Home » मराठी » एका धर्मगुरूचा खून आणि न घडलेले पोर्तुगीज मराठा युद्ध

एका धर्मगुरूचा खून आणि न घडलेले पोर्तुगीज मराठा युद्ध

वरकरणी किरकोळ भासणाऱ्या घटना दूरगामी राजकीय परिणाम घडवून आणतात हे जगाच्या इतिहासात पुन्हा पुन्हा आढळून आलेले आहे. सन १७५२ मध्ये पोर्तुगीज आणि फ्रेंचांमध्ये एका प्रतिष्ठित पोर्तुगीज कुटुंबाने एक गुलछबू पोर्तुगीज पाद्री आणि दोन आफ्रिकन गुलामांचे एका प्रेमप्रकरणावरून खून केल्याने पोर्तुगीज वसाहत आणि फ्रेंच वसाहत यांच्यात कसा बेबनाव झाला आणि त्याचा परिणाम मुघल, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी आणि मराठी साम्राज्यातील एका गटाने एकत्र येऊन पेशव्यांचा समूळ उच्छेद करण्याचा जो घाट घातला होता तो फिस्कटण्यात कसा झाला याबाबतचा एक किस्सा पोर्तुगीज आणि फ्रेंच साधनांच्या आधारे लिहिलेल्या इतिहासात आहे. गोव्यातील प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी लिहिलेल्या पोर्तुगीज भाषेतील ‘PORTUGUESS E MARATAS’ या ग्रंथात या घटनाक्रमाचा धावता आढावा घेतला आहे. पिसुर्लेकर यांच्या या ग्रंथाचे पी. आर. काकोडकर यांनी इंग्रजी भाषांतर केलेले असून ते ‘THE PORTUGUESE AND THE MARATHAS’ या नावाने प्रकाशित करण्यात आलेले आहे.

पेशवे थोरले बाजीराव यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस मराठ्यांनी पोर्तुगीजांवर स्वारी करून त्यांच्या राज्याच्या उत्तर भागातील दीव-दमण व रेवदंडा वगळता सर्व भाग जिंकून घेतला, त्याच वेळी पोर्तुगीज राज्याच्या दक्षिण भागातही बऱ्याच मोठ्या भूभागाचा ताबा मराठे आणि सावंतवाडीकर भोसल्यांनी घेतला होता. वसईच्या पाडावामुळे पोर्तुगीजांच्या राज्यावर मोठे आर्थिक संकट आले होते हे सर्वश्रुत आहेच.

याच काळात पेशवे प्रबळ झाल्याने त्यांचे अनेक अंतस्थ शत्रूही निर्माण झाले होते. या शत्रूंनी थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पा यांचे निधन झाल्यानंतर डोके वर काढले आणि पेशव्यांचा बंदोबस्त कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित केले. यातूनच मुघल, काही पेशवेविरोधक मराठी सरदार, फ्रेंच, सिद्दी  आणि पोर्तुगीज यांनी एकत्र येऊन पेशव्यांचा उच्छेद करण्याचे राजकारण शिजले.

१७५१-५२ मध्ये सलाबतजंग हा महत्वाकांक्षी सरदार मुघल साम्राज्याचा दक्षिणेतील प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेस नियुक्त केलेला होता. त्याने ही योजना आखण्यात पुढाकार घेतला होता असे फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींमधील तत्कालीन पत्रव्यवहारातून दिसते.

सलाबतजंगाच्या मूळ योजनेत बहुधा त्याने पोर्तुगीजांना गृहीत धरलेले नसावे. त्याने फ्रेंचांच्या भारतातील गव्हर्नर जनरल मोन्स्युअर ड्युप्लेक्स (Monsieur Dupleix) आणि मुघलांच्या औरंगाबाद येथील तळावरील फ्रेंच सरदार मोन्स्युअर एम. बस्सी (Monsieur M. Bussy) यांच्याशी मसलत केल्यावर योजना आकारास येऊ लागली. या योजनेबाबतची माहिती ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy – The Journal on the Army conducted by Monsieur Bussy)’ या नॅशनल लायब्ररी ऑफ पॅरिस येथे जतन केलेल्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. या माहितीनुसार तत्कालीन पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रांसिस्को दे अस्सीस दे तवोर (Francisco de Assis de Tavora) याने मराठ्यांनी जिंकून घेतलेला पोर्तुगिजांचा प्रदेश पुन्हा काबीज करण्यात फ्रेंचांची मदत व्हावी या उद्देशाने सन १९५१ च्या शेवटी फ्रेंचांशी संबंध वाढवले आणि सन १७५२ च्या सुरुवातीस बस्सी यांच्या सैन्यात सामील होण्यास काही पोर्तुगीज सैनिक पाठवले देखील होते. याबाबत फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्यात जी मसलत झाली त्याबाबत आल्फ्रेड मार्तीनिको यांनी त्यांच्या ‘Bussy and French India’ या ग्रंथात काही माहिती दिलेली आहे.

या संदर्भातील अनेक बाबी अद्याप अप्रकाशित राहिलेल्या आहेत. परंतु ‘Journal de L’armee Conduit par M. Bussy’ आणि ‘Bussy and French India’ या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार मराठी साम्राज्याच्या तत्कालीन महाराणी ताराबाई आणि तुळाजी आंग्रे हे देखील या मसलतीत सामील झाले होते. मार्क्वी दे तवोर याने ३० नोव्हेंबर १७५१ रोजी बस्सी आणि सलाबतजंग यांना या संदर्भात लिहिलेली पत्रेही उपलब्ध आहेत.

एवढी तयारी झाल्यावर सन १७५२ च्या सुरुवातीस सुरत भागात युद्धाला तोंड फुटले. मुघल सैन्य सुरतेच्या किल्ल्यात होते तर पेशव्यांचे सैन्य सुरत शहरात तळ ठोकून होते. युद्ध सुरु झाल्यावर ब्रिटीशांनी पेशव्यांशी हातमिळवणी केली तर सिद्दी आणि डच मुघलांना जाऊन मिळाले. त्यावेळी होळकरांची पथके बंगालात मोहिमेवर असल्याने पेशव्यांचे सैन्यबळ कमी होते. दोन चकमकींमध्ये पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर नानासाहेब पेशवे राखीव पथके घेऊन पुण्याबाहेर पडले. सैन्याची तोंडमिळवणी करण्यासाठी त्यांनी उत्तर कोकणात ठेवलेले सैन्यही बोलावून घेतले. त्याच दरम्यान दमाजी गायकवाडांनी साताऱ्यात ससैन्य तळ ठोकला.

मुघल, फ्रेंच आणि पोर्तुगीजांना पेशव्यांना नामोहरम करण्यासाठी चांगली संधी होती. परंतु त्याच वेळेस फ्रेंच आणि पोर्तुगीजांमध्ये वेगळेच नाट्य घडत होते. या नाट्याच्या केंद्रस्थानी होता १७५१ सालात झालेला एका पोर्तुगीज धर्मगुरूचा खून.

१३ मे १७५१ रोजी बारदेशात एका नदीत एका काळ्या माणसाचा मृतदेह सापडला. मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक जखमा होत्या आणि पायास धोंडा बांधलेला होता. तपासात मृत व्यक्ती फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो या मोझांबिकमध्ये मुक्कामी असलेल्या पोर्तुगीज जहाजाच्या कप्तानाची गुलाम असल्याचे निष्पन्न झाले. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो हा दोम हेन्रिक दे नरोन्हा या प्रतिष्ठित पोर्तुगीज व्यक्तीचा जावई होता आणि त्याची बायको (दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुलगी) तिचा नवरा सफरीवर असताना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरातच राहत होती.

त्यानंतर काही दिवसांनी बारदेशातच एका घळीत शिरच्छेद केलेल्या दोन व्यक्तींची प्रेते सापडली. त्यापैकी एक जण गोरा होता तर दुसरा काळा होता. त्यांची ओळख दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा भाचा असलेला फादर अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो आणि त्या धर्मगुरूचा आफ्रिकी गुलाम अशी पटली. त्या दोघांना दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी जाताना शेवटचे पाहिलेले होते.

दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याचा पुतण्या दोम जो दे नरोन्हा आणि अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो यांचा बालपणापासून स्वत:च्या मुलांप्रमाणे प्रतिपाळ केलेला होता. नंतर दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या मुलीचे लग्न फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्याशी झाले पण फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो वारंवार सफरीवर जात असल्याने ती अनेकदा दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरीच राहत असे. फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याने तिच्या दिमतीसाठी एक आफ्रिकन गुलाम ठेवलेला होता.

अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याने दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्याशी असलेल्या घरगुती संबंधांचा वापर करून फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याच्या बायकोस भूल पाडली आणि तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्या उभयतांचे आपापसातील प्रेमसंदेश फ्रान्सिस्को अन्तोनिओ परेरा कुटिन्हो याचा पेद्रो हा आफ्रिकन गुलाम पोहोचवत असे.

या प्रेमप्रकरणाबाबत दोम हेन्रिक दे नरोन्हा याला त्याचा मुलगा दोम गिल याने सांगितले तेव्हा रागावून दोम हेन्रिक दे नरोन्हा याने त्याच्या तीन मुलांबरोबर या प्रकरणात सामील असलेल्या सर्वांचा काटा काढण्याचा कट केला. त्यांनी १२ मे १७५१ पेद्रोचा खून केला. नंतर १५ मे १७५१ रोजी अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो याला दोम हेन्रिक दे नरोन्हाने त्याच्या घरी बोलावले. अन्तोनिओ दे साओ दोमिन्गो त्याच्या गुलामासह दोम हेन्रिक दे नरोन्हा याच्या घरी गेला तेव्हा दोम हेन्रिक दे नरोन्हा याचा मुलगा दोम लुईस आणि अन्य दोघांनी त्यांचा खून केला.

खुनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही दोम हेन्रिक दे नरोन्हा आणि त्याची मुले दोम फ्रांसिस्को आणि दोम गिल यांना अटक केली. दोम लुईस मात्र चीनला पळून गेला. तपासात आरोपींचे कबुलीजबाब घेतले परंतु त्यांनी नंतर न्यायालयात जबान्या फिरवल्या.

मोन्स्युअर ड्युप्लेक्स याची बायको दोम हेन्रिक दे नरोन्हा याची नातेवाईक होती. तिने मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला त्याच्या प्रभावाचा वापर करून दोम हेन्रिक दे नरोन्हा याची मुक्तता करून घेण्याची गळ घातली. त्यानुसार मोन्स्युअर ड्युप्लेक्स याने मार्क्वी दे तवोर याच्याशी पत्रव्यवहार केला परंतु मार्क्वी दे तवोर याने त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर ३० जानेवारी १७५२ रोजी त्याने पोर्तुगालच्या राजाला या संदर्भात जो वृत्तांत पाठवला त्यात मोन्स्युअर ड्युप्लेक्स याला बायकोच्या ताटाखालचे मांजर असेही म्हणले.

या घटनेमुळे फ्रेंच वसाहत आणि पोर्तुगीज वसाहत यांच्यात दुरावा निर्माण झाला. परिणामी बस्सीने जेव्हा पेशव्यांच्या विरोधातील मोहिमेसाठी मार्क्वी दे तवोरकडे १,००० बंदुकांची मागणी केली तेव्हा मार्क्वी दे तवोरने निम्म्याच बंदुका पाठवल्या. वस्तुतः योजनेनुसार मुघल, फ्रेंच आणि मराठा सरदारांनी पेशव्यांच्या विरोधात उठाव करताच पोर्तुगीज आणि सिद्दीनेही उठाव करायचा होता परंतु मार्क्वी दे तवोरने सलाबतजंगास लिहिलेली पत्रे बस्सीने सलाबतजंगापर्यंत पोहोचवली नाहीत. नंतर मार्क्वी दे तवोरने सिद्दीच्या मार्फत सलाबतजंगाशी पत्रव्यवहार सुरु केला पण तोवर पाउस सुरु झाल्याने कोकणात जमिनीवर किंवा समुद्रात युद्ध करणे अशक्य झाले.

दरम्यान पेशव्यांनी मुघल सैन्याबरोबर सुरु असलेल्या लढाईतून माघार घेतली आणि साताऱ्याकडे मोहरा वळवून दमाजी गायकवाडना जेरबंद केले आणि अंतर्गत विरोधकांचा बंदोबस्त केला. त्यानंतर पेशव्यांनी सलाबतजंगाचा मोठा भाऊ गझेडी खान याला फितवले आणि गझेडी खान दिल्लीहून सैन्य घेऊन सलाबतखानावर स्वारी करून आला. या अनपेक्षित घटनांमुळे बाजी सलाबतजंगावरच उलटली आणि पेशव्यांचा आपोआप बचाव झाला.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Categories

%d bloggers like this: