Home » 2016 » May

Monthly Archives: May 2016

Advertisements

डाकिया डाक लाया डाक लाया, पोस्टमन शौर्यकथा…..

मे  09, 1999, 0930 वाजता

जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांसाठी एक रजिस्टर्ड पोस्ट पॅकेट हाती होते, ते द्यायला मी आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आलो होतो, पॅकेट खुद्द साहेबांच्या नावचे होते म्हणून मी सामान्य प्रशासन मधे डाक न देता साहेबांच्या गोपनीय विभागात आलो होतो. हा खास कलेक्टर साहेबांची डाक हाताळणारा विभाग होता, आत गेलो ते एकटे बशीर मियाँ बसले होते त्यांनी मला पाहताच उठून एक खुर्ची आणली अन म्हणाले,

“आइये आइये साब बैठिये कैसे आना हुआ”.

“कुछ नहीं ये साहब का रजिस्टर्ड था”.

“ओके ओके” म्हणतच बशीर मियाँनी डीस्पॅच रजिस्टर काढले, अन झटकन अक्नोलेजमेंट मला काढून दिली मी ती माझ्या बॅग मधे टाकली अन बशीर मियाँना म्हणालो,

“अच्छा मियाँ येतो मी”.

“बसा हो ज़रा कावाह मागवतो”.

“नाही नको तिकडे पोस्ट ऑफिसला काम आहे भरपुर”.
“ठीक आहे पोस्टमन बाबु भेटु परत पुढल्यावेळी वेळ काढून या”.

तिथून बाहेर आलो अन माझ्या मोटरसायकलवर मी परत माझ्या पोस्ट ऑफिसकड़े निघालो ऑफिसला पोचताच मी गाडी लावली अन हेलमेट काढून बेरे कॅप लावणारच होतो तितक्यात समोरून लांस नाईक विश्वंभर दास आला अन एक कड़क सल्यूट केला त्याला तोच परत देताच लगेच बोलला,

“सर इमरजेंसी ड्यूटी लगी है आपको मेजर साब ने अभी बुलाया है”

काय झाले असेल ह्या नवलात मी तड़क मेजर साहेबांच्या ऑफिसला पोचलो,रितसर दरवाजा टकटक करुन परवानगी घेतली अन आत जाऊन मेजरसाहेबांना सल्यूट केला तसे त्यांनी at ease केले अन बसायला सांगितले, बसलो तेव्हा ते म्हणाले,

“कैसे हो सुबेदार साब?”

“बस सर ठीक है , आपने बुलाया था सर??”

“येस येसsssss सुबेदार साब कुछ ऐसी ड्यूटी थी जो सिर्फ आप जैसा एक्सपीरियंस बंदा ही कर पायेगा”.

“मेरे लिए क्या ऑर्डर्स है सर??”

“आपको एक बॅग डिस्पैच रन करना है, श्रीनगर टु कारगिल,आज 09 तारीख है कल सुबह 0700 तक ये बॅग कर्नल.पुरी को डिस्पैच होगी कारगिल बेस कमांड में बॅग सिर्फ कर्नलसाब के हात में हैंडओवर होगी, कोई शक??”

“नो सर”

“सुबेदार साब लेटेस्ट रिपोर्ट कहती है की बकरवाल लोगोने कुछ बंदो को एलओसी रीजेस पर बैठा हुआ देखा है और उनकेपास सामान भी है, इसीलिए आपको थोड़ा ऐतियात से जाना होगा , और बचाव के लिए आप जिप्सी नहीं बाइक से जायेंगे ताकी आप स्पॉट न हो, मेल सेंसिटिव है आप बस इतना जानिये”

“हो जायेगा सर, मैं तुरंत निकल रहा हूँ”

“गुडलक सुबेदार साब”

“थैंक यू सर”

मे 09, 1999 , 1025 वाजता

मी प्रथम माझ्या क्वार्टरला गेलो सेंसिटिव पोस्टिंगमुळे मी एकटाच राहत होतो. जायच्या अगोदर मी ऑफिस मधुनच घरी फोन केला अन थोड़ा कमनिमित्त बाहेर जातोय आता थेट पुढल्या आठवड्यात बोलु हे घरी कळवले. क्वार्टर मधे जाऊन मी माझे बॅगपॅक भरले त्यात इमरजेंसी राशन म्हणजे चिक्की बिस्किट ग्लूकोज़ डबा अन एक एक्स्ट्रा बिसलरी भरली अन तड़क ऑफिसला आलो तोवर, लांस नाईक दास ने माझी यशवंती घोड़ी उर्फ़ रॉयल एनफील्ड 500 तयार करुन ठेवली होती , त्याला विचारले

“तयारी ओके है दास?

“सर 2 जेरीकॅन्स पेट्रोल साइड फ्रेम में दोनों तरफ चढ़ाये है, पंक्चर किट पीछे वाले राइड पाउच में है, पानी और ड्राय राशन भी भर दिया है एक्स्ट्रा ब्रेक क्लच और अस्क्लेटर केबल्स भी रखवा दिए है”

हे म्हणतानाच त्याने बाइक चार्ज चे पेपर दिले त्यावर सही करुन मी अधिकृत रीत्या ती नखशिखांत ओजी उर्फ़ ऑलिव ग्रीन रंगवलेली घोड़ी ताब्यात घेतली. त्याचे ब्रेक अन क्लच चे ताण अन प्ले चेक केले अन दास ला इंस्ट्रक्शन दिली

“2 2 एक्स्ट्रा हेडलाइट और टेल लैंप बल्ब भी ले लो स्टोर से और ठीक से पॅक कर के बॅक पाउच में रखवा दो”.

“ठीक साबS ” म्हणत तो सुसाट स्टोर कड़े सुटला.

तोवर मी आत जाऊन लॉकर रूम मधे माझा ऑफिशल यूनिफार्म काढला अन कामोफ्लाज कॉम्बैट ड्रेस चढ़वला, छातीवर वेल्क्रो ने नावाची पट्टी लावली “विश्वास”. पायात डीएम शूज चढ़वले माझी बेरे लावली अन बाहेर आलो, येता येता कोत मधे जाऊन मी रजिस्टर मधे सही करुन एक 9mm बरेटा पिस्टल अन 4 मैग्ज़ीन ताब्यात घेतले, पिस्टल कापड़ी पट्टयात अड़कवलेल्या होल्स्टर मधे खोचली अन बाहेर आलो ते हाती हेलमेट धरून दास उभाच होता, मी समोर जाताच त्याने सल्यूट केला अन हेलमेट ताब्यात दिले मी त्याला सल्यूट रिटर्न केला बेरे काढून माझ्या बॅकपॅक मधे टाकली अन हेलमेट चढ़वले, अन जासुद काम करायला तयार झालो.

बाइकच्या उजव्या हाताला वैष्णो देवीची लाल सोनेरी चुनरी बांधली होती तिला नमस्कार केला, डाव्या हैंडलला लेह मॉनेस्ट्री ने दिलेला थांगका बांधला होता त्याला स्पर्श करुन हात छातीला लावला, अन सणसणुन किक मारली ते आमची यशवंती जिवंत होऊन फुरफरु लागली.

09 मे, 1999, 1100 वाजता

“जय हिंद साब”.

“जय हिंद दास” म्हणून मी गियर टाकला पहिला अन सुसाट निघालो. श्रीनगर शहरातले वेगवेगळे भाग तिथे तिथे मिळेल तश्या ट्रॅफिक ने मी कमी जास्त गतीने कापत होतो दूर गावात कुठेतरी रोजच्याप्रमाणेच कुठलेतरी आंदोलन झालेले दिसत होते, ते समजायचा एकमेव मार्ग म्हणजे दंगा करणाऱ्या लोकांनी टायर जाळले की उठणारा काळाकुट्ट धुर त्या धुराकडे एकवार नजर वळवुन मी परत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले अन चांगली 60 ची स्पीड पकडली, पण हे सुख मला जास्तकाळ लाभणारे नव्हते कारण शहरी वस्ती संपली तसाच राखाडी करड़ा रंग असलेला रस्ता उर्फ़ लद्दाख रोड सुरु झाला, मे महिन्याची सुरुवात म्हणजे बहुतांश बर्फ वितळलेला तरीही थोड़े थोड़े पॅच शिल्लक असलेला असा तो असमंत होता, तापमान -3℃ ते 15℃च्या मधे फिरत असते दिवसाच्या वेळेनुसार सद्धया सोसल असे तापमान होते खड़बड़ीत म्हणण्यापेक्षा थोड़ी कच्ची अन मधेच डांबराचे पॅच उडलेली सड़क असल्यामुळे मी गती आता कमी करुन जवळपास 40च्या स्पीड ने पुढे चालू लागलो, साधारण श्रीनगरच्या बाहेर 30 किमी आल्यावर मला गार वारे बोचु लागले तसे मी लेफ्ट इंडिकेटर देऊन गाड़ी थांबवली थोड़े पाय मोकळे केले अन बॅगपॅक मधुन जाड ऑलिव ग्रीन जॅकेट काढून चढ़वले त्याची चेन गळ्यापर्यंत ओढून मी पुर्ण पॅक झालो मग परत पुढे सुटलो. थोड्याचवेळात मी वायुल पार केले अन आता थोड़ा लयीत आलो होतो. जवळपास दीड तास झाला होता निघुन, आता पुढे अजुन 3 तास वर सोनमर्ग तिथून 4 तास पुढे कारगिल मग मी मोकळा असा विचार येईपर्यंत पहिले विघ्न आले मागच्या चाकातुन एकदम फुसकन आवाज आला, झाला प्रकार समजायला मला वेळ लागला नाही परत एकदा गाड़ी थांबली अन मी यांत्रिकपणे पंक्चर काढत बसलो. टोटल 20 मिनट तिथे घालुन मी परत पुढे निघालो तेव्हा 1350 वाजले होते, अजुन सोनमर्ग 3 तास लागणारच होते मी जवळपास 30 35 च्या स्पीड न पुढे सरकू लागलो सोनमर्ग पासुन अंदाजे 38 ते 40 किमी असताना ऊंची जाणवू लागली सोनमर्ग 2650 मीटर ऊंचीवर होते अन श्रीनगर जवळपास 1580 मीटर तरी बरं सतत इकडे काम करुन माझे शरीर ह्या हवामान अन ऊंचीला अडॉप्ट झाले होते. हा महीना मेचा होता अन बर्फ वितळु लागले होते कुठे छोटे ओघळ तर कुठे ओढ्याच्या आकारात डीपफ्रीजर मधे ठेवलेले असते तितक्या तापमानाचे पाणी वाहत होते. खाली सिंधुमातेला भेटायला जाणारी उसळती अवखळ बाळेच होती ती जणू पण त्यांच्यामुळे एक लफ़ड़े झाले होते ह्या जलधारा फ़क्त निसर्गाचे नियम पाळतात त्यांना फ़क्त गुरुत्व वापरून वरतुन खाली जाणे होते. मग त्यांना मज़्ज़ाव करणाऱ्या सड़का दगड शिला ह्यांना त्या धारा चिरून ढकलुन पुढे पुढे सरकतात, त्यांना नीट मार्ग द्यायला बॉर्डर रोड्स आर्गेनाईजेशनची माणसे चर खोदतात धारांचा अभ्यासकरुन वाटा बनवतात पण नादिष्ट वांड पोरांचा अन त्यांच्या खेळांचा भरोसा देता येत नाही तसेच ह्यांचे ही असते जो रस्ता आवडेल त्यावर दौड़त सुटतात, सोनमर्ग पासुन अंदाजे 30 किमी वर एका वळणावर मी असाच फसलो तिथे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याने एक रोड पॅच अपल्यासोबत खाली नेला होता अन तश्या त्या वाहत्या ओढ्यात मी बुलेट घातली, वाहत्या पाण्यात पुढचे चाक ओढले जाऊ लागले इतपत त्याची गती होती त्याच दरम्यान समोरील चाकाच्या खाली एक वाटोळा दगड यायला अन मागच्या चाकाखालील चिखल सरकायला एकच गाठ पडली अन गाड़ी डाव्याबाजुला कलली! माझं नशीबच थोर म्हणायला हवे म्हणून गाड़ी डावीकड़े पडलो उजवीकडे पड़ता पाणी अन गाडी सोबत मी ही खाली नदीमातेच्या कुशीत गेलो असतो, डावीकड़े गाडी कलताच मी ओणवा फेकला गेलो अन आपण दंडवत घालतो तसे धपकन पाण्यात पडलो उणापूरा 5 बोटे खोल ओहोळ अन त्यात मी पालथा पडलेलो खाली असलेली दगड माती खचकन रुतली अन तोंडी गढुळ पाणी गेले, धडपड करत मी उठून उभा राहिलो पाणी थुंकले जरा सावरलो अन स्वतःकडे पाहिले तर तळहातात दगडाची एक कपची शिरून रक्त येत होते अन उजवा गुड़घा दुखत होता पण एकंदरित मी ठीक होतो, आता फ़क्त एक प्रॉब्लेम होता मी नखशिखांत भिजलेलो होतो तितक्यात मला मेलबॅगचा विचार आला म्हणून मी यांत्रिकपणे बॅकपॅकला हात लावला तर नाशिबाने ती शाबुत होती, गाड़ीकडे पाहता तिलाही काही खास अपाय झाला नव्हता मी परत गाडीजवळ आलो अन ती उभी केली उभी करताच ती सुरु करायला बघु लागलो 5 6 किक्स मधे गाड़ी सुरु झाली अन मी पुढे निघालो , भिजल्यामुळे मात्र आता भयानक हिव भरू लागलं होतं, वरती उन होतं थोडं थोडं पण हवा जोरात सुरु असल्यामुळे मला कापरं भरू लागलं होतं हाताची बोटे सुन्न पडू लागली होती. मी तड़क ओले हातमोजे काढून पिळले अन परत चढ़वले अन हात झटकुन बोटे गरम करायचा प्रयत्न करु लागलो, पण ते काही जमेना म्हणल्यावर मी शिस्तीत गाडी कडेला लावली अन पहिले उड्या मारल्या भरपुर आता नाकाचा शेंडा बधीर झाला होता ओला यूनिफार्म मी काढला पुर्ण ताकद लावुन पिळला अन परत चढ़वला आता होईल ते बघु म्हणून मी पुढे निघालो, सुन्न पडत असलेले हात पाय अन चेहऱ्यामुळे माझी गती आता 20 25 ची झाली होती. कपडे चिखलात रॅड झाले होते. मी सोनमर्गच्या शेड्यूल्ड टाइम पेक्षा जवळपास तासभर मागे होतो पण माझा निरुपाय होता. तरीही मी गती वाढवू लागलो कारण मी टाइम बाउंड डिलीवरी वर होतो. अंदाजे 1730 ला सोनमर्ग दिसू लागले तसे मला थोड़ा हुरूप आला समोर जाता मला एक बॉर्डर रोड्स आर्गेनाइजेशनची चौकी दिसली तिथे मी गाडी थांबवली तशी तिथे राहणारी मजूर मंडळी अन त्यांचा मुकादम असलेला एक जेसीओच असणारा माणुस माझ्याकडे आले, ओजी जामानिमा पाहून त्यांनी मला ओळखलेच होते नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी मला आत नेले चहा दिला अन मी तिथल्याच एका शेकोटी समोर बसकण मारली. गरम चहा अन थोड़ी ऊब पोटी जाताच मी परत एकदा त्या मित्रांचा निरोप घेऊन पुढे निघालो. निघताना त्यांना विचारले पुढे कारगिल पर्यंत रोड कसा आहे हो? त्यावर ते म्हणाले की आम्ही थोड़ाबहुत बंदोबस्त केला आहे पण पुढे पर्वतराजाची जी इच्छा असेल ती! तसे मी हसून पुढे निघालो, मी सोनमर्ग पार केले तेव्हा जवळपास अंधार झाला होता पहाड़ी भागात लवकर अंधारुन येते तरीही 1830 म्हणजे आता मात्र खासे अंधारुन आले होते म्हणून मी गाडीचा हेडलाइट लावला अन माफक गतीने तरीही काळजीपूर्वक पुढे जाऊ लागलो, सोनमर्ग ते बालाथल अंतर मी सहज पार केले नॉर्मल गतीने अगदी ज्याची भीती होती ते बालाथलचे झिगझेग घाट सुद्धा शिस्तीत पार पडले आता मी द्रासच्या वाटेला लागलो होतो, पुढचा सहा तासाचा प्रवास हा माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक तरीही साहसी प्रवास ठरणार होता हे मला तेव्हा माहीती नव्हते. द्रास पासुन 5 किमी अगोदर मी अतिशय निवांत जात होतो गाड़ीची टिपिकल बुलेटची धगधग वगळता आवाज नव्हता नाही म्हणायला वरती आकाशात निव्वळ सड़ा पडू लागला होता ताऱ्यांचा. प्रदुषण नसलेल्या ह्या भागात तारे सवाष्णीच्या कुंकवासारखे दिसतात एकदम ठसठशीत. अश्या वातावरणात मी वाया गेलेला वेळ भरून काढायला एक्सीलरेटर पिळु लागणार इतक्यात, हलकासा “कुईंईईई” असा आवाज आला अन मला काही समजायच्या आत रस्त्याच्या डाव्या बाजुला 35 ते 40 फुटांवर भयानक स्फोट झाला .सहज क्रियेने मी बुलेट उजवीकडे घातली अन रस्त्याच्या उजव्या बाजुला एक खळगा होता पाणथळ असा तिथे घुसलो. डोके गरगरत होते कान बधीर होऊन गेले होते दचकल्यामुळे ह्रदय बरगड्या तोड़ते की काय इतक्या जोरात धड़धड़त होते. परत एकदा मी ओलागच्च झालो होतो गाड़ी त्या डबक्यात अन खळग्यात उजवीकडे कलंडली होती, पाठीवरले बॅगपॅक काढले अन आधी मेल बॅग चेक केली ती ओके होती. थोड़ा सावरत होतो तसे मी ज्या पाऊलवाटेने खाली उतरलो होतो तिकडे परत एकदा स्फोट झाला अन चिखल माती बारके दगड, चिपा ह्यांचा मला अभिषेक झाला. अन एकदम डोक्यात प्रकाश पडला!.

शेलिंग!! पाकिस्तानी आर्मी शेलिंग करते आहे , बकरवाल , रिजेस सामान, माणसे, एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! झुंजरके साधुन हरामी पाकडे डाव साधत होते, कारगिलचं युद्ध अक्षरशः सुरु होताना पाहणारा मी पहिला मनुष्य होतो, मी गुमान बिसलरीची बाटली काढली एक घोट पाणी प्यालो, तसा परत एकदा धुडुमधड़ाम आवाज आला फ़क्त या वेळी तो दिवाळीतल्या सुतळी बॉम्ब सारखा आला बहुदा शेल थोड़े दूर पडले होते मी क्रॉलिंग करत रस्त्याच्या पातळीला आलो इकडे तिकडे पाहता अंदाजे 100 मीटर दूर धूळ बसताना दिसली, नवी इंफॉर्मेशन, पाकिस्तानी भारताच्या गर्दनीची नस असणारा हाईवे तोडू इच्छित होते.होय!! नॅशनल हाईवे 1 डी ! अन त्यावर द्रासच्या वाटेला असलेला मी आर्मी पोस्टल सर्विस कोरचा सुबेदार विश्वास प्रभाकर बांदेकर.मी परत क्रॉलिंग करत खाली आलो आता ठराविक अंतराने आर्टिलरी शेल्सचा आवाज येऊ लागला, लगेच मनाने गणित बांधले,कुठल्या गन्स असतील बॅटरी कशी ऑपरेट होते आहे हे सुटत नव्हते गणित कारण मी आर्टिलरीचा माणुस नाही मी तर साधा डाक ड्यूटी रनर होतो. आता काय करावे ह्यात मी मिनिटभर विचार केला अन पहिले गाड़ी कड़े मोर्चा वळवला गाडी ठीक होती फ़क्त उजवीकडली दोन्ही इंडीकेटर्स चुराडा झाली होती गाड़ी अजुन जवळून पाहता उजव्या बाजूला असलेल्या जेरीकॅन मधे एक बारीक अणकुचीदार दगड रुतुन पेट्रोल लीक होऊ लागले होते. क्षणभर विचार करुन मी तो कॅन ओढला अन पेट्रोल रिकाम्या होऊ घातलेल्या गाड़ीच्या टाकीमधे ओतले अर्धे पेट्रोल त्यात बसले तरी कॅन मधे थोड़े होतेच मी माझ्या हातमोज्याचं मनगटाजवळ असलेलं कापड फाडलं अन लीक होत्या कॅन मधील बारीक़ छिद्रावर दाबून बसवलं, हा इलाज तर जमला होता आता अजुन एक प्रश्न होता माझ्या गाड़ीचा हेडलैंप अन टेललैम्प अगदी प्रखर जरी नाही म्हणला तरी अंधारात नक्कीच चमकला असता, आर्टिलरी कवर मधे जर एखादे शत्रूचे यूनिट पुढे सरकत असले तर मी त्याच्या तावडीत सापडू शकलो असतो , परत समोरची शॉकप अन साइड पेनल वर असलेली रिफ्लेक्टर स्टिकर्स सुद्धा चमकन्याचा धोका होता, काय करावे ह्या विचारात मला एक शक्कल सुचली मी सरळ ज्या पाण्याच्या थारोळ्यात बसलो होतो त्याच्या बुडाला हात घालुन खरवडले ते हाती थोड़ा मुलायम चिखल लागला मी तो चिखल सरळ रिफ्लेक्टर्स अन टेल लाइट वर फासला अन त्यांना conceal केले त्या नंतर तसाच चिखल हेडलाइटवर चोपड़ला फ़क्त मधे एक छोटेसे वर्तुळ सोडले जेणे करुन पसरणारा लाइट कंट्रोल होईल पण मला अंधुक रस्ता सुद्धा दिसत राहील, मी एक आर्मी पोस्टमॅन होतो मला घाबरुन चालणार नव्हते. माणसाचे मन विचित्र असते, ह्या क्षणी मला गोष्ट आठवत होती ती एका प्राचीन ग्रीक निरोप्याची, फिडिपेडिस त्याचं नाव, एथेंसचा राहणारा फेडिपेडिस धावत जाऊन सन्देशवाहन करत असे अथीनियान आर्मीचं एकदा असंच मैराथनच्या मैदानात असलेल्या युद्धभुमीपासुन त्याला एथेंस पर्यंत निरोप पोचवायचे काम त्याला मिळाले. निरोप बाका होता “मैराथन चे मैदान मारले आपण जिंकलो” हा निरोप एथेंस सिटी कौंसिलला न पोचला तर ते अज्ञानापाई शहर शरण करतील ते व्हायला नको म्हणून फिडिपेडिस धावत सुटला श्वास न मोजता कसलीच तमा न बाळगता धावत सुटला शेवटी एथेंस च्या दरवाज्यावर आला तेव्हा कोसळून पडला त्याला विलक्षण धाप लागली होती त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले “Rejoice we won” अन तिथेच तो फेडिपेडिस वारला होता. आजही लांब अंतरची धावण्याची शर्यत होते ती मैराथन म्हणावते ती फ़क्त फिडिपेडिसचा सन्मान अन त्याची आठवण म्हणून. आज मी ही फेडिपेडिस् झालो होतो, जीव गेला तरी बेहत्तर फ़क्त तो माझे एथेंस उर्फ़ कारगिल बेसलाच जायला हवा ह्या निश्चयाने मी तयार झालो चिखल माखुन गाडीचा कमांडो मी आधीच केला होता, अंगावर सुद्धा काहीच चमकदार नको म्हणून सर्वांगाला मी चिखल फासला बॅगपॅक परत एकदा पाठीवर आवळले अन सुसाट म्हणजे अक्षरशः सुसाट सुटलो. आता हल्ल्याची व्याप्ती लक्षात आली होती, येत होती गाड़ी चालवण्यात अनेक व्यवधाने येत होती हेडलाइट वरच्या चिखलामुळे रस्ता नीट दिसत नव्हता त्यामुळे मधेच कंबरतोड़ गचके लागत होते ते वेगळेच मधेच एखादे शेल सड़केजवळ आदळले की मी हेलपाटत गाडी परत उजवीकडे रस्त्याखाली घालत असे , एकदा तर हा वेग इतका होता की रस्त्यावर शेल आदळले अन त्याने जेसीबी काढतो तसा एक स्कूप काढला रस्त्याच्यामधुन डाव्या कोपर्यापर्यंत तेव्हा गाड़ी कंट्रोल करुन उजवीकड़े न वळवता आल्याने मी जिथुन रस्ता उखड़ला होता त्याच्या अगदी चिकटुन बोजड़ बुलेट काढली होती उड़नारी माती खड़े अंगावर असंख्य ओरखडे देत होते पण मला पर्वा नव्हती, कारगिल जवळ पोचलो तेव्हा ही धग अजुन जाणवली मला पण मला मागे वळायचे नव्हते, कारगिल बेस जवळ आलो तेव्हा मी अक्षरशः गलितगात्र झालो होतो, बेसच्या सेंट्री ने मला शीट्टी वाजवुन थांबवले तेव्हा मी भानावर आलो होतो, कदाचित युद्धज्वर ह्यालाच म्हणतात असे वाटते, सेंट्रीला चिखलात माखलेला मी ओळखु येइना तसे मी परिचय दिला अन कर्नल पूरी ह्यांना भेटायचे आहे असे सांगितले तसे चार च्या चार सेंट्री बंदुकी खाली करुन धावत आले

“ओये अपना बंदा है ओये” म्हणत्या जवानाची ग्रेनेडियर्स लोगो लावलेली बेरे दिसली तेव्हा मी निश्चिन्त झालो होतो माझ्या अंगातून चार पाच ठिकाणहुन रक्त येत होते हाताची बोटे काळसर नीळसर पडली होती, पाय कान पाठ बधीर झाली होती पण बॅगपॅक घट्ट होती पाठीवर एका जवानाने माझे ओले हातमोजे काढून टाकले होते दुसऱ्याने बूट अन सॉक्स दोघे खसखसा चोळून माझे हातपाय गरम करत होते तोवर तिसऱ्या ने आत मॅसेज दिला रेडियोवर अन मला न्यायला जिप्सी आली रेडियो करणारा जवान माझी बुलेट घेऊन मागून आला अन थेट मी बेसच्या MI सेक्शनला आणलो गेलो होतो, तिथे एक खाट तयार होती आत रूम हीटर होता मला माझे कपडे बदलायला सांगुन तिथे निजवले गेले डॉक्टर ने अंगावर असलेले छोटे मोठे ओरखड़े जखमा नीट स्वच्छ करुन बांधल्या अन मी पडलो होतो तेव्हाच कर्नल पूरी आले ! रात्री साडे अकरा वाजता मी माझ्या इच्छित अधिकार्याला भेटलो ! जवळ पडलेल्या बॅगपॅक मधुन मी मेल बॅग काढून कर्नल साहेबांना दिली अन म्हणालो

“सर ये मुजाहिद नहीं है ये प्रॉपर आर्टिलरी कवर था सर द्रास से कारगिल के बीच में एनएच 1डी तोडा जा रहा है श्रीमान”

मे 09,1999 2330 वाजता मी जे करायला निघालो ते पुर्ण केले होते.

तेव्हा पूरी सर म्हणाले “बहुत बढ़ीया सुबेदार साब हम देख लेंगे अब आप सो जाएँ” औषधांच्या इफ़ेक्ट मुळे मला पण झोप आली सकाळी मला जाग आली ती आर्टिलरीच्या आवाजानेच पण जवळून आवाज येऊन सुद्धा कोणी गड़बड़ीत दिसत नव्हते अर्थ स्पष्ट होत्या भारताच्या बोफोर्स नामे वाघिणी तैनात झाल्या होत्या अन पाकिस्तानचे धिरडे भाजायची आपली ड्यूटी चोख बजावत होत्या निरोप नीट पोचले होते.

एक पोस्टमन समाधानी होता.

समाप्त.

 

 
(कथा पूर्णपणे काल्पनिक, चित्रे जालावरून साभार)

Advertisements

सैराट – अफाट स्टोरी टेलींग

अचानक दाणकन कानाखाली बसल्यावर जो एक सुन्नपणा येतो, बधीरता येऊन कान बंद होऊन आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपणा येतो, तो कधी अनुभवलाय? मी नुकताच अनुभवला…सैराट बघितला तेव्हा!

प्रत्येक संवेदनशील कलाकार, संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला एक माध्यम वापरतो. मनातली खळबळ, विद्रोह सार्थपणे उतरवण्यासाठी ह्या माध्यमाचा सार्थ वापर करावा लागतो त्या कलाकाराला. चित्रकार कुंचला आणि कॅनव्हास वापरून विवीध रंगांतून ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो तर लेखक कवी शब्दांशी खेळून. सिनेमा हे एक माध्यम, प्रभावी माध्यम म्हणून संवेदनशीलतेने ‘स्टोरी टेलींग’ साठी आजपर्यंत बर्‍याच जणांनी हाताळले आहे. अलीकडच्या काळात विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप वगैरे सारखे कलाकार हे माध्यम फार हुकामातीने वापरताना दिसतात. मराठी चित्रपटात हे अभावानेच अनुभवायला मिळतं!

नागराज मंजुळे, सिनेमा हे माध्यम ‘स्टोरी टेलींग’ साठी किंवा मनातली खळबळ अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी कसे हुकुमतीने वापरता येते ह्याची जाणीव करून देतो सैराटमधून. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कसलाही आव न आणता निरागस गोष्ट सांगण्याची शैली, सिनेमा हे माध्यम किती प्रभावी आहे आणि किती लवचिकतेने संवेदनशीलता अभिव्यक्त करण्यासाठी कसे प्रभावीपणे वापरता येते ह्याचे उदाहरण म्हणजे सैराट!

नीयो-रियालिझम ही एक सिनेमाशैली आहे जी नागराजने त्याच्या आधीच्या सिनेमांमधे वापरली आहे. सैराटमधे त्या शैलीला थोडा व्यावसायिक तडका देऊन एक भन्नाट प्रयोग यशस्वीरित्या हाताळला आहे. त्यामुळे सिनेमाची ऊंची वाढली आहे. प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून यशाची गणिते आखून तसं मुद्दाम केलं असं म्हणता येऊ शकेल. त्यात काही वावगं वाटून घ्यायची गरज नसावी कारण तो व्यावसायिक सिनेमा आहे आणि त्यातून पैसा कामावणे हा मुख्य उद्देश आहेच आणि असणारच! महत्वाचे म्हणजे हा प्रयोग मराठीत झालाय आणि यशस्वीरित्या हाताळला जाऊन प्रभावी ठरलाय.

करमाळा तालुक्यातल्या गावांमधला निसर्ग वापरून केलेले चित्रीकरण आणि त्याने नटलेला सिनेमाचा कॅनव्हास पाहून माझे आजोळ असलेल्या करमाळयाचे हे रूप माझ्यासाठी अनपेक्षीत होते. (त्या वास्तवाची जाण करून देणारा म्हणून वास्तववादी असं म्हणण्याचा मोह आवरता येत नाहीयेय 😉)
कलाकारनिवड अतिशय समर्पक, ती नागराजाची खासियत आहे हे आता कळले आहे. सिनेमा वास्तवादर्शी होण्यासाठी वास्तव जगणारी माणसं निवडण्याची कल्पकता सिनेमातली प्रात्र खरी आणि वास्तव वाटायला लावतात. रिन्कु राजगुरुने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिची निवड आणि नागराजाची कलाकार निवडीची हातोटी किती सार्थ आहे ह्याला एका प्रकारे दुजोराच दिला आहे. सिनेमातली प्रत्येक पात्रनिवड अफलातून आहे. प्रत्येक पात्राची वेगळी आणि स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. (प्रदीप उर्फ लंगड्याबद्दल काही इथे)

सिनेमाची कथा ३ टप्प्यांमध्ये घडते. तिन्ही टप्पे एकमेकांशी गुंफलेले आहेत. तिन्ही टप्पे ज्या ठिकाणी एकत्र गुंफले जातात ते सांधे अतिशय प्रभावीपणे जुळवले आहेत. प्रत्येक टप्प्याचे सिनेमाच्या गोष्टीत एक स्वतंत्र महत्व आणि स्थान आहे. त्या त्या महत्वानुसार प्रत्येक ट्प्प्याला वेळ दिला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. नागराजाच्या स्टोरी टेलींग कलेच्या अफाट क्षमतेचा तो महत्वाचा घटक आहे. पहिल्या ट्प्प्यात एक छान, निरागस प्रेमकाहाणी फुलते जी सिनेमाची पाया भक्कम करते. चित्रपटाचा कळस, तिसरा टप्पा, चपखल कळस होण्यासाठी ही भक्कम पायाभरणी किती आवश्यक होती हे सिनेमाने कळसाध्याय गाठल्यावरच कळते.

मधला टप्पा, पहिल्या ट्प्प्याला एकदम व्यत्यास देऊन स्वप्नातून एकदम वास्तवात आणतो आणि वास्तव किती खडतर असतं हे परखडपणे दाखवतो. इथे डोळ्यात अंजन घालण्याचा कसलाही अभिनिवेश नाही. ही गोष्ट आणि आहे आणि वास्तवाशी निगडीत आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने मांडले आहे. अतिशय साधी प्रेमकहाणी गोड शेवट असलेली (गल्लाभरू) करायची असती तर मधल्या ट्प्प्याची गरज नव्हती. इथे नीयो-रियालिझम वापरून नागराज वेगळेपण सिद्ध करतो.

पण कळस आहे तो गोष्तीतला तिसरा टप्पा. दुसर्‍या ट्प्प्यातला वास्तवादर्शीपणा दाखवूनही गोड शेवट असलेला (गल्लाभरू) करता आला असता. पण संवेदनशीलतेने टिपलेल्या अनुभवांची, मनात घुमणारी आवर्तनं अभिव्यक्त करायला सिनेमा हे माध्यम प्रभावीपणे वापराण्याचे कसब असलेल्या नागराजचे वेगळेपण सिद्ध होते ते ह्या ट्प्प्यात! ज्या पद्धतीने शेवट चित्रीत केलाय तो शेवट सानकन कानाखाली वाजवलेली चपराक असते.

त्या शेवटाचे कल्पक सादरीकरण हे रूपक आहे, त्या चपराकीने आलेल्या सुन्नपणाचे, ज्याने बधीरता येऊन कान बंद होऊन येते आकस्मिक आणि क्षणिक बहिरेपण!

तुझं काम होत असतं

चार्लीचाप्लीननं अनेकांना भुरळ घातली आहे आजवर. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रोजच्या जगण्यात तो क्षणभर का होईना समोर येतोच. म्हणजे तसा तो आपल्यातच असतो पण दिसत नाही, किंवा आपली नजर मेलेली असते म्हणूया, म्हणून आपल्याला तो दिसत नाही. कुणीतरी आपल्याला दाखवावा लागतो कान पकडून, तो बघ फेंगड्या पायाचा आभाळापर्यंत गेलेला चार्ली.

जिवलग मित्राचं प्रेम जुळावं असं त्यालाही वाटत असतं मनापासून, अगदी खरोखर. पण त्याबरोबर मनातलंही चुकून ओठावर येतं, मित्र हसण्याची भीती असते पण तरीही येतंच ते, आपसूक. धडक्या मित्रांच्या संगतीने लंगड्याने त्यांच्यात सामील व्हायचा खुळेपणाच तो.  “सपनी आसंल का रं फेसबुकवर” हे विचारल्यावर मित्रांच्या चेहेऱ्यावरचं उपेक्षेचं हसू पाहून तो पुन्हा मनाची समजूत घालतो. “हे आपलं नव्हेच गड्या, आपण कुणीच नाही, आपण प्रेमाचं स्वप्न पाहाणंदेखील पाप आहे” असं उर्मी पुन्हापुन्हा खोल पुरून टाकणारा, आणि तरीही चेहेऱ्यावर मात्र त्यातलं काही येऊ न देणारा..

एकदोनदा सपनीकडे चोरून बघतोही, पण नंतर स्वतःच शहाण्यासारखी मान वळवतो, तेवढ्यात सपनीनं कागद फेकल्यावर, पायात जनावर दिसावं तसा घाबरतो. साल्या कुठून आणलंस सुखाची नुसती चाहूल लागल्यावरदेखील हे अंगावर काटा आल्यासारखं घाबरणं.

मग आपलं हसं होऊ नये म्हणून असंख्य तऱ्हा करणारा आणि त्यामुळे जास्तच हास्यास्पद दिसणारा चार्ली. कित्तीवेळा स्वतःला समजावतो, हे खरं नाही, हे सुख माझं नाही, पण तरीही फरफट चालूच. एवढ्या ओरखडे मिळवण्याच्या आणि वागवण्याच्या सततच्या सवयीमुळेतरी अंदाज यायला हवा की नको तुला. तुझ्याकडे कागदामधे प्रेमाचे शब्द येत नसतात, फक्त नखं येत असतात, बोचकारणारी..

कोसळतो क्षणभर, वर्षानुवर्षे डोहाच्या तळाशी साठलेलं काही वर येऊ पाहातं, जीवाभावाचे मित्र क्षणात अनोळखी भासायाला लागतात, हुंदक्यांची उकळी एखादीच अनावधानाने, पुन्हा एकदा डोह शांत होतो. चार्ली स्वतःच्या फजितीवर स्वतःच खळखळून हसायला लागतो. “माझं तर लंगड्याचं कायबी असतं लगा, कुठं सपनी आन कुठं मी” हे तो स्वतःलाच पुन्हा एकदा बजावतो आणि हे सगळं इतक्या सराईतपणे करतो की नक्की डोहाच्या तळाशी काही आहे कि नाही याचा अंदाजही येऊ नये.

vlcsnap-2016-05-06-13h29m54s36

 

पुन्हा हुंदका येऊ नये म्हणून मित्रांकडे तोंड फिरवून फेंगडे पाय टाकत रस्त्याच्या मधून चालणारा चार्ली पाहिला का तुम्ही, वाटेत भेटलेल्या वठलेल्या उपेक्षितांना, हाका मारमारून “मी आहे” हे बजावून सांगणारा चार्ली. रस्त्यातल्या तीन वर्षाच्या मुलाकडूनही हूल खाणारा पण तरीही कसनुसं हसत पुढे जाणारा चार्ली.

पण चार्ली पूर्ण होतो तो एवढ्याने नाही, तो पूर्ण होतो तो त्याच्या दुर्दम्य आणि नितळ भलेपणामुळे. मघाचा हुंदका अजून विरला नसताना, मित्राला “ माझं सोड, पण तुझं यगळ हाय लेगा, तुझं काम होत असतं, आर्ची तुला नाय म्हनतच नसती, तू लिहून घे वाटलंच तर माह्याकडून” हे सांगणारा चार्ली दिसला का तुम्हाला…