Home » चित्रपट » तुझं काम होत असतं

तुझं काम होत असतं

चार्लीचाप्लीननं अनेकांना भुरळ घातली आहे आजवर. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रोजच्या जगण्यात तो क्षणभर का होईना समोर येतोच. म्हणजे तसा तो आपल्यातच असतो पण दिसत नाही, किंवा आपली नजर मेलेली असते म्हणूया, म्हणून आपल्याला तो दिसत नाही. कुणीतरी आपल्याला दाखवावा लागतो कान पकडून, तो बघ फेंगड्या पायाचा आभाळापर्यंत गेलेला चार्ली.

जिवलग मित्राचं प्रेम जुळावं असं त्यालाही वाटत असतं मनापासून, अगदी खरोखर. पण त्याबरोबर मनातलंही चुकून ओठावर येतं, मित्र हसण्याची भीती असते पण तरीही येतंच ते, आपसूक. धडक्या मित्रांच्या संगतीने लंगड्याने त्यांच्यात सामील व्हायचा खुळेपणाच तो.  “सपनी आसंल का रं फेसबुकवर” हे विचारल्यावर मित्रांच्या चेहेऱ्यावरचं उपेक्षेचं हसू पाहून तो पुन्हा मनाची समजूत घालतो. “हे आपलं नव्हेच गड्या, आपण कुणीच नाही, आपण प्रेमाचं स्वप्न पाहाणंदेखील पाप आहे” असं उर्मी पुन्हापुन्हा खोल पुरून टाकणारा, आणि तरीही चेहेऱ्यावर मात्र त्यातलं काही येऊ न देणारा..

एकदोनदा सपनीकडे चोरून बघतोही, पण नंतर स्वतःच शहाण्यासारखी मान वळवतो, तेवढ्यात सपनीनं कागद फेकल्यावर, पायात जनावर दिसावं तसा घाबरतो. साल्या कुठून आणलंस सुखाची नुसती चाहूल लागल्यावरदेखील हे अंगावर काटा आल्यासारखं घाबरणं.

मग आपलं हसं होऊ नये म्हणून असंख्य तऱ्हा करणारा आणि त्यामुळे जास्तच हास्यास्पद दिसणारा चार्ली. कित्तीवेळा स्वतःला समजावतो, हे खरं नाही, हे सुख माझं नाही, पण तरीही फरफट चालूच. एवढ्या ओरखडे मिळवण्याच्या आणि वागवण्याच्या सततच्या सवयीमुळेतरी अंदाज यायला हवा की नको तुला. तुझ्याकडे कागदामधे प्रेमाचे शब्द येत नसतात, फक्त नखं येत असतात, बोचकारणारी..

कोसळतो क्षणभर, वर्षानुवर्षे डोहाच्या तळाशी साठलेलं काही वर येऊ पाहातं, जीवाभावाचे मित्र क्षणात अनोळखी भासायाला लागतात, हुंदक्यांची उकळी एखादीच अनावधानाने, पुन्हा एकदा डोह शांत होतो. चार्ली स्वतःच्या फजितीवर स्वतःच खळखळून हसायला लागतो. “माझं तर लंगड्याचं कायबी असतं लगा, कुठं सपनी आन कुठं मी” हे तो स्वतःलाच पुन्हा एकदा बजावतो आणि हे सगळं इतक्या सराईतपणे करतो की नक्की डोहाच्या तळाशी काही आहे कि नाही याचा अंदाजही येऊ नये.

vlcsnap-2016-05-06-13h29m54s36

 

पुन्हा हुंदका येऊ नये म्हणून मित्रांकडे तोंड फिरवून फेंगडे पाय टाकत रस्त्याच्या मधून चालणारा चार्ली पाहिला का तुम्ही, वाटेत भेटलेल्या वठलेल्या उपेक्षितांना, हाका मारमारून “मी आहे” हे बजावून सांगणारा चार्ली. रस्त्यातल्या तीन वर्षाच्या मुलाकडूनही हूल खाणारा पण तरीही कसनुसं हसत पुढे जाणारा चार्ली.

पण चार्ली पूर्ण होतो तो एवढ्याने नाही, तो पूर्ण होतो तो त्याच्या दुर्दम्य आणि नितळ भलेपणामुळे. मघाचा हुंदका अजून विरला नसताना, मित्राला “ माझं सोड, पण तुझं यगळ हाय लेगा, तुझं काम होत असतं, आर्ची तुला नाय म्हनतच नसती, तू लिहून घे वाटलंच तर माह्याकडून” हे सांगणारा चार्ली दिसला का तुम्हाला…

Advertisements

2 Comments

 1. सोकाजीराव त्रिकोकेकर says:

  लंगड्या भेटला होता, पण फक्त एक सच्चा आणि मित्र म्हणून नव्हे, त्याच्याही पलीकडे!
  एक सुजाण आणि सभोवतालाचे आणि वस्तुस्थितीचे व्यवस्थित भान असलेला मिश्कील सवंगडी म्हणून…

  “लका, माझं तर पटांगण झालं” असं म्हणून परिपक्व धिटाईने वस्तुस्थिती स्विकारणारा पण त्याच वेळी “तुझ तस नाही लका” म्हणत दोस्तासाठी जीव टाकणारा हे रजिस्टर झालं होतं.

  पण चार्ली असं रिअलाय्झेशन आता होतय आणि वेगळं इन्टर्प्रिटेशन सुरु झालयं मेंदूत, एक वेगळंच आयाम घेऊन…

  Liked by 1 person

 2. अव्वल इंटरप्रिटेशन अर्धवटराव ! अव्वल इंटरप्रिटेशन फ़क्त तो फ़ोटो उगाच लोड केलात कसनुसं होतं राव. असो. मला वाटतं आपल्याकडे मुळ प्रेमी कमी अन हा हरुप देणारा सपोर्ट स्टाफच जास्त असतो, अर्थात त्याने त्यांचे अवमूल्यन होत नाही किंवा ते करायचा माझा मानसही नाही, पण जिवाला जीव देणारे यार असतात कायम हे मात्र अधोरेखित करतो, आभाळाइतक्या उंच फेंगड्या पायांच्या चार्लीची वज कधीच कमी होणार नाही जोवर कसनुसं हसत का होईना त्याला आपल्यात उभे करणारे मित्र आहेत, हे एकच नाते त्याला बहुदा शाश्वत वाटत असावे

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Categories

%d bloggers like this: