगदी डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा अंधार ! ”

त्यानंतर मी या गाण्यातील शब्दार्थाच्या वाटेला फ़ारसा गेलो नाही. जे सांगितलं तेच डोक्यावरून गेलं होतं. पण हे गाणं मात्र आवडायला लागलं होतं. खरं सांगायचं तर अगदी परवा-परवा पर्यंत , म्हणजे काही दिवसांपूर्वी दक्षिणाने ’ घन तमीचं रसग्रहण करशील का?’ असे विचारेपर्यंत मी या गाण्याचा कधी खोलवर जावून विचारच केला नव्हता. त्या दिवशी दक्षीशी बोलणे झाल्यानंतर एकदा निवांतपणे हे गाणं पूर्ण ऐकलं, लक्ष देवून ऐकलं आणि …….

तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की अरे हे गाणं आपल्याला बर्‍याचदा भेटत असतं रोजच्या आयुष्यात..

आरतीप्रभू एका कवितेत म्हणतात..

तो कुणी माझ्यातला तो घनतमीं ठेचाळतो
तरिही मी कां चालतो ? तो बोलतो ना थांबतो.

त्या ओळी वाचताना मी थबकतो आणि मग हेच जरा वेगळ्या शब्दात सांगणारे माझे सन्मित्र श्री. चारुदत्त कुलकर्णी यांची आठवण मला होते. अज्ञात या नावाने काव्यलेखन करणारे चारुदत्त उर्फ सी.एल. आपल्या एका कवितेत अगदी सहजपणे मनाची घालमेल, आर्तता व्यक्त करुन जातात…

आर्त आहे अंतरीचे जाहलो व्याकूळ मी
भावना लंघून गेल्या प्रीतओल्या संगमी
सावल्या बेधुंद झाल्या कुंद छाया घनतमी
समजले उमजे परी ना प्राण माझे संभ्रमी

आता जसजशी कविता समजायला लागलीय (आता कुठे सागरातला एखादा दुसरा थेंब हाती लागायला सुरुवात झालीये) तेव्हा भा.रा. तांब्यांच्या ‘घन तमी’ ची जादू तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे. मी आशाबाईंच्या गाण्याचा वेड्यासारखा चाहता असलो तरी लतादीदींच्या आवाजाचा भक्त सुद्धा आहे. खरंतर गाणं असो किंवा साधं बोलणं, लतादीदींचा स्वर आर्त, म्हणजे हृदयाच्या गाभ्यालाच हात घालणारा असतो. त्यांच्या स्वरात ही जादू असल्यामुळेच आजवर लतादीदींचा आवाज आणि त्या आवाजातील गाण्यांना चिरंतनाचा स्पर्श झालेला आहे. लतादीदींच्या आवाजातला शांत-सात्त्विक भाव म्हणजे थेट ज्ञानेश्वरीतल्या शांतरसाशी नातं सांगणारा आणि ज्ञानेश्वरी म्हणजे शांतरसाचं आगर. त्यामुळेच एके ठिकाणी अदभुत रसाची चुणूक दिसताच ज्ञानेश्वर म्हणतात- ‘शांताचेया घरा, अद्भुत आला आहे पाहुणोरा’ म्हणजे शांत रसाच्या घरी अद्भुतरस पाहुणा आला आहे. लतादीदींचा आवाज क्षणोक्षणी याची चुणूक देत राहतो जेव्हा त्या गातात…

“घन तमी …..”

असो… थोडंसं भा.रा. तांब्यांच्या या कवितेकडे वळुयात ?

इथे “घन तमी” हा शब्द एक प्रतिक म्हणून आलेला आहे. नैराष्याचे, खिन्नतेचे, हतबलतेचे काळेभोर ढग आयुष्यात बर्‍याचदा जगण्याची वाट अडवून उभे होतात. कधी-कधी एखाद्या आप्त स्वकियाचा मृत्युदेखील या उदासिनतेला कारणीभूत ठरु शकतो. तर कधी स्वतःच्याच मृत्युची चाहूल लागल्याने ‘जन पळभर म्हणतील….” अशी मनाची अवस्था झालेली असते. माझ्यामागे जग मला विसरणार तर नाही ना? ही भीती त्यात असते. अशा निराश, विरक्त होत चाललेल्या मनाला कविराज साद घालतात…

घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

इथे तांब्यांच्या रसिकतेला मनापासून दाद द्यावीशी वाटते. ते आपल्या कवितेतील उपमा, रुपके नेहमीच खुप सुचकतेने, रसिकतेने निवडतात, वापरतात. इथेच पाहा ना, “घन तमी ‘शुक्र’ बघ ‘राज्य’ करी ” ! शुक्राची चांदणी ही चंद्राच्या खालोखाल सर्वाधिक प्रकाशमान असल्याने काळोख्या रात्रीच्या वेळी चंद्राच्या अनुपस्थितीत तीच आकाशातल्या अंधुक प्रकाश देणा-या तारकांच्या जगावर राज्य करतांना दिसते. शुक्राच्या चांदणीचे वैशिष्ठ्य हे आहे की शुक्र हा ग्रहसुद्धा सूर्याच्या एक दोन घरे मागे पुढे चालत असतो, पहाटेच्या वेळी शुक्राचा तारा उगवला तर लवकरच सूर्योदय होणार असल्याची तो वर्दी देतो आणि रात्री तो मावळतांना दिसला तर झोपायची वेळ झाल्याचे दाखवतो. शुक्र हा ग्रह मध्यरात्री किंवा माथ्यावर आलेला कधीच दिसणार नाही.

‘काळोखातसुद्धा तो ‘शुक्र’ कसा ‘राज्य’ करतोय’ या ओळीतील ‘राज्य’ हा शब्द खूप काही सांगून जातो. केवळ एका समर्पक शब्दात प्रतिकूलतेतही चमकत राहण्याचा डौल आहे, तोरा आहे. हे भा.रा. तांब्यांचं वैशिष्ठ्य आहे. एकाच शब्दात अनेक गोष्टी साधायचं.

ये बाहेरी अंडे फोडूनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढूनी
रे मार भरारी जरा वरी

ये बाहेरी ‘अंडे’ फोडूनी ..! यातील ‘अंडे’ या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक असा की, तुझ्या मनाने  आलेल्या नैराष्यातून नकारात्मक विचारांचा जो एक गंडकोष निर्माण केलाय, तो फोडून तू बाहेर ये. दुसरा अर्थ जरा  तत्वज्ञानाच्या मार्गाने जाणारा आहे.  ‘अंडे’ म्हणजे देह, तनू, काया , ज्यात ते ‘आत्मा’रुपी सत्य, सत्त्व  वसलेले आहे. ‘मी’ म्हणजेच माझे शरीर ही ओळख पक्की झालेली असली की मृत्यूचे भय निर्माण होते.

माझे ‘अस्तित्व’ माझ्या शरीरावर अवलंबून नाही या मुलभूत सत्याचा एकदा बोध झाला की मृत्युची भीती आपोआपच नाहीशी होते.

या संदर्भात ओशोंच्या कुठल्यातरी पुस्तकात एक छान गोष्ट वाचली होती. समुद्रात एक लाट, वाहताना तिच्या लक्षात येते की प्रत्येक लाट किनाऱ्यावर जाऊन फुटतेय. पुढे येऊन ठेपलेला आपला ‘अंत’ पाहून ती लाट घाबरते. घाबरून तिने तिचा वेग मंद केला. शेजारून दुसरी लाट जात होती. तिने या लाटेला तिच्या उदास होण्याचं कारण विचारलं. या लाटेने खरं कारण सांगितलं. दुसरी लाट फेसाळत हसली. म्हणाली, ‘तू जोवर स्वतःला ‘लाट’ समजत आहेस, तोवर तुला फुटून नाश पावण्याचं भय वाटत राहील. स्वतःला लाट समजू नकोस, स्वतःला ‘सागर’ समज. तू आत्ता फुटून जाशील. पुन्हा तुझी एक लाट तयार होईल. ती देखील कधीतरी फुटेल. पण तरीही तू या समुद्राचाच एक भाग बनून राहशील.’

एका निराळ्या संदर्भात  आचार्य रजनीश म्हणाले होते, ‘जे स्वतःला ‘सागराची लाट’ समजतात ते पृथ्वीवर जन्म घेत राहतात. ज्यांनी स्वतःला ‘सागर’ मानलं ते इथे परत आले नाहीत. ते मुक्त झाले !’

फुल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल गळे, बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

प्रत्येक ओळ कशी सहजपणे आयुष्याच्या सार्थकतेवर भाष्य करतेय पाहा. पण मुळात आयुष्याची सार्थकता कशात असते हो? की खरोखर असं काही असतं तरी का? ‘जो आला तो जाणारच’ हे एकमेव त्रिकालाबाधित सत्य आहे. मृत्यू हेच अंतीम सत्य, तीच जीवनाची सार्थकता ! साधी-साधी उदाहरणे दिली आहेत तांब्यांनी. पहिल्या ओळीतल्या “रे खिन्न मना” ची ती उदासी कशातून आली असेल हे इथे स्पष्ट होते. हे कडवं नीट वाचलं तर इथे नाशाचा, मृत्यूचा उल्लेख प्रथम येतोय. फुलाच्या नष्ट होण्यात फळाचा जन्म दडलेला असतो हा निसर्गनियम आहे. एखादा वटवृक्ष डौलाने झूलत येणार्‍या-जाणार्‍या पांथस्थाला शीतल छाया देत असतो. पण केव्हा जेव्हा त्याचं ‘बीज’ रुजतं, जमीनीत मिसळून जावून नष्ट होतं , तेव्हा त्यातून नवा अंकुर जन्माला येतो, ज्याचं कालौघात एखाद्या डेरेदार वृक्षात रुपांतर होतं. ज्योतीच्या उजळून निघण्यासाठी तेलाचे जळणे अत्यावश्यक असते. किती साध्या, आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या साह्याने कविराज मृत्यूची गुढ संकल्पना विषद करताहेत पाहा. मुळात आपण मृत्यूची उगाचच भीती बाळगतो. मृत्यू हा विनाश नाहीये मित्रांनो. आत्मारुपी उर्जेचे एका स्वरुपातून दुसर्‍या स्वरूपात स्थित्यंतर म्हणजे मृत्यू. उर्जेचे अमरत्व टिकवण्यासाठी निसर्ग घडवून आणत असलेली एक सर्वसामान्य प्रक्रिया म्हणजे मृत्यू. निसर्गात अशा घटना सर्रास घडत असतात. नवी पालवी फुटण्यापुर्वी झाडावरचं जुनं जीर्ण पान गळून पडतं. त्याच्यासाठी कधी कुणी दहा दिवसाचं सुतक ठेवतं का? प्रियेच्या आवेगाने वाहत आलेली नदी समुद्रात विसर्जीत होणे हे तीचे मरणच असते पण म्हणून त्यासाठी निसर्ग दोन मिनीटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहतो का?

तसंच मानवी जीवनाचे सुद्धा आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय’ हेच सत्य. मग त्या नश्वर आयुष्याबद्दल अकारण आसक्ती आणि जगण्याला नवा आयाम प्राप्त करून देणार्‍या मृत्यूबद्दल अनासक्ती, किंबहुना भीती कशासाठी? मृत्यू हीच खरी चिरंतनता नव्हे का?

आता शेवटचे कडवे. या कवितेतील शेवटचे कडवे म्हणजे मृत्युविषयक तत्त्वज्ञानाचा कळस आहे. कविवर्य तांबे या ओळींमध्ये मृत्युला एका विलक्षण उंचीवर नेवून ठेवतात.

मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे हे हरीकरुणा !
आई पाहे वाट रे मना | पसरुनी बाहू, कवळण्या उरी

शब्द न शब्द जणु काही हिर्‍या-मोत्यांचे जडजवाहिर आहे. कविवर्य स्वतःलाच समजावतात – ‘ का घाबरतोस इतका मृत्यूला ? मृत्यू हे अमृताचे दार आहे. आत ‘आई’ तुझी वाट पाहत उभी आहे; तुला कुशीत घ्यायला !’ केवढी सुंदर कल्पना आहे. ‘हरिकरुणा’ , मृत्यूला ‘हरिकरुणेची उपमा देणारे कविराज इथे कविच्या भुमिकेतून बाहेर पडतात कधी आणि तत्त्वचिंतकाच्या भुमिकेत शिरतात कधी हे आपल्याही लक्षात येत नाही. साक्षात मृत्यूला ‘सुखाच्या दरवाजाची’ उपमा. खरंच आहे ना. भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांपासून मुक्त करत, निराकार, निर्विकार समाधानाचे, आनंदाचे सोपानच तर असते  मृत्यू. त्याला काय भ्यायचे, खरेतर दोन्ही बाहू पसरून त्या दारापलीकडे उभ्या असलेल्या ‘मुक्तीरुपी’ मातेकडे आनंदाने जायला हवे.

घन तमी शुक्र बघ राज्य करी

मला अशा वेळी ‘ये दुनीया मेरे बाबूलका घर….” म्हणणारा साहिर आठवल्याशिवाय राहवत नाही. अशा वेळी मला काकाचा ’आनंद’ आठवायला लागतो.., मृत्यूपंथाला लागलेल्या पण मनापासून मृत्यूच्या स्वागताला तयार असलेल्या ’आनंद’च्या मुखातून ’गुलजार’ सांगून जातात…

“मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
         दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
         ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको !”

ग्वाल्हेरचे राजकवि म्हणून ओळखले गेलेल्या कविवर्य भा. रा. तांबेंच्या कवितांमधून मृत्यू सदैव अशी देखणी रुपे, जगावेगळी रुपके घेवून भेटत राहतो. “नववधू प्रिया मी बावरते..” सारखी नितांतसुंदर कविता  वाचताना आपल्याला कुठे माहीत असतं की ही कविता ’मृत्यूवर भाष्य करते म्हणून ? याच कवितेच्या शेवटच्या ओळी उधृत करून कविवर्यांना मानाचा मुजरा करतो. आज भा.रा. तांब्याचे नावही नव्या पिढीतील किती जणांना माहीती नसेल. पण त्यांची कविता अमर आहे. त्यांचे शब्द चिरंतन आहेत.

शेवटी मृत्यू हेच एकमेव सत्य हे स्पष्ट करताना आपल्या ’नववधू…’ या कवितेतून कविवर्य भा. रा. तांबे सांगतात.

अता तुच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळे पळभर मात्र ! खरे घर ते !

पुढचा टप्पा…

“नववधू प्रिया , मी बावरते ; लाजते , पुढे सरते , फिरते !”

विशाल कुलकर्णी

११/१२/२०१४

एका धर्मगुरूचा खून आणि न घडलेले पोर्तुगीज मराठा युद्ध

वरकरणी किरकोळ भासणाऱ्या घटना दूरगामी राजकीय परिणाम घडवून आणतात हे जगाच्या इतिहासात पुन्हा पुन्हा आढळून आलेले आहे. सन १७५२ मध्ये पोर्तुगीज आणि फ्रेंचांमध्ये एका प्रतिष्ठित पोर्तुगीज कुटुंबाने एक गुलछबू पोर्तुगीज पाद्री आणि दोन आफ्रिकन गुलामांचे एका प्रेमप्रकरणावरून खून केल्याने पोर्तुगीज वसाहत आणि फ्रेंच वसाहत यांच्यात कसा बेबनाव झाला आणि त्याचा परिणाम मुघल, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी आणि मराठी साम्राज्यातील एका गटाने एकत्र येऊन पेशव्यांचा समूळ उच्छेद करण्याचा जो घाट घातला होता तो फिस्कटण्यात कसा झाला याबाबतचा एक किस्सा पोर्तुगीज आणि फ्रेंच साधनांच्या आधारे लिहिलेल्या इतिहासात आहे. गोव्यातील प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या पोर्तुगीज भाषेतील ‘PORTUGUESS E MARATAS’ या ग्रंथात या घटनाक्रमाचा धावता आढावा घेतला आहे. पिसुर्लेकर यांच्या या ग्रंथाचे पी. आर. काकोडकर यांनी इंग्रजी भाषांतर केलेले असून ते ‘THE PORTUGUESE AND THE MARATHAS’ या नावाने प्रकाशित करण्यात आलेले आहे.

पेशवे थोरले बाजीराव यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस मराठ्यांनी पोर्तुगीजांवर स्वारी करून त्यांच्या राज्याच्या उत्तर भागातील दीव-दमण व रेवदंडा वगळता सर्व भाग जिंकून घेतला, त्याच वेळी पोर्तुगीज राज्याच्या दक्षिण भागातही बऱ्याच मोठ्या भूभागाचा ताबा मराठे आणि सावंतवाडीकर भोसल्यांनी घेतला होता. वसईच्या पाडावामुळे पोर्तुगीजांच्या राज्यावर मोठे आर्थिक संकट आले होते हे सर्वश्रुत आहेच.

याच काळात पेशवे प्रबळ झाल्याने त्यांचे अनेक अंतस्थ शत्रूही निर्माण झाले होते. या शत्रूंनी थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पा यांचे निधन झाल्यानंतर डोके वर काढले आणि पेशव्यांचा बंदोबस्त कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. यातूनच मुघल, काही पेशवेविरोधक मराठी सरदार, फ्रेंच, सिद्दी  आणि पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन पेशव्यांचा उच्छेद करण्याचे राजकारण शिजले.

१७५१-५२ मध्ये सलाबतजंग हा महत्वाकांक्षी सरदार मुघल साम्राज्याचा दक्षिणेतील प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेस नियुक्त केलेला होता. त्याने ही योजना आखण्यात पुढाकार घेतला होता असे फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींमधील तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते.

सलाबतजंगाच्या मूळ योजनेत बहुधा त्याने पोर्तुगीजांना गृहीत धरलेले नसावे. त्याने फ्रेंचांच्या भारतातील गव्हर्नर जनरल मोन्स्युअर ड्युप्लेक्स (Monsieur Dupleix) आणि मुघलांच्या औरंगाबाद येथील तळावरील फ्रेंच सरदार मोन्स्युअर एम. बस्सी (Monsieur M. Bussy) यांच्याशी मसलत केल्यावर योजना आकारास येऊ लागली. या योजनेबाबतची माहिती ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy – The Journal on the Army conducted by Monsieur Bussy)’ या नॅशनल लायब्ररी ऑफ पॅरिस येथे जतन केलेल्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. या माहितीनुसार तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रांसिस्को दे अस्सीस दे तवोर (Francisco de Assis de Tavora) याने मराठ्यांनी जिंकून घेतलेला पोर्तुगिजांचा प्रदेश पुन्हा काबीज करण्यात फ्रेंचांची मदत व्हावी या उद्देशाने सन १९५१ च्या शेवटी फ्रेंचांशी संबंध वाढवले आणि सन १७५२ च्या सुरुवातीस बस्सी यांच्या सैन्यात सामील होण्यास काही पोर्तुगीज सैनिक पाठवले देखील होते. याबाबत फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्यात जी मसलत झाली त्याबाबत आल्फ्रेड मार्तीनिको यांनी त्यांच्या ‘Bussy and French India’ या ग्रंथात काही माहिती दिलेली आहे.

या संदर्भातील अनेक बाबी अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. परंतु ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy’ आणि ‘Bussy and French India’ या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार मराठी साम्राज्याच्या तत्कालीन महाराणी ताराबाई आणि तुळाजी आंग्रे हे देखील या मसलतीत सामील झाले होते. मार्क्वी दे तवोर याने ३० नोव्हेंबर १७५१ रोजी बस्सी आणि सलाबतजंग यांना या संदर्भात लिहिलेली पत्रेही उपलब्ध आहेत.

एवढी तयारी झाल्यावर सन १७५२ च्या सुरुवातीस सुरत भागात युद्धाला तोंड फुटले. मुघल सैन्य सुरतेच्या किल्ल्यात होते तर पेशव्यांचे सैन्य सुरत शहरात तळ ठोकून होते. युद्ध सुरु झाल्यावर ब्रिटीशांनी पेशव्यांशी हातमिळवणी केली तर सिद्दी आणि डच मुघलांना जाऊन मिळाले. त्यावेळी होळकरांची पथके बंगालात मोहिमेवर असल्याने पेशव्यांचे सैन्यबळ कमी होते. दोन चकमकींमध्ये पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर नानासाहेब पेशवे राखीव पथके घेऊन पुण्याबाहेर पडले. सैन्याची तोंडमिळवणी करण्यासाठी त्यांनी उत्तर कोकणात ठेवलेले सैन्यही बोलावून घेतले. त्याच दरम्यान दमाजी गायकवाडांनी साताऱ्यात ससैन्य तळ ठोकला.

मुघल, फ्रेंच आणि पोर्तुगीजांना पेशव्यांना नामोहरम करण्यासाठी चांगली संधी होती. परंतु त्याच वेळेस फ्रेंच आणि पोर्तुगीजांमध्ये वेगळेच नाट्य घडत होते. या नाट्याच्या केंद्रस्थानी होता १७५१ सालात झालेला एका पोर्तुगीज धर्मगुरूचा खून.

१३ मे १७५१ रोजी बारदेशात एका नदीत एका काळ्या माणसाचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक जखमा होत्या आणि पायास धोंडा बांधलेला होता. तपासात मृत व्यक्ती फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो या मोझांबिकमध्ये मुक्कामी असलेल्या पोर्तुगीज जहाजाच्या कप्तानाची गुलाम असल्याचे निष्पन्न झाले. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो हा दोम हेन्रिक दे नरोन्हा या प्रतिष्ठित पोर्तुगीज व्यक्तीचा जावई होता आणि त्याची बायको (दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुलगी) तिचा नवरा सफरीवर असताना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरातच राहत होती.

त्यानंतर काही दिवसांनी बारदेशातच एका घळीत शिरच्छेद केलेल्या दोन व्यक्तींची प्रेते सापडली. त्यापैकी एक जण गोरा होता तर दुसरा काळा होता. त्यांची ओळख दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा भाचा असलेला फादर अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो आणि त्या धर्मगुरूचा आफ्रिकी गुलाम अशी पटली. त्या दोघांना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी जाताना शेवटचे पाहिलेले होते.

दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याचा पुतण्या दोम जो दे नरोन्हा आणि अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो यांचा बालपणापासून स्वत:च्या मुलांप्रमाणे प्रतिपाळ केलेला होता. नंतर दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या मुलीचे लग्न फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्याशी झाले पण फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो वारंवार सफरीवर जात असल्याने ती अनेकदा दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरीच राहत असे. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याने तिच्या दिमतीसाठी एक आफ्रिकन गुलाम ठेवलेला होता.

अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याने दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्याशी असलेल्या घरगुती संबंधांचा वापर करून फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्या बायकोस भूल पाडली आणि तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्या उभयतांचे आपापसातील प्रेमसंदेश फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याचा पेद्रो हा आफ्रिकन गुलाम पोहोचवत असे.

या प्रेमप्रकरणाबाबत दोम हेन्रिक दे नरोन्हा याला त्याचा मुलगा दोम गिल याने सांगितले तेव्हा रागावून दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याच्या तीन मुलांबरोबर या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांचा काटा काढण्याचा कट केला. त्यांनी १२ मे १७५१ पेद्रोचा खून केला. नंतर १५ मे १७५१ रोजी अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याला दोम हेन्रिक दे नरोन्हाने त्याच्या घरी बोलावले. अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो त्याच्या गुलामासह दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी गेला तेव्हा दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा मुलगा दोम लुईस आणि अन्य दोघांनी त्यांचा खून केला.

खुनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही दोम हेन्रिक दे नरोन्हा आणि त्याची मुले दोम फ्रांसिस्को आणि दोम गिल यांना अटक केली. दोम लुईस मात्र चीनला पळून गेला. तपासात आरोपींचे कबुलीजबाब घेतले परंतु त्यांनी नंतर न्यायालयात जबान्या फिरवल्या.

मोन्स्युअर ड्युप्लेक्स याची बायको दोम हेन्रिक दे नरोन्हा याची नातेवाईक होती. तिने मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला त्याच्या प्रभावाचा वापर करून दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुक्तता करून घेण्याची गळ घातली. त्यानुसार मोन्स्युअर ड्युप्लेक्स याने मार्क्वी दे तवोर याच्याशी पत्रव्यवहार केला परंतु मार्क्वी दे तवोर याने त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर ३० जानेवारी १७५२ रोजी त्याने पोर्तुगालच्या राजाला या संदर्भात जो वृत्तांत पाठवला त्यात मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला बायकोच्या ताटाखालचे मांजर असेही म्हणले.

या घटनेमुळे फ्रेंच वसाहत आणि पोर्तुगीज वसाहत यांच्यात दुरावा निर्माण झाला. परिणामी बस्सीने जेव्हा पेशव्यांच्या विरोधातील मोहिमेसाठी मार्क्वी दे तवोरकडे १,००० बंदुकांची मागणी केली तेव्हा मार्क्वी दे तवोरने निम्म्याच बंदुका पाठवल्या. वस्तुतः योजनेनुसार मुघल, फ्रेंच आणि मराठा सरदारांनी पेशव्यांच्या विरोधात उठाव करताच पोर्तुगीज आणि सिद्दीनेही उठाव करायचा होता परंतु मार्क्वी दे तवोरने सलाबतजंगास लिहिलेली पत्रे बस्सीने सलाबतजंगापर्यंत पोहोचवली नाहीत. नंतर मार्क्वी दे तवोरने सिद्दीच्या मार्फत सलाबतजंगाशी पत्रव्यवहार सुरु केला पण तोवर पाउस सुरु झाल्याने कोकणात जमिनीवर किंवा समुद्रात युद्ध करणे अशक्य झाले.

दरम्यान पेशव्यांनी मुघल सैन्याबरोबर सुरु असलेल्या लढाईतून माघार घेतली आणि साताऱ्याकडे मोहरा वळवून दमाजी गायकवाडना जेरबंद केले आणि अंतर्गत विरोधकांचा बंदोबस्त केला. त्यानंतर पेशव्यांनी सलाबतजंगाचा मोठा भाऊ गझेडी खान याला फितवले आणि गझेडी खान दिल्लीहून सैन्य घेऊन सलाबतखानावर स्वारी करून आला. या अनपेक्षित घटनांमुळे बाजी सलाबतजंगावरच उलटली आणि पेशव्यांचा आपोआप बचाव झाला.

 

अव्यक्त

प्रत्येक नात्याला नाव असलंच पाहिजे अशी एक साधारण धारणा असते. कुणाची असते तर माझी असते, आणि माझी का असते, तर माझी जडण घडण तशी झाली. प्रत्येक नात्याला नाव दिल म्हणजे मग, जाणीवपूर्वक म्हणा नाहीतर नकळत म्हणा पण त्या नात्याच्या नावाशी आपण इमान राखण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याकडून तसा प्रयत्न होतो. हा निसरडा रस्ता असतो. हे नाव आणि त्याच्याशी इमान राखण्याचा प्रयत्न, बरेचदा स्वतःशीच होणाऱ्या द्वंद्वाला  कारणीभूत ठरतात. दिलेल्या नात्याशी इमान राखायच की भावनेशी आणि हा मग सगळाच गुंता होऊन बसतो.

तीच आणि माझं नात नक्की काय आहे हे मी आजपर्यंत ठरवू शकलो नाही. इथ ती “ती” असल्यामूळ आणि मी “तो” असल्यामूळ त्याला नाव दिल नाही तर एकंदरीतच गुन्हा ठरतो. त्यामुळ आमच्या या नात्याला देता येईल अस आणि प्रचलित व्यवस्थेत कशालाही धक्का लागणार नाही अस नाव द्यायचा प्रयत्न देखील काहींनी करून झाला पण काही जमल नाही.

आमची ओळख झाली त्याला बरेच वर्ष झाली, नक्की किती तेही आठवत नाही. ती लक्षात राहिली त्याच कारण तीच सौंदर्य. ती देखणी होतीच. पण तेवढंच एक कारण नव्हत हे कळायला अजून बराच काळ जावा लागला. इतर चार चौघींसारखीच आज्ञाधारक पतिव्रता, माता आणिक काय काय असतील नसतील ती सगळी विशेषण तिला लावता आली असती, येतील. पण त्याच्यापलीकड तीच काही अस्तित्व असेल आणि मला ते कळायचा काही संबंध येईल अस कारणही नव्हत. पण तस झाल खरं. ओळख झाल्यानंतर काही काळानी मी योगायोगान तिच्या शहरात आलो.

ती एवढी देखणी असून त्या माणसाची तिन नवरा म्हणून कशी निवड केली हा मला पडलेला पहिला प्रश्न होता तिच्या बाबतीत.

पहिल्यांदाच घराबाहेर पडल्यान बावचळून गेलो होतो. फोनवरून कधीतरी बोलत असू. तेव्हा एखाद्या अनुभवी शिक्षकान प्रेमान विद्यार्थ्याला सल्ला द्यावा तशी ती तेव्हा वागत असे अस आज वाटत. पुढ कधीतरी गप्पांच्या ओघात तिला वाचनाची आवड आहे कळल.

हळू हळू तिच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पदर उलगडत गेले.

सुसंस्कृत आणि सुशिक्षित आई वडील. ती स्वतः इतक शिकलेली.

पण बहीणीन प्रेम विवाह केल्यामुळ आई वडिलांच नाक कापल गेल. वडील वरिष्ठ जागेवर असल्यान समाजात (जातीत) नाव पत होती, त्याला धक्का लागलेला. त्यातच जर हीन देखील बहिणीच्या पावलावर पाउल टाकल तर कुठ तोंड दाखवायची सोय उरणार नाही. म्हणून आलेल्या पहिल्याच स्थळाला वडिलांनी होकार दिला. त्याला चांगली स्थिर नोकरी होती, भविष्याची चिंता नव्हती, पदर देखील जुळला होता. शेती, घर अश्या लग्न करताना आधी विचारात घेतल्या जाणाऱ्या सगळ्याच बाजू जमेच्या होत्या, त्यामुळ चिंता नव्हती.

लग्न केल्यावर किंवा खरतर झाल्यावर, लगेचच तिला भल्या थोरल्या आणि माणसांनी भरलेल्या घरात एकटीला टाकून तो निघून गेला. चौकोनी सुखवस्तू कुटुंबात आणि वडलांच्या लाडात सगळ आयुष्य गेलेल्या तिला हे जग नवीनच होत. बावरलेली ती आणि आजू बाजूला सगळ जगच अनोळखी. ती आणि ते घर हे एकमेकांच्यावर झालेल्या संस्काराविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. नवी सून अशी कशी असू शकते असा घराला प्रश्न पडलेला तर घर अस कस असू शकत हा प्रश्न तिला पडलेला.

कुणाशी बोलायची सोय नाही. कधी एकदा यातून बाहेर पडते अस तिला होऊन गेल, पण तेही शक्य आहे की नाही माहित नाही. कधी मधी नवरा येऊन जात असे. ते चार क्षण तरी सुखाचे असतील अस तिला वाटलं, पण लवकरच तीही आशा मावळली. तो आला तरी सासरच्या लोकांपुढ आणि नवऱ्यापुढ बायकोनी फार बोलायचं नाही असे संस्कार त्याच्यावर झालेले. त्यामुळ त्याच्यापुढ आणि त्याच्याशी बोलायची उरली सुरली शक्यता संपली. मग जेव्हा कधी माहेरी जाईल तेव्हाच तोंड उघडायची संधी.

बहीणीन जाती बाहेर लग्न केल असल तरी तिच्याशी बोलता येत असे. पण लग्न झाल्यावर, तिन जातीला बट्टा लावलाय अस मत असलेल्या त्यान त्या बोलण्यावर आणि त्यां बहिणीच अस्तित्व मान्य करण्यावरच बंदी घातली. पुढ मग त्याच्या नोकरीमुळ शहरात येऊन राहायाची सोय झाली आणि निदान गर्दीतल्या एकटेपणापासून सुटका झाली. आता हा एकटेपणा एकटीचा एकटेपणा होता.

पण त्याचा स्वभाव फारच संशयी होता. आता तो तसा होता की तीच शिक्षण, विचार करण्याची क्षमता, रूप यांनी निर्माण केला होता हे कळण अवघड आहे. पण ते कळलं म्हणून फार फरक पडणार आहे असही नाही म्हणा. पण त्यामुळ तिला कधी विश्वासात घेतलच नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीत देखील. घरी कधी येणार हे देखील कधीच सांगत नसे. नेहमीच अचानक. ह्या अविश्वासामूळ तिला कुणाशी बोलायची देखील चोरी. जीव टाकणे वगैरे लांबच्या गोष्टी. माहेरचा काय असेल तेवढाच आधार. पण त्यांना देखील इकड यायला मोकळीक नाही.

हळू हळू एकटीच्या एकटेपणाची आणि अविश्वासापायी आलेल्या भीतीची देखील सवय झाली. पुढ थोडी मोकळीक मिळाल्यावर मग पुन्हा एकदां पुस्तकांशी ओळख झाली. आमच्या सगळ्या चर्चा अगदी सहज साध्या विषयांपासून ते गंभीर विषयांपर्यंत होत. मग वाढत्या वयातली मुलं असो की विश्वास पाटलांच महानायक असो. अगदी मनमोकळ बोलत असे ती. मीच त्या गप्पातल्या ह्या आमच्या अनामिक नात्याला न्याय देऊ शकलो का असा मला प्रश्न पडतो.

मला एका स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या आणि तरीही नवऱ्याच्या माग गेलेल्या एका बायकोन लिहिलेलं पुस्तक तिन भेट दिल होत. मी ते बराच काळ वाचलंच नाही. वाचल्यावर पुन्हा विचार करू लागलो की हे तिन हेतुपुरस्सर तर दिल नसेल. अगदी तशीच नसली तरी बरीचशी थोडाफार तो प्रकार होताच. यशस्वी नवरा, चार चौघात नाव, मान मरातब आणि पैसे असल्यावर मिळणारे इतर फायदे. पण या सगळ्यात ती कुठंच नव्हती.

हेच पुस्तक तिला का आवडाव आणि मी इतक्या वर्षांनी तिला सांगितल्यावर तिला वाटणार आश्चर्य हेच सांगत होत का? माहित नाही. बहुतेक ते कधीच कळणार नाही आणी मी विचारायला जाणार नाही. कधी कधी काही गोष्टी न कळलेल्याच चांगल्या असतील. जोपर्यंत हे अव्यक्त आहे तोवर त्यात असंख्य शक्यता आहेत.

पण तिच्या अव्यक्त असण्यात मात्र शक्यतांपेक्षा अपरिहार्यता जास्त असावी, खूप जास्त असावी. आणि मी मात्र कायम विचार करत राहीन की तिच्या व्यक्त होण्यात किती प्रचंड शक्यता दडलेल्या आसतील. नसेलही कदाचित, काय माहित.

डाकिया डाक लाया डाक लाया, पोस्टमन शौर्यकथा…..

मे  09, 1999, 0930 वाजता

जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो. हा खास कलेक्टर साहेबांची डाक हाताळणारा विभाग होता, आत गेलो ते एकटे बशीर मियाँ बसले होते त्यांनी मला पाहताच उठून एक खुर्ची आणली अन म्हणाले,

“आइये आइये साब बैठिये कैसे आना हुआ”.

“कुछ नहीं ये साहब का रजिस्टर्ड था”.

“ओके ओके” म्हणतच बशीर मियाँनी डीस्पॅच रजिस्टर काढले, अन झटकन अक्नोलेजमेंट मला काढून दिली मी ती माझ्या बॅग मधे टाकली अन बशीर मियाँना म्हणालो,

“अच्छा मियाँ येतो मी”.

“बसा हो ज़रा कावाह मागवतो”.

“नाही नको तिकडे पोस्ट ऑफिसला काम आहे भरपुर”.
“ठीक आहे पोस्टमन बाबु भेटु परत पुढल्यावेळी वेळ काढून या”.

तिथून बाहेर आलो अन माझ्या मोटरसायकलवर मी परत माझ्या पोस्ट ऑफिसकड़े निघालो ऑफिसला पोचताच मी गाडी लावली अन हेलमेट काढून बेरे कॅप लावणारच होतो तितक्यात समोरून लांस नाईक विश्वंभर दास आला अन एक कड़क सल्यूट केला त्याला तोच परत देताच लगेच बोलला,

“सर इमरजेंसी ड्यूटी लगी है आपको मेजर साब ने अभी बुलाया है”

काय झाले असेल ह्या नवलात मी तड़क मेजर साहेबांच्या ऑफिसला पोचलो,रितसर दरवाजा टकटक करुन परवानगी घेतली अन आत जाऊन मेजरसाहेबांना सल्यूट केला तसे त्यांनी at ease केले अन बसायला सांगितले, बसलो तेव्हा ते म्हणाले,

“कैसे हो सुबेदार साब?”

“बस सर ठीक है , आपने बुलाया था सर??”

“येस येसsssss सुबेदार साब कुछ ऐसी ड्यूटी थी जो सिर्फ आप जैसा एक्सपीरियंस बंदा ही कर पायेगा”.

“मेरे लिए क्या ऑर्डर्स है सर??”

“आपको एक बॅग डिस्पैच रन करना है, श्रीनगर टु कारगिल,आज 09 तारीख है कल सुबह 0700 तक ये बॅग कर्नल.पुरी को डिस्पैच होगी कारगिल बेस कमांड में बॅग सिर्फ कर्नलसाब के हात में हैंडओवर होगी, कोई शक??”

“नो सर”

“सुबेदार साब लेटेस्ट रिपोर्ट कहती है की बकरवाल लोगोने कुछ बंदो को एलओसी रीजेस पर बैठा हुआ देखा है और उनकेपास सामान भी है, इसीलिए आपको थोड़ा ऐतियात से जाना होगा , और बचाव के लिए आप जिप्सी नहीं बाइक से जायेंगे ताकी आप स्पॉट न हो, मेल सेंसिटिव है आप बस इतना जानिये”

“हो जायेगा सर, मैं तुरंत निकल रहा हूँ”

“गुडलक सुबेदार साब”

“थैंक यू सर”

मे 09, 1999 , 1025 वाजता

मी प्रथम माझ्या क्वार्टरला गेलो सेंसिटिव पोस्टिंगमुळे मी एकटाच राहत होतो. जायच्या अगोदर मी ऑफिस मधुनच घरी फोन केला अन थोड़ा कमनिमित्त बाहेर जातोय आता थेट पुढल्या आठवड्यात बोलु हे घरी कळवले. क्वार्टर मधे जाऊन मी माझे बॅगपॅक भरले त्यात इमरजेंसी राशन म्हणजे चिक्की बिस्किट ग्लूकोज़ डबा अन एक एक्स्ट्रा बिसलरी भरली अन तड़क ऑफिसला आलो तोवर, लांस नाईक दास ने माझी यशवंती घोड़ी उर्फ़ रॉयल एनफील्ड 500 तयार करुन ठेवली होती , त्याला विचारले

“तयारी ओके है दास?

“सर 2 जेरीकॅन्स पेट्रोल साइड फ्रेम में दोनों तरफ चढ़ाये है, पंक्चर किट पीछे वाले राइड पाउच में है, पानी और ड्राय राशन भी भर दिया है एक्स्ट्रा ब्रेक क्लच और अस्क्लेटर केबल्स भी रखवा दिए है”

हे म्हणतानाच त्याने बाइक चार्ज चे पेपर दिले त्यावर सही करुन मी अधिकृत रीत्या ती नखशिखांत ओजी उर्फ़ ऑलिव ग्रीन रंगवलेली घोड़ी ताब्यात घेतली. त्याचे ब्रेक अन क्लच चे ताण अन प्ले चेक केले अन दास ला इंस्ट्रक्शन दिली

“2 2 एक्स्ट्रा हेडलाइट और टेल लैंप बल्ब भी ले लो स्टोर से और ठीक से पॅक कर के बॅक पाउच में रखवा दो”.

“ठीक साबS ” म्हणत तो सुसाट स्टोर कड़े सुटला.

तोवर मी आत जाऊन लॉकर रूम मधे माझा ऑफिशल यूनिफार्म काढला अन कामोफ्लाज कॉम्बैट ड्रेस चढ़वला, छातीवर वेल्क्रो ने नावाची पट्टी लावली “विश्वास”. पायात डीएम शूज चढ़वले माझी बेरे लावली अन बाहेर आलो, येता येता कोत मधे जाऊन मी रजिस्टर मधे सही करुन एक 9mm बरेटा पिस्टल अन 4 मैग्ज़ीन ताब्यात घेतले, पिस्टल कापड़ी पट्टयात अड़कवलेल्या होल्स्टर मधे खोचली अन बाहेर आलो ते हाती हेलमेट धरून दास उभाच होता, मी समोर जाताच त्याने सल्यूट केला अन हेलमेट ताब्यात दिले मी त्याला सल्यूट रिटर्न केला बेरे काढून माझ्या बॅकपॅक मधे टाकली अन हेलमेट चढ़वले, अन जासुद काम करायला तयार झालो.

बाइकच्या उजव्या हाताला वैष्णो देवीची लाल सोनेरी चुनरी बांधली होती तिला नमस्कार केला, डाव्या हैंडलला लेह मॉनेस्ट्री ने दिलेला थांगका बांधला होता त्याला स्पर्श करुन हात छातीला लावला, अन सणसणुन किक मारली ते आमची यशवंती जिवंत होऊन फुरफरु लागली.

09 मे, 1999, 1100 वाजता

“जय हिंद साब”.

“जय हिंद दास” म्हणून मी गियर टाकला पहिला अन सुसाट निघालो. श्रीनगर शहरातले वेगवेगळे भाग तिथे तिथे मिळेल तश्या ट्रॅफिक ने मी कमी जास्त गतीने कापत होतो दूर गावात कुठेतरी रोजच्याप्रमाणेच कुठलेतरी आंदोलन झालेले दिसत होते, ते समजायचा एकमेव मार्ग म्हणजे दंगा करणाऱ्या लोकांनी टायर जाळले की उठणारा काळाकुट्ट धुर त्या धुराकडे एकवार नजर वळवुन मी परत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले अन चांगली 60 ची स्पीड पकडली, पण हे सुख मला जास्तकाळ लाभणारे नव्हते कारण शहरी वस्ती संपली तसाच राखाडी करड़ा रंग असलेला रस्ता उर्फ़ लद्दाख रोड सुरु झाला, मे महिन्याची सुरुवात म्हणजे बहुतांश बर्फ वितळलेला तरीही थोड़े थोड़े पॅच शिल्लक असलेला असा तो असमंत होता, तापमान -3℃ ते 15℃च्या मधे फिरत असते दिवसाच्या वेळेनुसार सद्धया सोसल असे तापमान होते खड़बड़ीत म्हणण्यापेक्षा थोड़ी कच्ची अन मधेच डांबराचे पॅच उडलेली सड़क असल्यामुळे मी गती आता कमी करुन जवळपास 40च्या स्पीड ने पुढे चालू लागलो, साधारण श्रीनगरच्या बाहेर 30 किमी आल्यावर मला गार वारे बोचु लागले तसे मी लेफ्ट इंडिकेटर देऊन गाड़ी थांबवली थोड़े पाय मोकळे केले अन बॅगपॅक मधुन जाड ऑलिव ग्रीन जॅकेट काढून चढ़वले त्याची चेन गळ्यापर्यंत ओढून मी पुर्ण पॅक झालो मग परत पुढे सुटलो. थोड्याचवेळात मी वायुल पार केले अन आता थोड़ा लयीत आलो होतो. जवळपास दीड तास झाला होता निघुन, आता पुढे अजुन 3 तास वर सोनमर्ग तिथून 4 तास पुढे कारगिल मग मी मोकळा असा विचार येईपर्यंत पहिले विघ्न आले मागच्या चाकातुन एकदम फुसकन आवाज आला, झाला प्रकार समजायला मला वेळ लागला नाही परत एकदा गाड़ी थांबली अन मी यांत्रिकपणे पंक्चर काढत बसलो. टोटल 20 मिनट तिथे घालुन मी परत पुढे निघालो तेव्हा 1350 वाजले होते, अजुन सोनमर्ग 3 तास लागणारच होते मी जवळपास 30 35 च्या स्पीड न पुढे सरकू लागलो सोनमर्ग पासुन अंदाजे 38 ते 40 किमी असताना ऊंची जाणवू लागली सोनमर्ग 2650 मीटर ऊंचीवर होते अन श्रीनगर जवळपास 1580 मीटर तरी बरं सतत इकडे काम करुन माझे शरीर ह्या हवामान अन ऊंचीला अडॉप्ट झाले होते. हा महीना मेचा होता अन बर्फ वितळु लागले होते कुठे छोटे ओघळ तर कुठे ओढ्याच्या आकारात डीपफ्रीजर मधे ठेवलेले असते तितक्या तापमानाचे पाणी वाहत होते. खाली सिंधुमातेला भेटायला जाणारी उसळती अवखळ बाळेच होती ती जणू पण त्यांच्यामुळे एक लफ़ड़े झाले होते ह्या जलधारा फ़क्त निसर्गाचे नियम पाळतात त्यांना फ़क्त गुरुत्व वापरून वरतुन खाली जाणे होते. मग त्यांना मज़्ज़ाव करणाऱ्या सड़का दगड शिला ह्यांना त्या धारा चिरून ढकलुन पुढे पुढे सरकतात, त्यांना नीट मार्ग द्यायला बॉर्डर रोड्स आर्गेनाईजेशनची माणसे चर खोदतात धारांचा अभ्यासकरुन वाटा बनवतात पण नादिष्ट वांड पोरांचा अन त्यांच्या खेळांचा भरोसा देता येत नाही तसेच ह्यांचे ही असते जो रस्ता आवडेल त्यावर दौड़त सुटतात, सोनमर्ग पासुन अंदाजे 30 किमी वर एका वळणावर मी असाच फसलो तिथे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याने एक रोड पॅच अपल्यासोबत खाली नेला होता अन तश्या त्या वाहत्या ओढ्यात मी बुलेट घातली, वाहत्या पाण्यात पुढचे चाक ओढले जाऊ लागले इतपत त्याची गती होती त्याच दरम्यान समोरील चाकाच्या खाली एक वाटोळा दगड यायला अन मागच्या चाकाखालील चिखल सरकायला एकच गाठ पडली अन गाड़ी डाव्याबाजुला कलली! माझं नशीबच थोर म्हणायला हवे म्हणून गाड़ी डावीकड़े पडलो उजवीकडे पड़ता पाणी अन गाडी सोबत मी ही खाली नदीमातेच्या कुशीत गेलो असतो, डावीकड़े गाडी कलताच मी ओणवा फेकला गेलो अन आपण दंडवत घालतो तसे धपकन पाण्यात पडलो उणापूरा 5 बोटे खोल ओहोळ अन त्यात मी पालथा पडलेलो खाली असलेली दगड माती खचकन रुतली अन तोंडी गढुळ पाणी गेले, धडपड करत मी उठून उभा राहिलो पाणी थुंकले जरा सावरलो अन स्वतःकडे पाहिले तर तळहातात दगडाची एक कपची शिरून रक्त येत होते अन उजवा गुड़घा दुखत होता पण एकंदरित मी ठीक होतो, आता फ़क्त एक प्रॉब्लेम होता मी नखशिखांत भिजलेलो होतो तितक्यात मला मेलबॅगचा विचार आला म्हणून मी यांत्रिकपणे बॅकपॅकला हात लावला तर नाशिबाने ती शाबुत होती, गाड़ीकडे पाहता तिलाही काही खास अपाय झाला नव्हता मी परत गाडीजवळ आलो अन ती उभी केली उभी करताच ती सुरु करायला बघु लागलो 5 6 किक्स मधे गाड़ी सुरु झाली अन मी पुढे निघालो , भिजल्यामुळे मात्र आता भयानक हिव भरू लागलं होतं, वरती उन होतं थोडं थोडं पण हवा जोरात सुरु असल्यामुळे मला कापरं भरू लागलं होतं हाताची बोटे सुन्न पडू लागली होती. मी तड़क ओले हातमोजे काढून पिळले अन परत चढ़वले अन हात झटकुन बोटे गरम करायचा प्रयत्न करु लागलो, पण ते काही जमेना म्हणल्यावर मी शिस्तीत गाडी कडेला लावली अन पहिले उड्या मारल्या भरपुर आता नाकाचा शेंडा बधीर झाला होता ओला यूनिफार्म मी काढला पुर्ण ताकद लावुन पिळला अन परत चढ़वला आता होईल ते बघु म्हणून मी पुढे निघालो, सुन्न पडत असलेले हात पाय अन चेहऱ्यामुळे माझी गती आता 20 25 ची झाली होती. कपडे चिखलात रॅड झाले होते. मी सोनमर्गच्या शेड्यूल्ड टाइम पेक्षा जवळपास तासभर मागे होतो पण माझा निरुपाय होता. तरीही मी गती वाढवू लागलो कारण मी टाइम बाउंड डिलीवरी वर होतो. अंदाजे 1730 ला सोनमर्ग दिसू लागले तसे मला थोड़ा हुरूप आला समोर जाता मला एक बॉर्डर रोड्स आर्गेनाइजेशनची चौकी दिसली तिथे मी गाडी थांबवली तशी तिथे राहणारी मजूर मंडळी अन त्यांचा मुकादम असलेला एक जेसीओच असणारा माणुस माझ्याकडे आले, ओजी जामानिमा पाहून त्यांनी मला ओळखलेच होते नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी मला आत नेले चहा दिला अन मी तिथल्याच एका शेकोटी समोर बसकण मारली. गरम चहा अन थोड़ी ऊब पोटी जाताच मी परत एकदा त्या मित्रांचा निरोप घेऊन पुढे निघालो. निघताना त्यांना विचारले पुढे कारगिल पर्यंत रोड कसा आहे हो? त्यावर ते म्हणाले की आम्ही थोड़ाबहुत बंदोबस्त केला आहे पण पुढे पर्वतराजाची जी इच्छा असेल ती! तसे मी हसून पुढे निघालो, मी सोनमर्ग पार केले तेव्हा जवळपास अंधार झाला होता पहाड़ी भागात लवकर अंधारुन येते तरीही 1830 म्हणजे आता मात्र खासे अंधारुन आले होते म्हणून मी गाडीचा हेडलाइट लावला अन माफक गतीने तरीही काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो, सोनमर्ग ते बालाथल अंतर मी सहज पार केले नॉर्मल गतीने अगदी ज्याची भीती होती ते बालाथलचे झिगझेग घाट सुद्धा शिस्तीत पार पडले आता मी द्रासच्या वाटेला लागलो होतो, पुढचा सहा तासाचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक तरीही साहसी प्रवास ठरणार होता हे मला तेव्हा माहीती नव्हते. द्रास पासुन 5 किमी अगोदर मी अतिशय निवांत जात होतो गाड़ीची टिपिकल बुलेटची धगधग वगळता आवाज नव्हता नाही म्हणायला वरती आकाशात निव्वळ सड़ा पडू लागला होता ताऱ्यांचा. प्रदुषण नसलेल्या ह्या भागात तारे सवाष्णीच्या कुंकवासारखे दिसतात एकदम ठसठशीत. अश्या वातावरणात मी वाया गेलेला वेळ भरून काढायला एक्सीलरेटर पिळु लागणार इतक्यात, हलकासा “कुईंईईई” असा आवाज आला अन मला काही समजायच्या आत रस्त्याच्या डाव्या बाजुला 35 ते 40 फुटांवर भयानक स्फोट झाला .सहज क्रियेने मी बुलेट उजवीकडे घातली अन रस्त्याच्या उजव्या बाजुला एक खळगा होता पाणथळ असा तिथे घुसलो. डोके गरगरत होते कान बधीर होऊन गेले होते दचकल्यामुळे ह्रदय बरगड्या तोड़ते की काय इतक्या जोरात धड़धड़त होते. परत एकदा मी ओलागच्च झालो होतो गाड़ी त्या डबक्यात अन खळग्यात उजवीकडे कलंडली होती, पाठीवरले बॅगपॅक काढले अन आधी मेल बॅग चेक केली ती ओके होती. थोड़ा सावरत होतो तसे मी ज्या पाऊलवाटेने खाली उतरलो होतो तिकडे परत एकदा स्फोट झाला अन चिखल माती बारके दगड, चिपा ह्यांचा मला अभिषेक झाला. अन एकदम डोक्यात प्रकाश पडला!.

शेलिंग!! पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे , बकरवाल , रिजेस सामान, माणसे, एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! झुंजरके साधुन हरामी पाकडे डाव साधत होते, कारगिलचं युद्ध अक्षरशः सुरु होताना पाहणारा मी पहिला मनुष्य होतो, मी गुमान बिसलरीची बाटली काढली एक घोट पाणी प्यालो, तसा परत एकदा धुडुमधड़ाम आवाज आला फ़क्त या वेळी तो दिवाळीतल्या सुतळी बॉम्ब सारखा आला बहुदा शेल थोड़े दूर पडले होते मी क्रॉलिंग करत रस्त्याच्या पातळीला आलो इकडे तिकडे पाहता अंदाजे 100 मीटर दूर धूळ बसताना दिसली, नवी इंफॉर्मेशन, पाकिस्तानी भारताच्या गर्दनीची नस असणारा हाईवे तोडू इच्छित होते.होय!! नॅशनल हाईवे 1 डी ! अन त्यावर द्रासच्या वाटेला असलेला मी आर्मी पोस्टल सर्विस कोरचा सुबेदार विश्वास प्रभाकर बांदेकर.मी परत क्रॉलिंग करत खाली आलो आता ठराविक अंतराने आर्टिलरी शेल्सचा आवाज येऊ लागला, लगेच मनाने गणित बांधले,कुठल्या गन्स असतील बॅटरी कशी ऑपरेट होते आहे हे सुटत नव्हते गणित कारण मी आर्टिलरीचा माणुस नाही मी तर साधा डाक ड्यूटी रनर होतो. आता काय करावे ह्यात मी मिनिटभर विचार केला अन पहिले गाड़ी कड़े मोर्चा वळवला गाडी ठीक होती फ़क्त उजवीकडली दोन्ही इंडीकेटर्स चुराडा झाली होती गाड़ी अजुन जवळून पाहता उजव्या बाजूला असलेल्या जेरीकॅन मधे एक बारीक अणकुचीदार दगड रुतुन पेट्रोल लीक होऊ लागले होते. क्षणभर विचार करुन मी तो कॅन ओढला अन पेट्रोल रिकाम्या होऊ घातलेल्या गाड़ीच्या टाकीमधे ओतले अर्धे पेट्रोल त्यात बसले तरी कॅन मधे थोड़े होतेच मी माझ्या हातमोज्याचं मनगटाजवळ असलेलं कापड फाडलं अन लीक होत्या कॅन मधील बारीक़ छिद्रावर दाबून बसवलं, हा इलाज तर जमला होता आता अजुन एक प्रश्न होता माझ्या गाड़ीचा हेडलैंप अन टेललैम्प अगदी प्रखर जरी नाही म्हणला तरी अंधारात नक्कीच चमकला असता, आर्टिलरी कवर मधे जर एखादे शत्रूचे यूनिट पुढे सरकत असले तर मी त्याच्या तावडीत सापडू शकलो असतो , परत समोरची शॉकप अन साइड पेनल वर असलेली रिफ्लेक्टर स्टिकर्स सुद्धा चमकन्याचा धोका होता, काय करावे ह्या विचारात मला एक शक्कल सुचली मी सरळ ज्या पाण्याच्या थारोळ्यात बसलो होतो त्याच्या बुडाला हात घालुन खरवडले ते हाती थोड़ा मुलायम चिखल लागला मी तो चिखल सरळ रिफ्लेक्टर्स अन टेल लाइट वर फासला अन त्यांना conceal केले त्या नंतर तसाच चिखल हेडलाइटवर चोपड़ला फ़क्त मधे एक छोटेसे वर्तुळ सोडले जेणे करुन पसरणारा लाइट कंट्रोल होईल पण मला अंधुक रस्ता सुद्धा दिसत राहील, मी एक आर्मी पोस्टमॅन होतो मला घाबरुन चालणार नव्हते. माणसाचे मन विचित्र असते, ह्या क्षणी मला गोष्ट आठवत होती ती एका प्राचीन ग्रीक निरोप्याची, फिडिपेडिस त्याचं नाव, एथेंसचा राहणारा फेडिपेडिस धावत जाऊन सन्देशवाहन करत असे अथीनियान आर्मीचं एकदा असंच मैराथनच्या मैदानात असलेल्या युद्धभुमीपासुन त्याला एथेंस पर्यंत निरोप पोचवायचे काम त्याला मिळाले. निरोप बाका होता “मैराथन चे मैदान मारले आपण जिंकलो” हा निरोप एथेंस सिटी कौंसिलला न पोचला तर ते अज्ञानापाई शहर शरण करतील ते व्हायला नको म्हणून फिडिपेडिस धावत सुटला श्वास न मोजता कसलीच तमा न बाळगता धावत सुटला शेवटी एथेंस च्या दरवाज्यावर आला तेव्हा कोसळून पडला त्याला विलक्षण धाप लागली होती त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले “Rejoice we won” अन तिथेच तो फेडिपेडिस वारला होता. आजही लांब अंतरची धावण्याची शर्यत होते ती मैराथन म्हणावते ती फ़क्त फिडिपेडिसचा सन्मान अन त्याची आठवण म्हणून. आज मी ही फेडिपेडिस् झालो होतो, जीव गेला तरी बेहत्तर फ़क्त तो माझे एथेंस उर्फ़ कारगिल बेसलाच जायला हवा ह्या निश्चयाने मी तयार झालो चिखल माखुन गाडीचा कमांडो मी आधीच केला होता, अंगावर सुद्धा काहीच चमकदार नको म्हणून सर्वांगाला मी चिखल फासला बॅगपॅक परत एकदा पाठीवर आवळले अन सुसाट म्हणजे अक्षरशः सुसाट सुटलो. आता हल्ल्याची व्याप्ती लक्षात आली होती, येत होती गाड़ी चालवण्यात अनेक व्यवधाने येत होती हेडलाइट वरच्या चिखलामुळे रस्ता नीट दिसत नव्हता त्यामुळे मधेच कंबरतोड़ गचके लागत होते ते वेगळेच मधेच एखादे शेल सड़केजवळ आदळले की मी हेलपाटत गाडी परत उजवीकडे रस्त्याखाली घालत असे , एकदा तर हा वेग इतका होता की रस्त्यावर शेल आदळले अन त्याने जेसीबी काढतो तसा एक स्कूप काढला रस्त्याच्यामधुन डाव्या कोपर्यापर्यंत तेव्हा गाड़ी कंट्रोल करुन उजवीकड़े न वळवता आल्याने मी जिथुन रस्ता उखड़ला होता त्याच्या अगदी चिकटुन बोजड़ बुलेट काढली होती उड़नारी माती खड़े अंगावर असंख्य ओरखडे देत होते पण मला पर्वा नव्हती, कारगिल जवळ पोचलो तेव्हा ही धग अजुन जाणवली मला पण मला मागे वळायचे नव्हते, कारगिल बेस जवळ आलो तेव्हा मी अक्षरशः गलितगात्र झालो होतो, बेसच्या सेंट्री ने मला शीट्टी वाजवुन थांबवले तेव्हा मी भानावर आलो होतो, कदाचित युद्धज्वर ह्यालाच म्हणतात असे वाटते, सेंट्रीला चिखलात माखलेला मी ओळखु येइना तसे मी परिचय दिला अन कर्नल पूरी ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले तसे चार च्या चार सेंट्री बंदुकी खाली करुन धावत आले

“ओये अपना बंदा है ओये” म्हणत्या जवानाची ग्रेनेडियर्स लोगो लावलेली बेरे दिसली तेव्हा मी निश्चिन्त झालो होतो माझ्या अंगातून चार पाच ठिकाणहुन रक्त येत होते हाताची बोटे काळसर नीळसर पडली होती, पाय कान पाठ बधीर झाली होती पण बॅगपॅक घट्ट होती पाठीवर एका जवानाने माझे ओले हातमोजे काढून टाकले होते दुसऱ्याने बूट अन सॉक्स दोघे खसखसा चोळून माझे हातपाय गरम करत होते तोवर तिसऱ्या ने आत मॅसेज दिला रेडियोवर अन मला न्यायला जिप्सी आली रेडियो करणारा जवान माझी बुलेट घेऊन मागून आला अन थेट मी बेसच्या MI सेक्शनला आणलो गेलो होतो, तिथे एक खाट तयार होती आत रूम हीटर होता मला माझे कपडे बदलायला सांगुन तिथे निजवले गेले डॉक्टर ने अंगावर असलेले छोटे मोठे ओरखड़े जखमा नीट स्वच्छ करुन बांधल्या अन मी पडलो होतो तेव्हाच कर्नल पूरी आले ! रात्री साडे अकरा वाजता मी माझ्या इच्छित अधिकार्याला भेटलो ! जवळ पडलेल्या बॅगपॅक मधुन मी मेल बॅग काढून कर्नल साहेबांना दिली अन म्हणालो

“सर ये मुजाहिद नहीं है ये प्रॉपर आर्टिलरी कवर था सर द्रास से कारगिल के बीच में एनएच 1डी तोडा जा रहा है श्रीमान”

मे 09,1999 2330 वाजता मी जे करायला निघालो ते पुर्ण केले होते.

तेव्हा पूरी सर म्हणाले “बहुत बढ़ीया सुबेदार साब हम देख लेंगे अब आप सो जाएँ” औषधांच्या इफ़ेक्ट मुळे मला पण झोप आली सकाळी मला जाग आली ती आर्टिलरीच्या आवाजानेच पण जवळून आवाज येऊन सुद्धा कोणी गड़बड़ीत दिसत नव्हते अर्थ स्पष्ट होत्या भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या निरोप नीट पोचले होते.

एक पोस्टमन समाधानी होता.

समाप्त.

 

 
(कथा पूर्णपणे काल्पनिक, चित्रे जालावरून साभार)