Home » चित्रपट

Category Archives: चित्रपट

Advertisements

सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉)
कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

Advertisements

तुझं काम होत असतं

चार्लीचाप्लीननं अनेकांना भुरळ घातली आहे आजवर. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रोजच्या जगण्यात तो क्षणभर का होईना समोर येतोच. म्हणजे तसा तो आपल्यातच असतो पण दिसत नाही, किंवा आपली नजर मेलेली असते म्हणूया, म्हणून आपल्याला तो दिसत नाही. कुणीतरी आपल्याला दाखवावा लागतो कान पकडून, तो बघ फेंगड्या पायाचा आभाळापर्यंत गेलेला चार्ली.

जिवलग मित्राचं प्रेम जुळावं असं त्यालाही वाटत असतं मनापासून, अगदी खरोखर. पण त्याबरोबर मनातलंही चुकून ओठावर येतं, मित्र हसण्याची भीती असते पण तरीही येतंच ते, आपसूक. धडक्या मित्रांच्या संगतीने लंगड्याने त्यांच्यात सामील व्हायचा खुळेपणाच तो.  “सपनी आसंल का रं फेसबुकवर” हे विचारल्यावर मित्रांच्या चेहेऱ्यावरचं उपेक्षेचं हसू पाहून तो पुन्हा मनाची समजूत घालतो. “हे आपलं नव्हेच गड्या, आपण कुणीच नाही, आपण प्रेमाचं स्वप्न पाहाणंदेखील पाप आहे” असं उर्मी पुन्हापुन्हा खोल पुरून टाकणारा, आणि तरीही चेहेऱ्यावर मात्र त्यातलं काही येऊ न देणारा..

एकदोनदा सपनीकडे चोरून बघतोही, पण नंतर स्वतःच शहाण्यासारखी मान वळवतो, तेवढ्यात सपनीनं कागद फेकल्यावर, पायात जनावर दिसावं तसा घाबरतो. साल्या कुठून आणलंस सुखाची नुसती चाहूल लागल्यावरदेखील हे अंगावर काटा आल्यासारखं घाबरणं.

मग आपलं हसं होऊ नये म्हणून असंख्य तऱ्हा करणारा आणि त्यामुळे जास्तच हास्यास्पद दिसणारा चार्ली. कित्तीवेळा स्वतःला समजावतो, हे खरं नाही, हे सुख माझं नाही, पण तरीही फरफट चालूच. एवढ्या ओरखडे मिळवण्याच्या आणि वागवण्याच्या सततच्या सवयीमुळेतरी अंदाज यायला हवा की नको तुला. तुझ्याकडे कागदामधे प्रेमाचे शब्द येत नसतात, फक्त नखं येत असतात, बोचकारणारी..

कोसळतो क्षणभर, वर्षानुवर्षे डोहाच्या तळाशी साठलेलं काही वर येऊ पाहातं, जीवाभावाचे मित्र क्षणात अनोळखी भासायाला लागतात, हुंदक्यांची उकळी एखादीच अनावधानाने, पुन्हा एकदा डोह शांत होतो. चार्ली स्वतःच्या फजितीवर स्वतःच खळखळून हसायला लागतो. “माझं तर लंगड्याचं कायबी असतं लगा, कुठं सपनी आन कुठं मी” हे तो स्वतःलाच पुन्हा एकदा बजावतो आणि हे सगळं इतक्या सराईतपणे करतो की नक्की डोहाच्या तळाशी काही आहे कि नाही याचा अंदाजही येऊ नये.

vlcsnap-2016-05-06-13h29m54s36

 

पुन्हा हुंदका येऊ नये म्हणून मित्रांकडे तोंड फिरवून फेंगडे पाय टाकत रस्त्याच्या मधून चालणारा चार्ली पाहिला का तुम्ही, वाटेत भेटलेल्या वठलेल्या उपेक्षितांना, हाका मारमारून “मी आहे” हे बजावून सांगणारा चार्ली. रस्त्यातल्या तीन वर्षाच्या मुलाकडूनही हूल खाणारा पण तरीही कसनुसं हसत पुढे जाणारा चार्ली.

पण चार्ली पूर्ण होतो तो एवढ्याने नाही, तो पूर्ण होतो तो त्याच्या दुर्दम्य आणि नितळ भलेपणामुळे. मघाचा हुंदका अजून विरला नसताना, मित्राला “ माझं सोड, पण तुझं यगळ हाय लेगा, तुझं काम होत असतं, आर्ची तुला नाय म्हनतच नसती, तू लिहून घे वाटलंच तर माह्याकडून” हे सांगणारा चार्ली दिसला का तुम्हाला…